क्रीडा : नक्की काय चुकलं ? | पुढारी

क्रीडा : नक्की काय चुकलं ?

निमिष वा. पाटगावकर

दरवेळी भारताच्या पराभवाची कारणे वेगळी होती. पण यावेळी आपल्या देशात, आपल्याला परिचित खेळपट्ट्यांवर आणि प्रचंड पाठिंबा घेऊन खेळत असताना हरल्याचे दु:ख जास्त आहे. भारताचे नक्की काय चुकले? नाणेफेक, खेळपट्टी की नशीब..?

विश्वचषकाचा अंतिम सामना संपून आज बरोबर आठवडा होईल. पण हृदयावर जो घाव बसला आहे तो इतका तीव्र आहे की, जणू काही काळ थांबल्यासारखा झाला आहे. गेल्या सोमवारी मी जेव्हा अहमदाबादचा निरोप घेतला तेव्हा तिथल्या गल्लीबोळापासून थेट विमानतळापर्यंत सुतकी वातावरण होते. भारत विश्वचषकाचा अंतिम सामना हरू शकतो हे विदारक सत्य असले तरी मन मानायला तयार होत नाही. या विश्वचषकाच्या निमित्ताने मी भारतीय संघाच्या कार्यक्रमानुसार सर्व 9 ठिकाणी फिरलो आणि उपांत्य आणि अंतिम सामना जमेस धरून भारताचे सर्व 11 सामने बघितले. भारतीय संघाची बस जेव्हा सामन्याआधी दोन तास मैदानात यायची आणि सामन्यानंतर एक तासाभराने हॉटेलवर जायला निघायची तेव्हा प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्या खेळाडूंची एक ओझरती झलक मिळायला तासन्तास थांबलेली असायची. भारतीय संघाला जातील तिथे या प्रचंड पाठिंब्याचा सामना करायला लागायचा. नाही म्हटले तरी हे 140 कोटी जनतेच्या अपेक्षांचे ओझे भारतीय संघाला खांद्यावर घेऊन वावरावे लागले.

ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषक जिंकून मायदेशी परतलेल्या पॅट कमिन्सच्या संघाच्या स्वागतालाही विमानतळावर चाहत्यांची गर्दी नव्हती. काही मोजके छायाचित्रकार होते तेवढेच. आपण विश्वचषक जिंकला असता तर विजयरथातून आपल्या देवांना आणले असते. अर्थात हा झाला दोन देशांतल्या संस्कृतीचा फरक. विश्वचषक जिंकायला दोन संघांत जो फरक होता, तो जास्त महत्त्वाचा होता.

भारतीय संघ या विश्वचषकात आपली सुसाट कामगिरी करत आपले सर्व 9 साखळी सामने आणि उपांत्य फेरीचा सामना जिंकून अंतिम सामन्यासाठी अहमदाबादला दाखल झाला. भारताच्या या अजेय कामगिरीच्या पार्श्वभूमीवर भारतीय प्रेक्षक आणि भारतीय संघ सामना जिंकण्याबद्दल निश्चित होते. भारताचे नक्की काय चुकले… नाणेफेक, खेळपट्टी का नशीब..?

नशिबावर सर्व दोष सोडून दिला की सोपे असते. कुणी क्रिकेटच्या भाषेत लॉ ऑफ अ‍ॅव्हरेज भारताला नेमका अंतिम सामन्यात लागला असेही म्हणेल. ही झाली मोजमाप न करता येण्यासारखी कारणे. पण पराभवाला अनेक स्पष्ट कारणेही होती. जो संघ शिखरावर असतो तो कधीतरी खाली येणारच. हा सृष्टीचा नियम आहे. पण प्रश्न असा आहे, हा नियम आपल्या संघाला वारंवार उपांत्य किंवा अंतिम सामन्यातच का लागतो? हा नक्कीच एक खराब दिवस किंवा लॉ ऑफ अ‍ॅव्हरेजचा प्रकार नाही. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019-21 जागतिक कसोटी अजिंक्यपद, 2019 विश्वचषक, 2022 टी-ट्वेंटी विश्वचषक आणि आता हा 2023 चा विश्वचषक यांचा विचार केला तर आपण उपांत्य किंवा अंतिम फेरीपर्यंत नेहमीच साखळी स्पर्धेत वर्चस्व गाजवून पोहोचलो होतो. दरवेळी पराभवाची कारणे वेगळी होती. पण यावेळी आपल्या देशात, आपल्याला परिचित खेळपट्ट्यांवर आणि प्रचंड पाठिंबा घेऊन खेळत असताना हरल्याचे दु:ख जास्त आहे. या पराभवाला मुख्य कारणे होती ती संघनिवड, खेळपट्टीचा आपणच निर्माण केलेला बागुलबुवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे असे सामने जिंकण्यासाठी लागतो त्या मानसिक कणखरतेचा अभाव.

