हवामान : मान्सूनचे भाकीत; ‘एल निनो’चा प्रभाव | पुढारी

हवामान : मान्सूनचे भाकीत; ‘एल निनो’चा प्रभाव

यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव जाणवणार असून, भारतात दुष्काळ पडण्याची शक्यता असल्याचे भाकीत आंतरराष्ट्रीय संस्थांनी केले आहे. यामुळे देशभरात काहीसे चिंतेचे वातावरण आहे. तथापि, मान्सूनवर परिणाम करणारे काही प्रमुख घटक असून, ‘एल निनो’ हा त्यापैकी एक आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणारी वादळे, हवामान बदलांचे परिणाम यांना दुर्लक्षून मान्सूनचे अनुमान वर्तवणे योग्य ठरणार नाही.

एल निनोमुळे येत्या मान्सूनवर प्रतिकूल परिणाम होईल व भारतात दुष्काळ पडेल, असे अंदाज जागतिक आणि देशांतर्गत पातळीवरील काही हवामानतज्ज्ञ व हवामानाचा अभ्यास करणार्‍या संस्थांकडून वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे अर्थातच देशभरात काहीसे चिंतेचे वातावरण आहे. याचे कारण भारताची अर्थव्यवस्था मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. पावसाचे पाणी धरणांमध्ये साठवून ते वीजनिर्मितीसाठी, शेतीसाठी, पिण्यासाठी आणि कारखान्यांसाठी वापरले जाते. त्यामुळेच मान्सूनला आपल्या देशात फार महत्त्व आहे. अन्नसुरक्षेपासून जनावरांच्या संगोपनापर्यंत आणि पिण्याच्या पाण्यापासून ते जंगली पशू-पक्ष्यांपर्यंत पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतामध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मान्सूनचा अंदाज वर्तवला जातो. हा अंदाज प्रामुख्याने दोन टप्प्यांमध्ये वर्तवण्यात येतो. पहिल्या टप्प्यातला अंदाज 15 एप्रिलच्या सुमारास वर्तवला जातो, तर दुसर्‍या टप्प्यातला फेरअंदाज 20 जूनदरम्यान वर्तवला जातो. पहिल्या टप्प्यातल्या अंदाजाला पूर्वानुमान म्हटले जाते. यामध्ये डिसेंबर-जानेवारी महिन्यातील अटलांटिक उत्तर महासागर पृष्ठभाग तापमान, फेब्रुवारी-मार्च महिन्यातील हिंदी महासागर विषुववृत्तीय तापमान, फेब्रुवारी-मार्च महिन्यातील पूर्व आशियायी प्रदेशातील तापमान आणि हवेचा दाब, जानेवारी महिन्यातील वायव्य युरोपातले जमिनीवरचे तापमान, मार्च महिन्यातले प्रशांत महासागर विषुववृत्तीय प्रदेशातील तापमान या पाच घटकांचा अभ्यास केला जातो.

दुसर्‍या टप्प्यातील अंदाज वर्तवताना पहिल्या टप्प्यातल्या अंदाजाची फेरतपासणी होते आणि ताजे संदर्भ तपासून अंदाज दिला जातो. त्यामुळे तो अधिक अचूक असतो. तसेच दुसर्‍या टप्प्यातल्या अंदाजात या पाच घटकांबरोबरच आणखीही एका घटकाचा समावेश होतो, तो म्हणजे प्रशांत महासागर-उष्णजल प्रभाव अर्थात ‘एल निनो’ किंवा ‘ला निना.’ या घटकांच्या अभ्यासासह केलेल्या अंदाजाला लांब पल्ल्याचा अंदाज म्हटले जाते. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातल्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान मोजले जाते. हे ठिकाण दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीलगत पेरू या प्रदेशाच्या जवळ आहे. मान्सून पावसाचे अंदाज हा अत्यंत गुंतागुंतीचा, क्लिष्ट आणि संवेदनक्षम विषय आहे. अंदाजाची अचूकता फार महत्त्वाची असते. यासाठी सर्व घटकांचे आकलन, निरीक्षण महत्त्वाचे आहे. केवळ एकाच घटकाच्या परिणामांवरून अंदाज वर्तवणे योग्य ठरणारे नाही.

