टेक इन्फो : तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार | पुढारी

टेक इन्फो : तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार

अ‍ॅपल या तंत्रज्ञान विश्वातील जगप्रसिद्ध कंपनीने अलीकडेच आणलेल्या ‘अ‍ॅपल व्हिजन प्रो’ नामक हेडसेट कम गॉगलची सध्या चर्चा आहे. अ‍ॅपलच्या आजवरच्या भन्नाट गॅजेटस्मधील सर्वात अद्ययावत आणि अत्याधुनिक गॅजेट म्हणून याकडे पाहिले जात आहे. आभासी आणि वास्तवातले जग यांच्या सुरेख संगमाची अनुभूती देणारे हे गॅजेट आहे. स्मार्टफोननंतर पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर या गॅजेटने दिले आहे. आणखी काही वर्षांनी स्मार्टफोन कालबाह्य करण्याची क्षमता यामध्ये आहे.

गेल्या दोन-तीन दशकांत माणसाने तंत्रज्ञानात जेवढी प्रगती केली, तेवढी प्रगती जवळपास आतापर्यंतच्या मानवी इतिहासात झाली नव्हती, असे म्हटले जाते. सध्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उदयास येणार्‍या विविध आविष्कारांकडे पाहून ही मांडणी योग्य असल्याची खात्री पटते. उडणार्‍या गाड्या, शरीरातल्या प्रत्येक अवयवांवर आणि रक्तासारख्या अनेक घटकांवर दर क्षणाला नियंत्रण ठेवणारे आणि त्यात कुठेही काही बिघाड आढळल्यास त्याची सूचना देणारे नॅनोरोबोज, मुंबई-पुणे अंतर दहा मिनिटांत कापतील अशा वेगाने धावणार्‍या हायपरलूप ट्रेन्स या आणि अशा अनेक कल्पनातीत आविष्कारांनी तंत्रज्ञानाचं विश्व समृद्ध बनत चालले आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑग्मेंटेड रिअ‍ॅलिटी यासारख्या शब्दांची या क्षेत्रात चलती आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या या मनोहर आणि रम्य विश्वात साधारणत: दशकभरापूर्वीपासून वेअरेबल गॅजेटस्ची संकल्पना रुजण्यास सुरुवात झाली. त्यातून मोबाईल फोन हातात घेऊन फिरण्यापेक्षा मनगटावर घड्याळ रूपात बांधण्याची सुविधा उपलब्ध झाली. वेअरेबल गॅजेटस्मध्ये सर्वात मोठी खळबळ उडवून दिली ती ‘गुगल ग्लास’ने. डोळ्यावर घालायच्या या चष्म्यामध्ये एक कॅमेरा, एक पडदा, एक अतिशय लहान कॉम्प्युटर आणि इंटरनेटचे कनेक्शन अशा गोष्टींचा समावेश आहे. या चष्म्याला ‘हा फोटो काढ’ अशी सूचना दिली की, तो फोटो काढतो, व्हिडीओ बनवतो आणि गुगल ग्लासच्या कॉम्प्युटरमध्ये साठवतोही.

संपूर्ण दिवसभरात हातही न लावता याच्या मदतीने वेगवेगळी अनेक कामे पार पाडण्याची क्षमता या गुगल ग्लासमध्ये होती. परंतु, सुरक्षिततेच्या कारणामुळे त्याला जगभरातून विरोध होत गेला आणि हा प्रयोग मागे पडला. परंतु, आता ‘गुगल ग्लास’च्या आठवणी नव्याने जाग्या झाल्या आहेत. याचे कारण म्हणजे, अ‍ॅपल या ‘गुगल’च्या कट्टर प्रतिस्पर्धी असणार्‍या आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगप्रसिद्ध असणार्‍या कंपनीने गुगल ग्लासपेक्षाही किती तरी पटींनी आधुनिक, अद्ययावत असा एक अवतार विकसित केला आहे. या आविष्काराचे नाव आहे, ‘अ‍ॅपल व्हिजन प्रो.’ जवळपास गेल्या पाच वर्षांपासून अ‍ॅपलच्या तज्ज्ञांची संपूर्ण टीम यावर काम करत होती. त्याची चर्चाही अनेक दिवसांपासून सुरू होती; पण अखेरीस अ‍ॅपलने हा क्रांतिकारी हेडसेट कम गॉगल सादर केला आहे.