या सर्व पराभवातून एक नक्की लक्षात येते ते म्हणजे प्रेक्षकांचा आणि मीडियाचा पाठिंबा आणि जय-पराजय यांचा काही संबंध नसतो. 2019 ला मँचेस्टरला जरी सामना होता तरी स्टँडस् निळाईने फुललेले होते आणि अहमदाबादला तर निळा समुद्रच अवतरला होता. पॅट कमिन्स म्हणाला होता की, एक लाख चाळीस हजार प्रेक्षकांना गप्प करण्यासारखा दुसरा विजय नाही. श्रेयस अय्यरच्या चौकारानंतर जेव्हा पुढचे दोन चौकार मारायला आपण अनुक्रमे 98 आणि 70 चेंडू घेतले तेव्हाच हे खचाखच भरलेले स्टेडियम गप्प झाले होते.

विश्वचषकासाठी बीसीसीआयने अहमदाबाद हे सत्ताकेंद्र म्हणून निश्चित केल्यावर पहिला सामना, भारत-पाकिस्तान लढत आणि अंतिम सामना अहमदाबादला नेण्यात आले. इंग्लंडमध्ये लंडन (लॉर्डस् आणि ओव्हल), नॉटिंगहॅम, मँचेस्टर, साऊथॅम्प्टन, कार्डिफ, लीडस्, बर्मिंगहॅम ही कुठल्याही मोठ्या स्पर्धेची ठरलेली ठिकाणे असतात. अंतिम सामना हा लॉर्डस्लाच होतो. ऑस्ट्रेलियात पर्थ, सिडनी, ब्रिस्बेन, अ‍ॅडलेड, होबार्ट, मेलबर्न ही ठकाणे ठरलेली असतात आणि अंतिम सामना मेलबर्नलाच होतो. भारतात आता ब आणि क दर्जाच्या शहरात पायाभूत सुविधा उत्तम होत आहेत. याचा आणि इतर क्रिकेटेतर कारणांचा परिणाम म्हणून विश्वचषकाचे सामने मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, बंगळूर, चेन्नई ही क्रिकेटची प्रमुख केंद्रे सोडून लखनौ, धर्मशाला, पुणे आणि अहमदाबादला नेले.

सत्ताकेंद्र बदलले आणि सर्वात मोठे स्टेडियम उभारले तरी अहमदाबादची खेळपट्टी अंतिम सामन्यासाठी योग्य होती का, इथपासून बघावे लागेल. यात खेळपट्टीचा दोष होताच; पण आपण वापरलेली खेळपट्टी पुन्हा वापरायचा हट्ट आपल्याच अंगाशी आला. जेव्हा मैदानात पडणारे दव आणि नाणेफेक हे दोन घटक आपल्या हातात नव्हते तेव्हा खेळपट्टीबाबत आपले धोरण चुकले असेच म्हणावे लागेल. ऑस्ट्रेलियन फलंदाज फिरकीला बळी पडतील या अपेक्षेने वापरलेली खेळपट्टी अंतिम सामन्यात वापरली. पण झाले भलतेच. याउलट नवीन पाटा फलंदाजीला पोषक खेळपट्टी निवडली असती तर हाय स्कोअरिंग सामना झाला असता, ज्यात भारताला आपल्या फलंदाजीच्या जोरावर बाजी मारता आली असती.

उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी जितका खेळपट्टीचा आपण बागुलबुवा आपल्यासाठीच तयार केला, त्याने भयगंड निर्माण झाला. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने शनिवारी एकदा खेळपट्टी बघितली आणि मी काही खेळपट्टीचा खास अभ्यासक नाही, असे मत देत त्याने ऑस्ट्रेलियासाठी खेळपट्टीचा विषयच संपवून टाकला. असा विचार येतो, जर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री असते तर त्यांनी खेळपट्टीची इतकी चिकित्सा केली असती? कदाचित नाही, हेच उत्तर असेल. जास्त अभ्यास करूनही परीक्षेत ब्लँक व्हायला होते तसे आपले झाले. नाणेफेक जिंकल्यावर कमिन्सने गोलंदाजी घेऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पण त्याचा खेळपट्टीचा सर्वात कमी अभ्यासच विजय देणारा ठरला. रोहित शर्मा नाणेफेकीनंतर म्हणाला, आम्ही तशीही फलंदाजीच घेतली असती. हे वक्तव्य नाणेफेक हरल्याची निराशा लपवायला असेल तर ठीक आहे. पण जिथे पाकिस्तानविरुद्ध आपण प्रथम गोलंदाजी घेतली तिथे नाणेफेक जिंकली असती तर अंतिम सामन्यातही तेच करायची अपेक्षा होती.

खेळपट्टीचा घटक इतका महत्त्वाचा केल्याने भारतीय संघ नाणेफेक हरल्यावर प्लॅन मनाविरुद्ध गेल्याने हबकला. रोहित शर्माने चेंडू नवा असताना फटकेबाजी करून उत्तम सुरुवात करून दिली. पण कमिन्सने खेळपट्टीचा अभ्यास करण्याऐवजी प्रत्येक फलंदाजाचा अभ्यास केलेले दिसत होते. कोहली-राहुल जोडी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या साखळी सामन्यासारखेच आपल्याला सुखरूप बाहेर काढेल असे वाटत होते. पण ऑस्ट्रेलिया ज्या पद्धतीने खेळत होते, त्यात त्यांच्या मनात फक्त विजयाचेच विचार होते. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या मनोवृत्तीत हाच मोठा फरक होता.

कुठलीही मोठी स्पर्धा जिंकायला खेळाडूंना त्यांच्या क्रीडानैपुण्याबरोबर गरज असते ती उत्तम फिटनेस आणि मानसिक कणखरतेची. दुर्दैवाने भारतात मानसिक कणखरतेला तितके गांभीर्याने घेतले जात नाही. इतक्या मोठ्या दबावाखाली खेळताना बाकी सर्व विसरून फक्त आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करायला उच्च दर्जाची एकाग्रता आणि मानसिक तयारी लागते. रोहित शर्मा आणि अय्यर बाद झाल्यावर कोहली आणि राहुल बचावात्मक खेळून डाव शेवटपर्यंत नेऊन मग आक्रमण करायचे का संयत आक्रमण करत धावफलक हलता ठेवायचा या संभ्रमात अडकले आणि राहुल कोशात गेला. मनात जेव्हा विजयाची शंका यायला लागते तेव्हा खेळाडूचे मनोबल डळमळीत व्हायला लागते.