सद्यस्थितीत हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि प्रशांत महासागर यांचे तापमान समान असल्याचे दिसून आले आहे. एल निनो अद्याप सक्रिय झाला आहे, असे ठामपणाने दिसून आलेले नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गेल्या दशकभरामध्ये जागतिक हवामान बदलांचा परिणामही मान्सूनवर ठळकपणाने जाणवू लागला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्याकडे झालेला अवकाळी पाऊस, गारपीट हा सर्व हवामान बदलांचा परिणाम आहे. त्यामुळे मान्सूनचा अंदाज वर्तवताना एकाच घटकावर लक्ष्य केंद्रित करून चालणार नाही; तर अन्य घटकही तपासणे आवश्यक आहे. 2002 पासून मी हवामान बदलांच्या परिणामांचा अभ्यास करत आहे. 2003 मध्ये पहिल्यांदा ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल हा विषय प्राधान्याने पुढे आला. अमेरिकेतील शास्त्रज्ञ आणि माजी उपराष्ट्रपती अल गोर यांनी यामध्ये प्रमुख भूमिका बजावली. त्यांनी असे सांगितले की, पृथ्वीभोवतीच्या वातावरणाचे तापमान वाढत आहे आणि त्या तापमानवाढीमुळे हवामानामध्ये बदल होत आहे. 1880 सालापासूनच्या तापमानाची माहिती अभ्यासताना असे लक्षात येते की, 1960 नंतर पृथ्वीवरील तापमानवाढीची प्रक्रिया अधिक गतिमान झाली आहे. याचे कारण यानंतरच्या काळात एकीकडे औद्योगिकीकरण आणि वाहतूक व्यवस्था यामध्ये वाढ होत गेली; तर दुसरीकडे कार्बन शोषून घेणारी निसर्गातील यंत्रणा मानवाकडून नष्ट केली जाऊ लागली. आशिया खंडातील 65 दशलक्ष आणि आफ्रिका खंडातील 80 दशलक्ष हेक्टर वनसंपदा आतापर्यंत नष्ट करण्यात आली आहे. यामुळे वातावरणामध्ये कार्बनचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे. त्यामुळे हवामान बदल हा घटक मान्सूनच्या अंदाजांमध्ये दुर्लक्षून चालणार नाही.

याचा अर्थ एल निनोचा प्रभाव मान्सूनवर होत नाही, असे नाही. यंदा एल निनोविषयीचे भाकीत नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फोरीक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एनओएए) या अमेरिकेच्या हवामान अभ्यासक संस्थेने केले आहे. 1970 सालापासून ही संस्था पृथ्वीवरील महासागर, वातावरण आणि किनारी प्रदेशांचा अभ्यास करत आहे. या संस्थेच्या मते, साधारणत: जून ते डिसेंबर 2023 या काळात एल निनोचा प्रभाव 55 ते 60 टक्के राहील. यामुळे सुरुवातीला अवकाळी पाऊस आणि नंतर दुष्काळाचे सावट पाहायला मिळू शकते. एल निनोचा थेट प्रभाव मान्सूनवर होण्याची शक्यता असल्याने या नैसर्गिक घडामोडी घडू शकतात, असे ‘एनओएए’चे म्हणणेे आहे. ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेने याच संस्थेची री ओढली आहे. त्यानुसार जुलै ते ऑक्टोबर या मान्सूनच्या प्रमुख महिन्यांमध्ये एल निनोचा प्रभाव राहणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून माझ्या मान्सून मॉडेलद्वारेही पावसाचा अंदाज वर्तवत असतो. हा अंदाज मार्च ते मे या कालावधीतील हवामानावर आधारित असतो. यामध्ये महाराष्ट्रातील 15 स्थानकांतील हवामानाची आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर आणि ती 15 स्थानिकांच्या प्रारूपामध्ये भरल्यानंतर 25 ते 26 मे रोजी जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाचा अंदाज मी वर्तवत असतो. यामध्ये कोकणातील दापोली, पुणे, कोल्हापूर, कराड, नाशिक, धुळे, जळगाव, परभणी, अकोला, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ यांचा समावेश आहे. या ठिकाणच्या गेल्या 30 वर्षांतील डेटावर आधारित हा अंदाज मांडला जातो. प्रत्येक ठिकाणचा पाऊस वेगळा असल्यामुळे स्थानिक ठिकाणचा अंदाज मिळणे गरजेचे आहे. शेतीच्या नियोजनासाठीही त्याची नितांत गरज असते. हे लक्षात घेऊन या मॉडेलची निर्मिती मी केली आणि त्याचे देशातील पेटंटही माझ्याकडे आहे. एल निनोचा विचार करता त्याचा मान्सूनवर प्रभाव होत नाही, असे बिलकूल नाही. आजवर ज्या-ज्यावेळी दुष्काळ पडले त्या-त्यावेळी एल निनोचा प्रभाव दिसून आलेला आहे.

2004, 2012, 2015, 2018 या वर्षांमध्ये महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळांच्या वेळी एल निनो सक्रिय झालेला होता, हे दुर्लक्षून चालणार नाही; पण हवामानात एक घटक काम करत नाही. तापमान हा हवामानावर प्रभाव टाकणारा मुख्य घटक आहे. प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान वाढले की, तिथे हवेचा दाब कमी होतो. तेथील हवेचा दाब कमी झाला की, हिंदी महासागरावरील सर्व वारे त्या दिशेने सरकतात. वार्‍यांबरोबरच ढगही त्या दिशेने जातात. परिणामी, आपल्याकडे अवर्षण आणि दुष्काळ पडतो. या स्थितीत ढग आणि बाष्प प्रशांत महासागराकडे गेल्याने भारतावर कोरडे वारे वाहू लागतात. असे असले तरी इंडियन डायपोल जर सक्रिय (पॉझिटिव्ह) असेल, तर त्या स्थितीला आवर घातला जातो. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर येथील तापमान त्याच्यात पॉझिटिव्ह फरक दिसला, तर प्रशांत महासागराच्या दिशेने जाणारे वारे, ढग, बाष्प इथेच खेचून धरले जातात.

