मनोरंजन : आवाज नहीं मरदी… | पुढारी

मनोरंजन : आवाज नहीं मरदी...

प्रथमेश हळंदे

वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी चमकीलाची हत्या करण्यात आली. तो आणखी जगला असता, तर आज पंजाबी संगीत वेगळ्या उंचीवर पोहोचलं असतं, यात दुमत नाही. पंजाबचा पहिला आणि खराखुरा रॉकस्टार असलेल्या चमकीलाचं जीवनचरित्र मांडलंय ते पंजाबी लेखक गुलजार सिंग यांनी. त्या पुस्तकाचं शीर्षक चमकीलाचं कालातीत अस्तित्व अधोरेखित करतं. ते म्हणतं, ‘आवाज नहीं मरदी…’

‘समाज सुधार लहर.’ ऐंशीच्या दशकात हे पत्रक सर्वसामान्य पंजाबी जनतेच्या डोक्यावर टांगती तलवार बनून गावोगावी फिरत होतं. या पत्रकवजा नियमावलीला प्रत्येक शीख व्यक्तीने आत्मसात करावं, असा धमकीवजा इशाराच तेव्हा खलिस्तानी संघटनेने दिलेला होता. नियमावलीचं उल्लंघन करणार्‍यांना कडक शिक्षा केली जाणार होती. असं असलं तरी या पत्रकाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे विरोध केला जात होता. लोकप्रिय पंजाबी गायक अमरसिंग चमकीला हेही त्यातलंच एक नाव. 8 मार्च 1988 रोजी चमकीलाची हत्या झाली.

आपल्या शोसाठी स्टेजच्या दिशेने जाणार्‍या चमकीला आणि त्याच्या साथीदारांवर तीन मारेकर्‍यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात चमकीला, त्याची पत्नी आणि इतर दोन साथीदार धारातीर्थी पडले. चमकीलाच्या हत्येचं कारण शोधण्याचे बरेच प्रयत्न झाले; पण कसलाही पुरावा आजतागायत समोर आलेला नाही; पण सगळी कारणं तपासून बघितली, तर चमकीलाच्या त्या तीन मारेकर्‍यांची वरवर ओळख पटवणं सोपं आहे. त्या तिघांपैकी एकजण ‘समाज सुधार लहर’च्या लाटेवर स्वार झालेला संस्कृती रक्षक खलिस्तानी होता, दुसरा कडवट जात्यंध होता, तर तिसरा असूयेने झपाटलेला स्पर्धक होता, असं म्हणता येतं. चमकीलाच्या हत्येचं कारण हे खरं तर त्याच्या एकंदर कारकिर्दीतच दडल्याचं दिसून देतं.

चमकीलाचा जन्म लुधियानातल्या दुगरी या गावचा. हातावर पोट असलेल्या दलित घरात जन्मलेल्या चमकीलाचं मूळ नाव होतं धनिराम! जातीने रामदासिया शीख चांभार असलेल्या धनिरामला अगदी लहान वयातच गायनाची गोडी लागली. जसजसा धनिराम मोठा होत गेला, तसतसं इलेक्ट्रिशियन होण्याचं ध्येय त्याच्या मनात बाळसं धरू लागलं; पण त्याची जात आणि बिकट आर्थिक परिस्थितीमुळे हवं ते करिअर निवडायचं भाग्य त्याला लाभलं नव्हतं. नाइलाजाने एका स्थानिक कापड गिरणीत त्याने काम मिळवलं आणि तिथंच रमायचा प्रयत्न तो करू लागला. याच काळात तो पेटी आणि ढोलकी वाजवायला शिकला. स्थानिक आखाड्यात आणि नाटक मंडळींच्या मेळ्यात सहभागी होऊन तिथं आपली ही नवी कला जोपासू लागला. आखाडा म्हणजे खुल्या मैदानात किंवा घराच्या विस्तीर्ण अंगणात होणार्‍या छोटेखानी संगीत मैफली. अशा आखाड्यांच्या माध्यमातून धनिराम नामांकित गायकांना भेटू लागला.

