शोध सुखाचा : ‘राग’रंग | पुढारी

शोध सुखाचा : ‘राग’रंग

सुजाता पेंडसे

माणूस भूतकाळाला मनोमन किती घट्ट पकडून ठेवत असतो, हे मागच्या प्रकरणात आपण पाहिले. नुसती एखादी घटनाच मनात धरून ठेवत नाही, तर त्यासोबत उसळलेल्या, अनियंत्रित अशा भावनांचे पॅकेजही त्याने सोडलेले नसते. त्यामुळे जेव्हा केव्हा ती घटना आठवेल, तेव्हा पुन्हा मन त्याच भावनांमध्ये तेवढा काळ गुरफटते आणि वर्तमानातही राग, चिडचिड, वैताग प्रकट होतो.

क्रोध किंवा राग ही गोष्टही सुखी होण्याच्या मार्गातला मोठा अडथळा आहे. एक दिवसभर स्वतःचे निरीक्षण करा. रागाच्या किती कमी-अधिक लाटा मनात उसळून, आपटून मन अशांत करून गेल्यात याची नोंद केलीत की, तुम्हाला आश्चर्य वाटेल. सकाळी उठल्यापासून ‘राग’ आळवायला माणूस जणू निमित्तच शोधत असतो. उठायला उशीर झाला की, स्वतःचा, घड्याळाचा आणि मग नवरा-बायको यांचा एकमेकांवर राग निघू शकतो. गडबडीनं आवरून ऑफिसला निघालं की, वाटेत ट्रॅफिकवर, गर्दीवर, माणसांवर मनोमन चरफड सुरू असते. कारण, नियोजित वेळेत ऑफिसवर पोहोचलं नाही तर लेटमार्कचं भय; शिवाय बॉस नावाचा माणूस काय बोलेल ते ऐकून घ्यायचं, ही चिडचिड मनात सुरू असते. बरं, कामाच्या ठिकाणी तरी स्वस्थ राहता का तुम्ही? नाहीच. कारण तिथंही मनासारखं काही घडेलच असं नाही; मग पुन्हा रागराग, असं हे आवर्तन झोपेपर्यंत सुरू असतं. गृहिणी आणि नोकरदार स्त्रियाही या रागाच्या फेर्‍यातून सुटत नाहीत. थोडक्यात काय, तर ‘राग’ हा माणसाच्या मनात जिवलग व्यक्तीसारखा चिकटून बसलेला असतो. विशेष म्हणजे, आपल्याला राग आला तर त्याला कारण बाह्य परिस्थिती किंवा दुसरी माणसंच आहेत, हे अगदी ठामपणे वाटत असतं. परंतु, वस्तुस्थिती अगदी उलट असते. कुणीही तुम्हाला संताप आणू शकत नाही, जोवर तुम्ही त्या घटनेला, व्यक्तीला, त्यांच्या बोलण्याला महत्त्व देत नाही. राग ही एक नकारात्मक भावना आहे आणि ती आपले प्रचंड नुकसान करते, हे जोवर तुम्ही पक्कं लक्षात घेत नाही, तोवर तुम्ही समाधानी होऊ शकत नाही.

रागाच्या मुळाशी प्रत्येकाचा ‘मी’ असतो. मनात उमटणार्‍या रागाच्या भावनेचा विचार करताना, मनात बोलली जाणारी वाक्ये आठवून पाहा. त्यात मी असतोच.
“मला वाटेल तसं बोलला तो. मला?” “मी इतकं सगळं त्याच्यासाठी केलं; पण तो कृतघ्न निघाला.”
“माझं त्या व्यक्तीनं इतकं नुकसान केलंय की, तो समोर आला तरी माझं डोकं फिरतं.” या आणि अशा किती तरी विचारलहरी मनात येत असतातच, वर तुमचे समर्थनही तयार असते. असं कुणी वागलं तर राग येणारच. ही सहज घडणारी गोष्ट आहे, असं तुम्हाला वाटतं; पण जेव्हा राग येतो, तेव्हा शरीरावर त्याचे काय परिणाम होतात, हे समजून घेतलं तर तुमच्या रागाचा पुन्हा विचार कराल.

रागामुळे नर्व्हस सिस्टीमवर वाईट परिणाम होतो. हार्ट रेट वाढू शकतो. ब्लडप्रेशर वाढतो. घाम येऊन थकल्यासारखे होते आणि हार्मोन्स इम्बॅलन्स होतात. राग बाहेर पडला तरी शरीरावर परिणाम करतो, मनात आत दाबून ठेवला तरी शरीरांतर्गत अवयवांवर दुष्परिणाम करतो.