सादरीकरणानंतर साहजिकच जगभरात त्याची प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. अ‍ॅपलचे हे पहिले व्हीआर उपकरण आहे. अ‍ॅपलच्या आजवरच्या भन्नाट गॅजेटस्मधील सर्वात अद्ययावत आणि अत्याधुनिक गॅजेट म्हणून याकडे पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, अ‍ॅपलने या गॅजेटसाठी स्वतंत्र अशी ऑपरेटिंग सिस्टीमही तयार केली आहे. व्हिजन ओएस नामक ही ऑपरेटिंग सिस्टीम असणारा व्हिजन प्रो हा एकप्रकारचा हेडसेट असून, तो डोक्यावर घालून त्यामधील स्क्रीनद्वारे अद्भुत करणारा अनुभव घेता येतो. आभासी जग आणि वास्तवातले जग यांच्या सुरेख संगमाची अनुभूती ‘याचि देही याचि डोळा’ देणारे हे गॅजेट आहे.

नवतंत्रज्ञानाच्या विश्वात एआर आणि व्हीआर या दोन शब्दांचा वापर केला जातो. एआर म्हणजे ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी आणि व्हीआर म्हणजे व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी. व्हिजन प्रो हे पूर्णपणे व्हीआरही नाही आणि एआर प्रकारचे गॅजेटही नाही. कारण, वास्तविक जगातील गोष्टी डोळ्यांना यामध्ये दिसत नाहीत. त्यातील कॅमेर्‍याद्वारे वास्तविक जग स्क्रीनवर पाहता येते. यामध्ये पाच प्रकारचे सेन्सर्स आणि दोन कॅमेर्‍यांचा वापर करण्यात आला आहे. याखेरीज दोन अल्ट्रा हाय रिझॉल्युशन डिस्प्ले, आर1 चिप आणि स्पेशल ऑडिओ सिस्टीम व सहा मायक्रोफोन्स जोडलेले आहेत. यातील थ्री-डी कॅमेर्‍यामुळे हा हेडसेट घातलेली व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचा एक थ्री-डी व्हिडीओही तयार करू शकेल. याखेरीज हा हेडसेट परिधान केल्यानंतर टी.व्ही. शो आणि गेमिंगचा अनुभव शतपटींनी सुधारलेला असेल. आपण स्वतः गेममध्ये उपस्थित आहोत, अशाप्रकारे यूजर्सना गेम्स खेळता येतील. अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक यांनी हा हेडसेट म्हणजे एक क्रांतिकारी प्रॉडक्ट असल्याचे म्हटले आहे. लोकांच्या आयुष्यातील टेक्नॉलॉजीची भूमिका हा हेडसेट बदलेल, असेही ते म्हणाले.

टीम कूक यांचा विश्वास आणि दावा हा यथोचित म्हणावा लागेल. कारण अ‍ॅव्हेंजर्स’सारख्या हॉलीवूडपटांमध्ये असणारा नायक ज्याप्रमाणे हवेतच कॉम्प्युटरवरील फीचर्स वापरताना दिसायचा तशा प्रकारचा अनुभव या हेडसेटमुळे घेता येणार आहे. कारण, ‘व्हिजन प्रो’ डोळे, हात आणि आवाजाने नियंत्रित करता येऊ शकते. उदाहरणार्थ, यामधील अ‍ॅप्स हे केवळ आयकॉन पाहून नियंत्रित केले जाऊ शकतात. आवाजाद्वारेही आदेश देता येतात. तसेच हा हेडसेट ब्लूटूथशी कनेक्ट होतो. आयफोन आणि मॅकसहदेखील पेअर होतो. आगामी काही दिवसांत घरातील स्मार्ट टी.व्हीं.ची जागा ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी हेडसेट घेऊ शकतात. व्हिजन प्रो बायोमेट्रिकसाठी वापरकर्त्याच्या डोळ्यांमधील रेटिना स्कॅन करण्यासाठी ऑप्टिक आयडीचा वापर केला जातो आणि तुम्हाला हेडसेटमध्ये लॉग इन करता येते.

