क्रीडा : ‘फिफा’चा थरार | पुढारी

क्रीडा : ‘फिफा’चा थरार

भारतामध्ये क्रिकेटची लोकप्रियता सर्वाधिक असली तरी जगभरातील सर्वांत लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे. दर चार वर्षांनी फुटबॉलचा महाकुंभमेळा म्हणजेच विश्वचषक स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदाचा हा महाकुंभमेळा कतारमध्ये 18 नोव्हेंबरपासून भरणार आहे. संपूर्ण जगभरात अतीव उत्साहाने पाहिल्या जाणार्‍या या महाकुंभमेळ्याविषयी…

जगातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून फुटबॉलकडे पाहिले जाते. स्टेडियममध्ये कोणताही सामना पाहण्यासाठी होणार्‍या गर्दीचा विचार केला तर हा विक्रम फुटबॉल सामन्याच्याच नावावर आहे. 1950 चा विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी एक लाख 99 हजार 854 नागरिकांनी स्टेडियममध्ये उपस्थिती दर्शविली होती. या लोकप्रियतेमागचे कारण म्हणजे 211 देशांतील एकूण 27 कोटी नागरिक फुटबॉल खेळतात. याचाच अर्थ असा की, जगातील एकूण लोकसंख्येच्या सहा टक्के नागरिक फुटबॉल खेळतात. म्हणजेच दर 25 माणसामागे 1 फुटबॉलपटू आहे. युरोप आणि लॅटिन अमेरिकेत तर प्रत्येक 6 व्यक्तीमागे 1 व्यक्ती फुटबॉलपटू आहे.

फुटबॉलचा विश्वचषक हा तर जगभरातील समस्त फुटबॉलप्रेमींसाठी जणू कुंभमेळाच. यंदाचा हा कुंभ मेळा कतारमध्ये 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. कतारच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका अरब देशामध्ये फुटबॉलची विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. या रोमहर्षक स्पर्धेच्या एकूण 14 दिवसांत 48 गटांचे सामने खेळले जाणार आहेत. प्रत्येक गटामधील दोन अव्वल संघाला राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश करता येणार आहे. 3 डिसेंबरपासून नॉकआऊट सामने खेळले जातील आणि त्यानंतर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीतील संघाचा प्रवास निश्चित होईल. या संपूर्ण स्पर्धेत एकूण 64 सामने खळले जाणार असून अंतिम सामना 18 डिसेंबर 2022 रोजी खेळला जाणार आहे. ही स्पर्धा अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.

दरवेळेप्रमाणेच यंदाही चर्चा आहे ती फुटबॉल विश्वचषकातील खेळाडू आणि संघांना मिळणार्‍या पैशांची. आपल्याकडे क्रिकेटमध्ये अलीकडील काळात प्रचंड पैसा आल्याची चर्चा होत असते. तसेच सामना अथवा स्पर्धा जिंकल्यानंतर खेळाडूंना आणि संघांना मिळणारी बक्षिसे व रोख रक्कम यांमध्येही गेल्या दहा वर्षांत घसघशीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यादृष्टीने क्रिकेटमधील श्रीमंती वाढल्याचे बोलले जाते; परंतु फुटबॉलमधील अर्थकारण विचारात घेतल्यास क्रिकेटचे अर्थकारण थिटे असल्याचे वाटते. आता हेच पाहा ना, फिफा 2022 मध्ये सर्वांत खराब कामगिरी करणार्‍या संघाला मिळणारी रक्कम ही विश्वचषक विजेत्या इंग्लंडला मिळालेल्या रकमेपेक्षा तब्बल 60 कोटींनी अधिक आहे.

फिफाच्या यंदाच्या स्पर्धेमध्ये बक्षिसापोटी 3568 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषक सामन्यात ही रक्कम केवळ 45.4 कोटी रुपये होती. हा विश्वचषक जिंकणार्‍या संघाला 344 कोटी रुपये मिळणार असून मागील अर्थात 2018च्या विश्वचषक स्पर्धेच्या तुलनेत ही रक्कम 4 मिलियन डॉलरहून अधिक आहे. उपविजेत्या संघाला 245 कोटी रुपये रोख रक्कम मिळणार आहे. तिसर्‍या स्थानावर राहणार्‍या संघाला मिळणारी रक्कम आहे

202 कोटी रुपये! सर्वांत धक्कादायक म्हणजे, पहिल्या राऊंडमधून बाहेर होणार्‍या संघालासुद्धा 72 कोटी रुपये मिळणार आहेत. आंतरराष्ट्रीय खेळांसाठीची ही सर्वाधिक बक्षीस रक्कम आहे. अर्थात फुटबॉलच्या विश्वात काही खेळाडू असे आहेत, ज्यांची वार्षिक कमाई या बक्षीस रकमेपेक्षा काही पटींनी अधिक आहे. पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डोचेच उदाहरण घेतले तर त्याची वार्षिक कमाई सुमारे 922 कोटी रुपये आहे; तर अर्जेंटिनाच्या लियोनल मेसीची वर्षाकाठीची कमाई आहे 811 कोटी.