इथंच त्याला भेटला सुप्रसिद्ध लोकगायक सुरिंदर शिंदा. सुरिंदरसोबत हातमिळवणी केलेला धनिराम त्याच्यासाठी गाणी लिहू लागला, स्टेज सजवू लागला, वेळप्रसंगी कोरसमध्ये सहभागी होऊन गाऊही लागला. धनिरामने लिहिलेल्या गाण्यांमुळे सुरिंदर आणखीनच प्रसिद्ध झाला; पण महिन्याकाठी शंभर रुपयांत एवढं सगळं करणं धनिरामला परवडत नव्हतं. एव्हाना त्याचं लग्न होऊन त्याला दोन मुलीही झाल्या होत्या.

घरखर्च भागवण्यासाठी धनिरामने स्वतःच या क्षेत्रात पुढाकार घ्यायचं ठरवलं. कॅनडात शोसाठी गेलेल्या सुरिंदरच्या सहगायिकेसोबत त्याने हातमिळवणी केली आणि आपला पहिला अल्बम काढायचं ठरवलं. ती सुप्रसिद्ध गायिका होती सुरिंदर सोनिया. 1979 मध्ये ‘तकुए ते तकुआ खडके’ हा त्याचा पहिला अल्बम रीलिज झाला आणि तो हिट झाला. याच काळात धनिरामने आपलं नाव बदलून ‘अमरसिंग चमकीला’ असं केलं होतं.

पहिलाच अल्बम हिट झाला आणि चमकीला-सोनिया या जोडीचं पंजाबी ग्रामीण संगीतविश्वात वजन वाढलं. त्यावेळी सीनिअर असलेल्या सोनियाला जवळपास सहाशे रुपये मिळायचे, तर नवख्या चमकीलाला दोनशेच मिळायचे. जेव्हा चमकीलाने समसमान मानधनाची मागणी केली, त्यावेळी त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर चमकीलाने इतर सहगायिका शोधल्या; पण कुणासोबत तो जास्त काळ टिकू शकला नाही. अशातच त्याची भेट झाली ती अमरज्योत कौरसोबत.

अमरज्योत कौर. उच्चवर्णीय जाट कुडी. गोरीपान, सुंदर अमरज्योत ही तारस्वरात गाणं म्हणण्यासाठी प्रसिद्ध होती. तिची आणि चमकीलाची ऑन स्टेज केमिस्ट्री लोकांना फारच आवडली आणि त्यांच्या आखाड्यांना भरभरून गर्दी होऊ लागली. पुरुष मंडळी झाडांवर चढून, तर बाया गच्चीवर गर्दी करून त्यांच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ लागले. श्रोत्यांना वेड लावणार्‍या स्वरांसोबतच गाणी लिहिण्याची एक दैवी देणगी चमकीलाला लाभली होती.

चमकीलाने लिहिलेली आणि गायिलेली गाणी लोकांच्या, विशेषतः ट्रक ड्रायव्हर्सच्या जिव्हाळ्याचा विषय बनली. आखाडा असो वा लग्न, चमकीला-अमरज्योत या जोडीच्या जुगलबंदीशिवाय लोकांना सगळंच फिकं वाटू लागलं. त्यांचं ‘पेहले ललकार नाल’ हे गाणं आजही कित्येक पंजाबी लग्नांमध्ये आवर्जून वाजवलं जातं. लोकांच्या एकसुरी, नीरस, उदास जगण्याला या दोघांनी दिलेला सांगीतिक तडका काही औरच होता. रोजचे प्रश्न मांडणार्‍या गाण्यांसोबतच चमकीला प्रेमगीतं आणि द्विअर्थी गाणीही लिहू लागला. त्याचा आणि अमरज्योतचा द्विअर्थी गाण्यांचा शक्ती-तुरा चांगलाच गाजू लागला.

स्टेजवर एकमेकांशी सूर जुळवू पाहणार्‍या चमकीला आणि अमरज्योतने खर्‍या आयुष्यातही एकत्र यायचं ठरवलं. दोघांच्याही घरून या लग्नाला कडाडून विरोध झाला. त्यामागचं कारण अर्थातच जात हे होतं. अमरज्योत उच्चवर्णीय जाट, तर चमकीला दलित चांभार; पण दोघेही ठाम राहिले आणि त्यांनी लग्न केलं. हे आंतरजातीय लग्न तेव्हा बरंच गाजलं. या लग्नामुळेच चमकीला जात्यंधांनी घडवलेल्या ‘ऑनर किलिंग’चा बळी ठरला, असं म्हटलं जातं.

