Lijjat Papad: सात बायका अन् ‘लिज्जत पापड’ची भरारी! | पुढारी

Lijjat Papad: सात बायका अन् 'लिज्जत पापड'ची भरारी!

नीलेश बने

मुंबईतील गिरगावामधील शंकर बारी लेनच्या चाळीत राहणार्‍या सात अशिक्षित महिलांनी 64 वर्षांपूर्वी एक क्रांती घडवली. घरातला स्वयंपाक झाल्यावर मिळणार्‍या वेळेत त्यांनी पापड लाटण्याचा घरगुती उद्योग सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग 80 रुपये उधार घेऊन सुरू झालेला हा उद्योग ‘लिज्जत’ नावाचा ग्लोबल ब्रँड बनला. हा इतिहास घडविणार्‍या पद्मश्री जसवंतीबेन पोपट यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्याविषयी… (Lijjat Papad)

Lijjat Papad: सहा बायका अन् लिज्जत पापडची भरारी

ही गोष्ट आहे, 1959 मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. घरात आणि देशात समृद्धी आणायची असेल, तर हाताशी पैसे हवेत. शिकल्या-सवरलेल्यांना नोकरी मिळेल. पण ज्यांच्याकडे शिक्षण नाही, त्यांनीही काहीतरी करायला हवं, अशी तळमळ जसवंतीबेन यांना वाटत होती. त्यातूनच एके दिवशी आपल्या सहा मैत्रिणींनी घेऊन त्यांनी पापड लाटण्याचा उद्योग सुरू केला. ही सुरुवात होती ‘लिज्जत’ नावाच्या ब्रँडची. गिरगावातील चाळीत सुरू झालेले हे पापड आज जगभरात उपलब्ध असून, हजारो महिला यामुळे स्वावलंबी झाल्यात. (Lijjat Papad)
 
काहीतरी करून चार पैसे हाताशी जोडावे असा विचार
गिरगावातील चिराबाजार परिसरात शंकर बारी लेन नावाची एक चिंचोळी गल्ली आहे. या गल्लीत गुजराती, मारवडी, मराठी अशी संमिश्र वस्ती आहे. तिथल्या लोहाणा निवास या चाळीत राहणार्‍या जसवंतीबेन या सर्वसमान्य गृहिणी होत्या. गुजराती कुटुंबात जसं असतं तसंच वातावरण त्यांच्याकडेही होतं. 1959 मध्ये त्यांचं वय 27-28 वर्षांचं होतं. एका मुलाखतीत त्या सांगतात की, त्यावेळी मुलं लहान होती. दुपारी मुलं शाळेत जायची. घरातील पुरुषमंडळी कामधंद्याला जायची. मग हातात मोकळा वेळ असायचा. आम्ही मैत्रिणी गप्पा मारायचो. त्यावेळी काही शिकलेल्या महिला नोकरीला जाऊ लागल्या होत्या; पण आम्ही अशिक्षित होतो. मात्र, आपणही काहीतरी करून चार पैसे हाताशी जोडावे, असे वाटू लागले. (Lijjat Papad)
 

यातून एक दिवस विचार करताना असं वाटलं की, गुजराती घरात पापड ही रोज लागणारी गोष्ट आहे. आपण पापड बनवून विकले तर! ही कल्पना सगळ्यांना आवडली आणि मग आम्ही पापड बनवायचे ठरवले. आमच्याकडे शिक्षण नव्हतं, पैसे नव्हते, घराबाहेर काम करावं अशी शक्यता नव्हती. त्यामुळे हाताशी असलेला वेळ आणि पापड लाटण्याची असलेली कला हीच आमची ताकद होती. त्यातून आम्ही पापड लाटायला सुरुवात केली. (Lijjat Papad)

80 रुपये उधार अन् उद्योगाला सुरूवात

आम्ही जेव्हा हा उद्योग सुरू करायचं ठरवलं, तेव्हा विक्रीसाठी पापड बनवायचे तर पैसे हातात हवेत. मग आम्ही सर्व्हंट ऑफ इंडियाचे छगनलाल पारेख यांना भेटलो. काही महिला स्वतःहून पुढे येऊन काहीतरी करू पाहताहेत, हे आमचं साहस पाहून ते आनंदी झाले. त्यांनी आम्हाला 80 रुपये उधार दिले आणि आम्ही हा उद्योग सुरू केला.