भारताचा डाव 240 धावांत आटोपल्यावर भारतीय संघ जेव्हा मैदानात उतरला तेव्हा त्यांच्यात जोश दिसत नव्हता. कारण मनात कुठेतरी या धावा अपुर्‍या आहेत ही भावना टोचत होती. 1983 ला बलाढ्य वेस्ट इंडिजसमोर आपण फक्त 183 धावांचे लक्ष्य देऊनही विश्वचषक जिंकलो. त्यात कपिलच्या नेतृत्वाची कमाल होती. कपिलने हा सामना आपण जिंकू शकतो हे प्रत्येक खेळाडूच्या मनावर बिंबवले होते. रोहित शर्मा एक कर्णधार म्हणून या विश्वचषकात चांगला होता. पण जेव्हा परिस्थिती मनासारखी नाही, तेव्हा जिद्द दाखवत लढत देण्यात तो कमी पडला. सामना हा मैदानावर जिंकायचा असतो; पण त्याआधी तो मनात जिंकायचा असतो. ऑस्ट्रेलिया 3 बाद 48 असताना भारताने ना आक्रमक क्षेत्ररक्षण लावले, ना आक्रमक गोलंदाजी केली. फलंदाजांच्या चुका व्हायची वाट आपण बघत बसलो; पण तोपर्यंत सामना हातातून निघून गेला होता.

अंतिम सामन्यात पुन्हा पाच गोलंदाज घेऊन खेळायचा आपला निर्णय आपल्याला भोवला. हार्दिक पंड्या जखमी झाल्याने संघाबाहेर गेल्यानंतर आपल्याला शमी हा आपला हुकमी एक्का आहे याचा साक्षात्कार झाला. पंड्याची फलंदाजी भरून काढायला समावेश केलेला सूर्यकुमार यादव टी-ट्वेंटीच्या मनोवृत्तीतून बाहेरच यायला तयार नाही. यामुळे वीस षटके शिल्लक असताना कोहली बाद झाल्यावर जडेजा आपल्याला फलंदाजीसाठी पाठवावे लागले. सूर्यकुमार यादवपेक्षा अश्विन किंवा शार्दूल ठाकूर संघात असते तर गोलंदाजीचा पर्याय वाढला असता. मोहम्मद सिराज धावा देतो; पण चेंडू नवीन असताना तो बळीही मिळवून देतो. ऑस्ट्रेलियाचे तीन गडी बाद झाल्यावर जुगार खेळायचाच होता तर सिराजला गोलंदाजी देऊन काही धावा देऊन बळी मिळवायचा प्रयत्न करायला हवा होता. पण पुन्हा आपली पराभूत मानसिकता सिराजला लपवून ठेवण्याकडे दिसली.

विश्वचषक सहाव्यांदा जिंकताना आणि एकूण पुरुष आणि महिलांची वीस आयसीसी अजिंक्यपदे जिंकताना खेळाकडे भावनिक न होता कणखर मनाने पक्का व्यावसायिक द़ृष्टिकोन ठेवावा लागतो हे ऑस्ट्रेलियाने जगाला दाखवून दिले. उगाचच भावनांचा अतिरेक ना तिथले प्रेक्षक करत, ना खेळाडू. मैदानात जिंकायला हृदयापेक्षा डोकेच संयमी मनाबरोबर लागते यावर ऑस्ट्रेलियाचा द़ृढ विश्वास आहे. आज भारतीय क्रिकेटपटूंकडे पैसा, प्रसिद्धी, करोडो पाठीराखे हे सर्व आहे. पण कशानेही विकत घेता येत नाही असे आयसीसी स्पर्धेचे अजिंक्यपद कित्येक वर्षांत नाही.

दुर्दैवाने आज क्रिकेटपटूंचे कॅलेंडर इतके व्यस्त आहे की, सुख-दुःख अनुभवायला आणि चुकांची दुरुस्ती करायला वेळच नाही. सुनील गावस्करांच्या त्या मराठी गाण्याप्रमाणे ‘या दुनियामध्ये थांबायला वेळ कुणाला, हा जीवन म्हणजे क्रिकेटराजा, हुकला तो संपला’ सर्व क्रिकेटपटूंची अवस्था आहे. हे पराभवाचे शल्य असले तरी थांबायला आणि विचार करायला वेळच नाही. भारतीय क्रिकेटमध्ये गुणवत्तेची कमतरता आहे असे कुणी मुळीच म्हणणार नाही. पण सात महिन्यांवर आलेली टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा जिंकायची असेल तर भारतीय संघाने मानसिक कणखरता कशी वाढवायची याच्यावर भर द्यायला हवा.

Back to top button