चमकीला ‘ऑनर किलिंग’चा बळी ठरला, असं मानणारा एक वर्ग आहे, तर चमकीला खलिस्तानी संघटनेकडून आणि तथाकथित संस्कृती रक्षकांकडून मारला गेला, असंही मानणारा एक मोठा वर्ग आहे. ऐंशीच्या दशकात खलिस्तान्यांच्या दहशतवादी कारवायांनी पूर्ण पंजाब ढवळून निघालं होतं. खलिस्तानी चळवळीत लोकसहभाग वाढावा, चळवळीला जनाधार मिळावा, या हेतूने खलिस्तानी संस्कृती रक्षकांकडून ‘समाज सुधार लहर’चा रेटा सुरू झाला.

दारू, तंबाखूवर बंदी, निव्वळ अकरा वर्‍हाड्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडणे, तरुण मुला-मुलींनी खलिस्तान समर्थक पेहराव करणे, अशा वेगवेगळ्या 13 नियमांचा यात समावेश होता. त्यावेळी अश्लील, द्विअर्थी गाणी बनवण्यावर, ऐकण्यावर बंदी आली होती. पंजाबमधलं बंदूक आणि अमली पदार्थांचं जग दाखवणारी गाणी टाळून निव्वळ धार्मिक आणि खलिस्तान समर्थक गाणी बनवावीत आणि ऐकावीत, असाही इशारा या नियमांमध्ये दिला होता.

हे सगळंच चमकीलाच्या पोटावर पाय आणणारं होतं. एकीकडे चमकीलाची लोकप्रियता वाढतच चालली होती, तर दुसरीकडे खलिस्तान्यांची भीतीही वाढत होती. लोकाग्रहास्तव द्विअर्थी गाणी बनवत राहणार्‍या चमकीलाला खलिस्तान्यांनी शिखांच्या पवित्र स्थळांपैकी एक असलेल्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात बोलावलं आणि त्याची चांगलीच कानउघाडणी केली. त्यावेळी आपल्या गाण्यांसाठी चमकीलाने माफी मागितली आणि काही काळ तो धार्मिक गाणीही लिहू, गाऊ लागला.

पण, चमकीलाचा पिंड होता लोकगायकीचा. बंधनात राहणं त्याला जमणार नव्हतं. त्याचा विरोध धार्मिक गीतांना नव्हता, तर या सक्तीला होता. त्यामुळेच जनाचं आणि मनाचं ऐकून चमकीला पुन्हा आपल्या जुन्या शैलीत द्विअर्थी गाण्यांचे आखाडे भरवू लागला. संस्कृती रक्षकांच्या नाकावर टिच्चून गर्दी खेचून आणू लागला. अख्ख्या पंजाबला बंदुकीच्या नळीवर नाचवणार्‍या खलिस्तान्यांना हे आव्हानच होतं आणि त्याचीच परिणीती पुढे चमकीलाच्या हत्येत झाली, असं मानलं जातं.

लोकांना चमकीला-अमरज्योत ही जोडी इतकी आवडायची की, त्यावेळी इतर गायकांना काम मिळणं बंद झालं होतं. कित्येकांनी गायकी सोडून दुसर्‍या क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. कित्येक जण अगदी अत्यल्प मानधनात कार्यक्रम करायला तयार असूनही लोकांचा ओढा हा चमकीलाकडेच होता. साधे कपडे आणि कसलाही झगमगाट न करणारा चमकीला लोकांना आपलासा वाटू लागला होता.

स्त्री असो वा पुरुष, चमकीलाच्या द्विअर्थी गाण्यांना प्रोत्साहन देणारे आणि विरोध करणारे दोन्हीकडे होते. लग्न असो व आखाडा, चमकीला-अमरज्योतचा हा द्विअर्थी सवाल-जवाबाचा कार्यक्रम ठरलेला असायचा. देखण्या, बुलंद आवाजाच्या, तुंबी वाजवत गाणार्‍या चमकीलाला बघण्यासाठी, ऐकण्यासाठी टेरेसवर बायका-पोरींची तुडुंब गर्दी व्हायची. इतकी गर्दी की, टेरेस कोसळून जायचं. त्यामुळेच चमकीलाला ‘कोठा धाऊ कलाकार’ म्हणजेच छप्पर तोडणारा कलाकार, अशी नवी ओळख मिळाली होती.