बघता बघता 50 ते 60 जणी एकत्रित आल्या

जसवंतीबेन जमनादास पोपट, पार्वतीबेन रामदास थोडानी, उजमबेन नारनदास कुंडलिया, बानुबेन तन्ना, लागूबेन अमृतलाल गोकाणी, जयाबेन विठलानी अशी या मैत्रिणींची नावं होती. (सातव्या मैत्रिणीचं नाव माहीत नाही.) उडीद डाळ, हिंग, मसाले वगैरे विकत घेतले गेले आणि इमारतीच्या गच्चीवर पापड सुकवायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी हातावर मोजण्याएवढी पापडाची पाकिटे तयार झाली. भुलेश्वर मार्केटमधील एका ओळखीच्या व्यापार्‍याला हे पापड विकण्यासाठी दिले. त्या दुकानदाराकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांना पहिल्या दिवशी बनविलेल्या पापडांपासून पन्नास पैसे नफा झाला, असा उल्लेख एके ठिकाणी आढळतो. पण हळूहळू त्यांच्या पापडांची मागणी वाढू लागली. त्यांच्यासोबत आसपासच्या आणखीही काही महिला येऊ लागल्या. बघता बघता 50 ते 60 जणी झाल्या. आता काम करणार्‍या महिला वाढल्या; पण धंदा काही फारसा वाढत नव्हता. त्याचवेळी पुरुषोत्तम दामोदर दत्तानी देवासारखे धाऊन आले.

पुरुषोत्तम दामोदर दत्तानी यांचे महिलांना मोलाचे मार्गदर्शन

बायका-बायका एकत्र येऊन पापड लाटले जात होत होते, विकलेही जात होते; पण त्यातून फारसे पैसे हाताशी लागत नव्हते. गणित फारसं काही जमत नव्हतं. त्याचवेळी आपल्यालाही हे काम करता येईल म्हणून काम मागायला येणार्‍या परिसरातील बायकाही वाढत होत्या. आता हा व्यवसाय वाढू शकतो, हे कळलं होतं; पण कसा वाढवायचा, हे काही नीटसं कळत नव्हतं. त्यावेळी दत्तानी बाप्पांनी या बहिणींना धंदा काय असतो ते शिकवलं. जसवंतीबेनच्या घरी एक फोटो दिसतो. त्याखाली लिहिलेलं असतं… लिज्जत पापड समूहाचे पितामह, पुरुषोत्तम दामोदर दत्तानी. जसवंतीबेन सांगत की, या माणसानं आम्हाला धंद्यातील ब्रँडिगं, पॅकेजिंग, नेटवर्क, माणसांचं मॅनेजमेंट असल्या बारीकसारीक गोष्टी शिकवल्या. आपल्या बहिणींना चार पैसे मिळावेत आणि त्या आपल्या पायावर उभ्या रहाव्यात, अशी त्यांची मनापासूनची इच्छा होती. ते आमचे खरे मार्गदर्शक होते. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली धंदा शिकलो.

गिरगावात सकाळी पाच वाजता महापालिकेचे पाणी येते. तिथपासून इथल्या घरात दिवस सुरू होतो. लिज्जतचं कामही सकाळी पाच वाजल्यापासून सुरू व्हायचं. बायका पीठ न्यायला यायच्या. आज त्या पीठ घेऊन जायच्या. उद्या पापड लाटून आणून द्यायच्या. त्यांना लगेच पैसे मिळायचे. नंतर त्यांचे पैसे अकाऊंटवर जमा होऊ लागले.

या उद्योगाला1962 मध्ये ‘श्री महिला गृह उद्योग-लिज्जत पापड’ असे नाव दिले

सुुरुवातीला या महिलांना प्रशिक्षणही दिलं गेलं. त्यात अगदी केस गळू नये म्हणून डोक्याला रुमाल कसा बांधायचा इथपासून प्रशिक्षण दिलं गेलं. त्यामुळे स्वच्छता आणि दर्जा यात कुठेही तडजोड करायची नाही, हा आमचा ठाम निर्धार होता. या दर्जामुळेच आमचे पापड इतरांपेक्षा उत्तम ठरले आणि लोकांच्या पसंतीच उतरले. दुसरं आम्ही ठरवलं होतं, ते म्हणजे सरकारी मदत घ्यायची नाही. म्हणूनच आम्ही सहकारी तत्त्वावर काम सुरू केलं, असं जसवंतीबेन आत्मविश्वासानं सांगत. 1962 मधे श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड, हे नाव ठेवण्यात आलं. लिज्जत हे नावही या महिलांनीच ठरवलंय. त्यासाठी नावांच्या चिठ्ठ्या तयार करून स्पर्धा घेतली होती. त्यात धीरजबेन रूपारेल यांनी दिलेलं ‘लिज्जत’ हे नाव स्वीकरलं गेलं. ही स्पर्धा जिंकली म्हणून त्यांना पाच रुपयांचं बक्षीसही देण्यात आलं. गुजरातीमधे लिज्जत म्हणजे चविष्ट. लिज्जत की ही इज्जत बढेगी, हा त्यांचा विश्वास होता, जो पुढं सार्थ ठरला.