आता या रागाचं करायचं तरी काय? पूर्वीची माणसं म्हणायची. क्रोध आला तर मनात 1 ते 10 अंक मोजा, याचं कारण म्हणजे तुमचं लक्ष क्रोधापासून बाजूला होऊन थोडं शांत व्हायला मदत होईल. खरं तर प्रत्येक राग येणार्‍या गोष्टीच्या मुळाशी तुम्ही स्वतःच असता, अनेक घटनांना तुम्हीच जबाबदार असता. सकाळी लवकर उठलो नाही यात तुमची काहीच चूक नसते? रस्त्यावर ट्रॅफिक असणारच; त्यावर चरफडून तुम्ही लवकर ऑफिसला पोहोचणार आहात का? “बॉस इज ऑलवेज राईट,” असं मानून घेतलं तर कमी राग येईल. मुळात राग ही भावना आपल्या मनावर स्वार होणार नाही, याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी काही गोष्टी करता येईल.

ज्या लोकांचा तुम्हाला राग आहे, त्या सर्वांची नावे एका कागदावर लिहा. त्यांच्या नावापुढे तुमचा राग आणि नकारात्मक भावना रास्त आहेत असं तुम्हाला वाटण्याची काय कारणे आहेत, त्याची यादी करा. आता या सगळ्यातून तुम्हाला बाहेर पडायचे आहे, हे ठरवा आणि या कागदाच्या तुकड्याला पेटवा. तो तुकडा जाळून त्याची राख होऊ द्या. मनातून या सर्वांपासून मुक्त होत आहोत, ही भावना बाळगल्याशिवाय रागाबद्दलची भावना मनातून कायमची जाणार नाही.

क्रोध किंवा राग ही अंतिम अशी नकारात्मक भावना आहे. सगळी भीती, शंका, द्वेष, मत्सर याचं शेवटी रागात रूपांतर होतं. नैराश्य हासुद्धा अंतराभिमुख असलेला रागच आहे.

मनासारखं काही घडत नसलं की, चिडचिड, वैफल्य, राग निर्माण होतो; पण तो ज्या कारणाने निर्माण होतो, तिथेच तो प्रकट होईल असे नाही, तो दुसरीकडे बाहेर पडून संबंध बिघडवून टाकतो. उदाहरणच घेऊया…

एक गरीब माणूस, ज्याची परिस्थिती हलाखीची होतीच; पण पदरात चार मुली होत्या. मुलगा होईल म्हणून वाट बघता बघता चार मुली झाल्या. कुटुंबाचा खर्च त्याच्याकडून भागत नव्हता, बायकोची प्रकृती बरी नसल्याने तीही बाहेरचे काम करू शकत नव्हती. रोजचा खर्च भागवता भागवता मेटाकुटीला यायचा. मुलींवर त्याचं प्रेम होतं; पण त्यांचा शाळेचा खर्च, भाडे खर्च, कपडालत्ता, जेवणखाण सगळं आ वासून उभं असायचं. एक दिवस तो दारू पिऊन आला आणि बायकोशी भांडला. चार पोरी जन्माला घालणारी बाई म्हणून तिला दुषणं देऊ लागला. वास्तविक, तो स्वतः ‘मुलगाच पाहिजे’ या मताचा नव्हता. तरीही रागाच्या भरात बायकोला वाटेल ते बोलून बसला. आधीच आजारी असलेली बायको अंथरुणाला खिळली; मग तर त्याचे अधिकच हाल होऊ लागले. या घटनेत मूळ मुद्दा घरखर्च भागत नाही हा होता; पण भांडण झालं ते मुलींवरून, असंच अनेक ठिकाणी होतं. रागावर नियंत्रण ठेवता आलं नाही की, शरीर बिघडतं आणि नाते संबंधही बिघडतात.

राग अजिबात उपयोगी नाही, हे समजल्यावर काय करायचं, ते आता पाहूया. आपल्या रागाचे मूळ शोधायचे आणि मग प्रत्येक बिघडलेल्या गोष्टीला मी जबाबदार आहे, असे म्हणायचे; मग पाहा रागाचा पारा कसा झटकन खाली येतो ते. दुसर्‍याला दोष देताना तावातावाने बोलणारे आपण स्वतःकडे बोट आले की, एकदम गप्प होतो.

यानंतर आपण यापूर्वी वाचले आहे, तसे मनाला शांत, स्वस्थ स्थितीत न्यायचे आणि स्वयंसूचना घ्यायच्या. अगदी मनापासून, उल्कटतेने काही वाक्ये उच्चारायची. सर्वप्रथम माझा राग पूर्ण नियंत्रणात आहे. माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे! ‘माझं मन, शरीर पूर्णतः शांत आहे’ मला आता खूप स्वस्थ… निवांत वाटतंय मी संतुलित मनाने परिस्थिती स्वीकारतो. माझा माझ्यावर पूर्णतः ताबा आहे मला हवे तेच घडते आहे! अशासारख्या सूचनांपैकी ज्या योग्य वाटतात, त्या सूचना मनाशी वारंवार उच्चारा.

विशेषतः, रात्री झोपताना आणि सकाळी शांत प्रहरी अशा सूचना देणे, जास्त फायद्याचे ठरते. आपणच आपल्याकडे तटस्थ वृत्तीने पाहता येणे, हे सकारात्मकतेच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे.

Back to top button