यामुळे भारतावर एल निनोचा परिणाम कमी जाणवतो. दुष्काळसद़ृश स्थिती उद्भवत नाही. भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात येणार्‍या अंदाजातून इंडियन डायपोल पॉझिटिव्ह आहे की नाही, ही बाब स्पष्ट होईल. पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला फारशी भीती बाळगण्याची गरज नाही. त्यानंतर 25 मे रोजी आपल्या मॉडेलचा अंदाज येईल. मार्च-एप्रिल-मे महिन्यातील माहितीवर तो आधारित असेल. या काळातील कमाल तापमान, वार्‍याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि सकाळची व दुपारची आर्द्रता यांचा अभ्यास करून तो मांडला जाईल. गतवर्षी जून महिन्यामध्ये आणि जुलैच्या 15 तारखेपर्यंत पाऊस कमी पडणार असून, शेतकर्‍यांनी पेरण्याची घाई करू नये, असे या मॉडेलनुसारच मी सांगितले होते. वार्‍याचा वेग कमी असेल तर हमखास जून-जुलै महिन्यामध्ये मान्सूनमध्ये खंड पडतो.

आज जगभरातील हवामानतज्ज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञांकडून ‘हवामानाची आणीबाणी’ सुरू झाल्याचे सांगितले जात असून, 2030 पर्यंत तिची दाहकता उत्तरोत्तर वाढत जाईल, असे म्हटले जात आहे. अलीकडेच अमेरिकेत प्रचंड वादळ झाले आणि त्यामुळे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून आले. हा हवामान बदलांचा परिणाम आहे. येत्या काळात हवामान बदलांचे परिणाम अनेक देशांना बसणार आहेत. 2003-04 मध्ये अल गोर आणि पचौरी यांनी एक लेख लिहून हवामान बदलांमुळे येणार्‍या काळात काही देशांत पावसाचे प्रमाण वाढेल आणि काही देशांत ते लक्षणीय कमी होईल, असे भाकीत वर्तवले होते. म्हणूनच हवामान बदलांचा मुद्दा दुर्लक्षून एकाच घटकावरून मान्सूनविषयीचे भाकीत वर्तवणे योग्य ठरणार नाही. सर्व घटकांचे बारकाईने निरीक्षण करून, त्यांची संगती लावून मगच अंदाज वर्तवल्यास त्याची अचूकता निश्चितच अधिक असेल. मुळात जून ते ऑक्टोबर या काळात कोणते बदल होतात, हे पाहणे अधिक गरजेचे आहे. उदाहरणार्थ, बंगालच्या उपसागरात काही वेळा मोठी वादळे निर्माण होतात आणि पूर्वेकडचा भाग मान्सूनने व्यापला जातो. अलीकडील काळात दरवर्षी 10 ते 12 वादळे मान्सून काळात तयार होतात, असे दिसून आले आहे. ही वादळे तापमानामुळे तयार होतात. तापमान वाढल्यामुळे हवेचे दाब तयार होतात, वारे चक्राकार वाहायला सुरुवात होते आणि वादळांची निर्मिती होते. सांगण्याचा मुद्दा म्हणजे, हवामान बदलांच्या काळात अनेकदा मान्सूनचे अंदाज चुकण्याचीही शक्यता असते.

तात्पर्य, एल निनोच्या निकषावरील अंदाजांची भीती बाळगण्यापेक्षा त्याकडे एक सूचक इशारा म्हणून पाहून येत्या काळातील पाण्याच्या नियोजनाची चर्चा अधिक होणे गरजेचे आहे. त्याद़ृष्टीने येणार्‍या दीड-दोन महिन्यांमध्ये पाण्याचा काटकसरीने वापर करण्यावर भर दिला पाहिजे. तसेच दुर्दैवाने जर दुष्काळाची स्थिती उद्भवलीच तर त्यासाठीच्या नियोजनाचाही विचार आतापासूनच केला गेला पाहिजे. कारण, वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक अशा सर्व स्तरांवर दुष्काळाच्या झळा प्रतिकूल परिणाम करणार्‍या ठरतात.
(लेखक दक्षिण आशिया फोरम ऑन अ‍ॅग्रीकल्चर मेटरॉलॉजीचे संस्थापक सदस्य आहेत.)

डॉ. रामचंद्र साबळे

Back to top button