कधी कधी एखादा कार्यक्रम इतका वेळ चालायचा की, चमकीलाला नाइलाजाने त्या दिवशीचे दुसरे शो रद्द करावे लागायचे. चमकीलाची हीच प्रसिद्धी त्याच्या समकालीन गायकांमध्ये असूया वाढवण्यासाठी कारणीभूत ठरली असावी आणि त्यांच्यापैकीच कुणी तरी चमकीलाची हत्या केली असावी, असा एक अंदाज अजूनही व्यक्त केला जातो.

साडेतीन दशकांनंतरही चमकीलाचे मारेकरी कोण, हे अद्याप कळलेलं नाही. हीर-रांझा, सोनी-महिवालसारख्या सदाबहार प्रेमकथांची भूमी म्हणजे पंजाब. याच पंजाबमध्ये अमरज्योत-चमकीलासारख्या लोकप्रिय गायकद्वयीला आंतरजातीय प्रेमसंबंधांपायी ‘ऑनर किलिंग’ची शिकार व्हावं लागलं. छोट्याशा गोष्टींचाही खुल्या दिलाने सोहळा करणार्‍या पंजाबमध्ये संकुचित विचारसरणीच्या संस्कृती रक्षकांनी चमकीलाची दिवसाढवळ्या हत्या केली; पण त्याविरोधात आजवर कुणी ब्रही उच्चारला नाही. अगदी त्याच्या घरच्यांनीही नाहीच.
चमकीलावर आरोप केला जातो, तो द्विअर्थी गाण्यांचा; पण मुळात चमकीलाची ही गाणी म्हणजे तत्कालीन समाजाला दाखवलेला आरसाच होता. त्याच्या गाण्यांमध्ये अनैतिक, विवाहबाह्य संबंधांचा संदर्भ होता. हरितक्रांतीनंतर आलेल्या पैशातून चैनीसाठी व्यसन आणि गुन्हेगारीकडे वळलेल्या सरंजामी तरुणाईचं विदारक चित्रण त्यात होतं. त्याच्या या गाण्यांकडे पंजाबची, शिखांची बदनामी म्हणून पाहिलं गेलं आणि त्याची हत्या केली गेली.

आता प्रख्यात सिनेदिग्दर्शक इम्तियाज अलीचा ‘अमरसिंग चमकीला’ नेटफ्लिक्सवर रीलिज झालाय. यात दिलजित दोसांजने चमकीलाची, तर परिणीती चोप्राने अमरज्योतची भूमिका साकारलीय. ‘मोझार्ट ऑफ मद्रास’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ए. आर. रेहमानने या सिनेमाला संगीत दिलंय. आजवर शहरी-निमशहरी, सुखवस्तू घरातल्या पोरांची बंडखोरी मांडणार्‍या इम्तियाजने भारतातल्या गावांमधलं जातवास्तव मांडण्याचा अल्पसा प्रयत्न यात केलाय. या सिनेमातलं ‘इश्क मिटाए’ हे गाणं आवर्जून ऐकायला हवं. त्या गाण्याचे बोल आणि चित्रण चमकीलाच्या अवतीभवतीचं वातावरण मांडतं. आपल्या उण्यापुर्‍या दशकभराच्या कारकिर्दीत ‘मैं हूँ पंजाब’ असं चमकीलाला म्हणावंसं वाटतं, यातच त्याची त्यावेळची क्रेझ अधोरेखित होते.

चमकीला आणखी जगला असता, तर आज पंजाबी संगीत वेगळ्या उंचीवर पोहोचलं असतं, यात दुमत नाही. पंजाबचा पहिला आणि खराखुरा रॉकस्टार असलेल्या चमकीलाचं जीवनचरित्र मांडलंय ते पंजाबी लेखक गुलजार सिंग यांनी. त्या पुस्तकाचं शीर्षक चमकीलाचं कालातीत अस्तित्व अधोरेखित करतं. ते म्हणतं, ‘आवाज नहीं मरदी…’

365 दिवसांत 400 शो

चमकीलाच्या हत्येचं कारण त्याला मिळालेली प्रसिद्धी, त्याचं एकहाती वर्चस्व हे होतं, असाही एक तर्क मांडला जातो. अर्थात, पुरावा नसल्यामुळे हा तर्क निकालात रूपांतरित होऊ शकत नसला, तरी तो खोटा आहे, असं म्हणता येत नाही. कारण, चमकीला खरोखरच तेवढा प्रसिद्ध होता. एका वर्षात चमकीला 400 हून अधिक शो करायचा. कधी एकाच दिवशी दोन ते तीन शो त्याला करावे लागायचे.

Back to top button