मराठा समाजाच्या मागण्यांसाठी संभाजीराजेंचे आजपासून उपोषण | पुढारी

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी संभाजीराजेंचे आजपासून उपोषण

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या मराठा समाजाच्या मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे हे शनिवार, दि. 26 पासून येथील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने धरणे, उपोषण व साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार आरक्षणाला स्थगिती देण्यापूर्वी ज्या उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना नियुक्त्या देण्यात याव्यात. सारथी या राजर्षी शाहू छत्रपती यांच्या नावाने उभारलेल्या संस्थेचे कामकाज समाधानकारकपणे सुरू व्हावे, कोल्हापूर उपकेंद्राला कर्मचारी देऊन कामकाज सुरू करावे व जागेचे हस्तांतर करावे, पुण्यातील जागेचे हस्तांतर करावे व त्याचा मास्टर प्लॅन तयार करावा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्जमर्यादा 10 लाख रुपयांवरून 25 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात यावी, चार महिन्यांपूर्वी या महामंडळाला जाहीर केलेल्या 400 कोटी रुपयांपैकी केवळ 30 कोटी रुपये दिले असून उर्वरित रक्कम त्वरित देण्यात यावी, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 23 वसतिगृहांची यादी जाहीर कण्यात आली.

त्यापैकी 13 वसतिगृहांचे उद्घाटन 15 ऑगस्टला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. केवळ ठाणे येथील अपवाद वगळता कुठेही वसतिगृह सुरू झाले नाही. ही वसतिगृहे त्वरित सुरू करावीत. कोपर्डी प्रकरणात सरकारने अर्ज करून खटल्याची सुनावणी लवकर करण्याची मागणी करावी. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मृत आंदोलकांच्या वारसांना तत्काळ शासकीय नोकरी देण्यात यावी. न्या. भोसले समितीने मराठा समाजाच्या उन्नतीसाठी सुचविलेल्या 12 मुद्द्यांची अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी हे उपोषण होणार आहे.

आझाद मैदानात उपोषणाची जय्यत तयारी करण्यात आली असून अनेक जिल्ह्यांतून मराठा समाजाचे कार्यकर्ते उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. शनिवारी सकाळी 11.30 वाजता संभाजीराजे आपले बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. नवी मुंबईसह शेजारच्या जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी शुक्रवारी आझाद मैदानात उपोषणस्थळाची व मंडपाची पाहणी केली. मराठा आरक्षण व समाजाच्या मागण्या हे दोन्ही विषय वेगवेगळे आहेत.

सर्वजण सुशिक्षित झाल्यावर आरक्षणाची गरज भासणार नाही, असे राजर्षी शाहूंचे म्हणणे होते. आज तशी स्थिती नाही. म्हणूनच मराठा समाजाला सुरक्षित, सक्षम करायचे असेल तर वरील मागण्या मार्गी लावाव्या लागतील. मात्र तशी सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही. त्यासाठी आपण बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला असून मागण्या मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

उपोषणाचा कार्यक्रम

  • स. 10.50 वा. मरिन ड्राईव्ह येथून सर्व समन्वयकांसह हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकास अभिवादन
  • स. 11.15 आझाद मैदान येथे पत्रकार परिषद, स. 11.30 वा. उपोषण सुरू

Back to top button