हळू हळू 45 ते 50 हजार महिला या उपक्रमाशी जोडल्या

वयवर्षे 18 पासून वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वांना काम दिलं गेलं. पहिल्या वर्षी 6,196 रुपये नफा झाला. हळूहळू सदस्यसंख्या वाढत गेली. 1962-63 सालचा संस्थेचा नफा होता एक लाख 82 हजार रुपये. मग पुढे 1966 मध्ये हा उद्योग नोंदणीकृत करण्यात आला. गिरगावातील जागा कमी पडू लागली. मग वडाळा आणि मग हळहळू देशभर अनेक केंद्रे सुरू झाली. बघता बघता 45 ते 50 हजार महिला या उपक्रमाशी जोडल्या गेल्या.

टीव्हीवर आपली जाहिरात दिसावी असं ठरलं

संकटं मग घरातली असोत की घराबाहेरची. एखादी स्त्री जेव्हा त्या संकटाशी दोन हात करायला कंबर कसून उभी राहते, तेव्हा ती काय करू शकते याची असंख्य उदाहरणं जगानं पाहिलीत. लिज्जतपुढेही कमी संकटे आली नाही. सर्वात पहिलं संकट आलं ते पावसाळ्याचं. पहिला पावासाळा आला आणि काम ठप्प पडलं. पावसाळ्यात पापड सुकणं अशक्य असल्यानं चार महिने अवघड गेले आणि पुढल्या पावसाळ्यात मात्र पापड सुकवण्याची नवी क्लृप्ती शोधण्यात आली. खोलीमध्ये स्टोव्हच्या आगीच्या उष्णतेने पापड सुकविण्याचा प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. आता पावसाच्या दमटपणावरही मात करण्यात आली. त्यामुळे बाराही महिने कामाचं गणित बांधलं गेलं. काही यंत्रे आणण्यात आली. प्रक्रियांचं स्टॅडर्डायझेशन करण्यात आलं. सत्तर-ऐंशीच्या दशकात टीव्ही घराघरात येऊ लागला होता. त्याचवेळी लिज्जतचा कारभार वाढत होता. त्यामुळे टीव्हीवर आपली जाहिरात दिसावी, असं ठरलं. उत्पादनाच्या विक्री वाढावी हा हेतू होताच. पण, इथं काम करणार्‍या महिलांनाही आपण या कंपनीत काम करतो, याचा अभिमान वाटावा यासाठीही जाहिरात महत्त्वाची होती.

देशाच्या कानाकोपर्‍यात लिज्जत हे नाव पोहचले

1972 मध्ये मुंबई दूरदर्शनची सुरुवात झाली. त्यावेळी रामदास पाध्येंचा ‘अर्धवटराव’ हा बोलक्या बाहुल्यांचा खेळ टीव्हीवर लोकप्रिय ठरला होता. असाच बोलका बाहुला वापरून लिज्जतची पहिली जाहिरात लिज्जतने केली. ही साधारणतः 1978-79 ची गोष्ट असावी. रामदास पाध्येंनी घडविलेल्या या सशाच्या बाहुल्याचं नाव ठरलं बनी. हा बनी पुढे लिज्जतचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर ठरला. 80-90 च्या दशकात टीव्हीवरील जाहिरात तुफान गाजली. ‘कुर्रम कुर्रम मजेदार, लज्जतदार, सात स्वाद मे लिज्जत लिज्जत पापड!’ ही जिंगल लोकांच्या तोंडात बसली. या जाहिरातीमुळे देशाच्या कानाकोपर्‍यात लिज्जत हे नाव परिचित झाले. देशभर लागणार्‍या जत्रांमध्ये लिज्जतचे स्टॉल लागू लागले. दुकानांवर लिज्जतचा ब्रँड झळकू लागला. आज ऑनलाईन ग्रोसरी स्टोअरवरही हा पापड उपलब्ध आहे.

‘लिज्जत पापड ब्रँड’ला अनेक पुरस्कार

सात बायका आणि 80 रुपयांपासून सुरू झालेल्या या उद्योगाचा 2002 मधला टर्नओव्हर 10 करोडच्यावर होता. 15 मार्च 2009 रोजी या उपक्रमानं आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला. भारतभर 62 हजारांहून अधिक शाखा आणि 45 हजारांहून अधिक महिलांना त्यांनी रोजगार दिला होता. या संस्थेला 1998-99 मध्ये सर्वोत्तम गृहोद्योग पुरस्कार मिळाला. 2005 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना ब्रँड इक्विटी पुरस्कार देण्यात आला. असे अनेक पुरस्कार मिळाले. आज हा ब्रँड जगभरातील बाजारात पोहोचला आहे.

Back to top button