व्हिजन प्रो वापरणारा व्यक्ती म्हणजे चालते-बोलते वर्किंग स्टेशन बनणार आहे. कार्यालयीन बैठका, चर्चासत्रे या सर्वांची परिमाणेच यामुळे बदलून जाणार आहेत. सद्यस्थितीत स्मार्टफोननंतर पुढचा टप्पा काय, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात होता. त्याचे उत्तर व्हिजन प्रोने दिले आहे. आगामी काही वर्षांनी स्मार्टफोन कालबाह्य करण्याची क्षमता यामध्ये आहे. कारण, व्हिडीओ कॉलिंग, शॉपिंग, ट्रॅव्हलिंग आणि व्हर्च्युअल मिटिंगसह चित्रपट पाहणे, गेमिंग या सर्वांसाठी हा हेडसेट उपयुक्त ठरणारा आहे. या डिव्हाईसचा बॅटरी बॅकअप 2 तासांचा आहे. अ‍ॅपलच्या या नव्या आविष्काराचे अन्य अनेक पैलू पुढील वर्षी तो प्रत्यक्षात बाजारात दाखल झाल्यानंतर समोर येतील. सद्यस्थितीत त्याची किंमत 2.88 लाख रुपये ठेवण्यात आल्याबद्दल अनेकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

अर्थात, त्याची किंमत. परंतु, याची दुसरी बाजूही विचारात घेणे गरजेचे आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाढणारा स्क्रीन टाईम. आज मोबाईल आणि अन्य गॅजेटस् वापरणार्‍यांच्या द़ृष्टीने वाढलेला स्क्रीन टाईम हा शारीरिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण करणारा ठरत आहे. मायोपियासारख्या नेत्रव्याधी चिमुकल्या मुलांमध्ये दिसून येत आहेत. अशा स्थितीत अ‍ॅपल व्हिजन प्रोसारखी गॅजेटस् नव्या समस्या तयार करणारी ठरू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे, अशा गॅजेटस्मुळे भौतिक जगापासून अलिप्तता वाढू शकते. कौटुंबिक सदस्य, विशेषत: मुले, आभासी क्षेत्रात जास्त मग्न होऊ शकतात.

वास्तविक, जीवनातील परस्परसंवाद, एकत्र घालवलेला गुणवत्तापूर्ण वेळ आणि आवश्यक सामाजिक कौशल्यांच्या विकासात यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. कौटुंबिक बंध निर्माण करण्यासाठी आणि भावनिक संबंध वाढवण्यासाठी प्रत्यक्ष संबंध आणि परस्परसंवाद गरजेचा आहे; पण व्हिजन प्रोमुळे यामध्ये घट होऊ शकते. शेवटचा मुद्दा म्हणजे कोणत्याही तांत्रिक प्रगतीचा विचार हा गोपनीयता आणि डिजिटल सुरक्षिततेच्या समस्यांच्या परिप्रेक्ष्यातून करणे गरजेचे असते. अ‍ॅपलच्या नव्या हेडसेटच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा तिसरा डोळा कुटुंबातील प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवण्यास सज्ज होणार आहे. त्यामुळे खासगीपणा, गोपनीयता या सर्वांबाबतही विचार होणे गरजेचे आहे.

महेश कोळी,
आय.टी. तज्ज्ञ

Back to top button