दिग्गज संघांची उणीव जाणवणार

यंदाच्या फिफा विश्वचषकामध्ये उत्कंठावर्धक लढती पार पडतील; पण यामध्ये जागतिक पातळीवर फुटबॉलविश्वात दबदबा निर्माण करणार्‍या काही संघांची उणीव भासणार आहे. यामध्ये तब्बल 4 वेळा फिफा वर्ल्डकप जिंकणार्‍या आणि युरो कप विजेत्या इटलीच्या संघाची उणीव प्रकर्षाने जाणवेल. वास्तविक ब्राझीलनंतर सर्वाधिक फुटबॉल विश्वचषक जिंकणारा इटली हा दुसरा संघ आहे. इटली चार वेळा विश्वविजेता ठरला आहे. फिफा क्रमवारीत तो सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. पण यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी इटलीला पात्रता मिळवता आली नाही. मार्चमध्ये प्लेऑफच्या उपांत्य फेरीत उत्तर मॅसेडोनियाकडून 92 व्या मिनिटाला झालेल्या पराभवानंतर इटली विश्वचषक स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. इटलीप्रमाणेच चिलीच्या संघाची उणीवही जाणवणार आहे. दक्षिण अमेरिकेतील चिली हा संघ आत्तापर्यंत प्रत्येक विश्वचषकाचा भाग राहिला आहे.

1962 मध्ये हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. सध्या या संघाचे रँकिंग 29 आहे. पण कतार विश्वचषक स्पर्धेतील शेवटच्या चार पात्रता सामन्यांमध्ये फक्त एकच सामना चिलीने जिंकल्याने हा संघ पात्र ठरू शकला नाही. विश्वचषक स्पर्धेला मुकण्याची नामुष्की चिलीवर पहिल्यांदाच आली आहे. कोलंबियाचा फुटबॉल संघ फिफा क्रमवारीत 17 व्या क्रमांकावर असून ब्राझीलमध्ये झालेल्या 2014 च्या विश्वचषक स्पर्धेत हा संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता. या संघाचा स्टार खेळाडू असलेल्या जेम्स रॉड्रिग्जने विश्वचषक गोल्डन बूट पटकावला होता. पण यावेळी जेम्सला आपल्या संघाला विश्वचषकासाठी पात्र ठरवण्यात अपयश आले. फुटबॉलच्या स्पर्धांमध्ये नायजेरियाच्या खेळाडूंचा खेळही नेहमीच पाहण्यासारखा राहिला आहे. अत्यंत वेगवान खेळासाठी हा संघ ओळखला जातो. 1994 मध्ये नायजेरियाचा संघ पहिल्यांदा विश्वचषक खेळला होता. 2006 चा अपवाद वगळता नायजेरियाचा संघ प्रत्येक विश्वचषकात सहभागी राहिला आहे. इतकेच नव्हे तर या संघाने तीन वेळा सुपर 16 फेरीत प्रवेश केला आहे. या संघाचे फिफा रँकिंग 32 आहे. पण यंदा हा संघ मैदानावर दिसणार नाहीये.

साहजिकच यावेळच्या स्पर्धेत ज्या संघांच्या कामगिरीकडे लक्ष असेल, त्यामध्ये अर्जेंटिना, नेदरलँड, इंग्लंड, ब्राझील आणि फ्रान्स यांचा समावेश अग्रक्रमाने करावा लागेल. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी यंदा आपला पाचवा विश्वचषक खेळणार असून हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक असल्याची चर्चा आहे. 2014 च्या विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघाने अंतिम फेरीत धडक दिली होती आणि त्यात मेस्सीचे मोठे योगदान होते. पण अंतिम सामन्यात जर्मनीकडून अर्जेंटिनाचा पराभव झाला. 2018 च्या विश्वचषक स्पर्धेत नॉकआऊट मॅचेसमध्ये अर्जेंटिनाचा फ्रान्सकडून पराभव झाला होता. पण यंदा मेस्सीच्या नेतृत्वात खेळणारा अर्जेंटिनाचा संघ फॉर्मात आहे. हा संघ गेल्या 35 सामन्यांत अपराजित आहे. त्यामुळे या संघाकडून मेस्सीच्या चाहत्यांसह जगभरातील फुटबॉलप्रेमींना खूप अपेक्षा आहेत. अर्जेंटिनाचा पहिला सामना 22 नोव्हेंबरला सौदी अरेबियाविरुद्ध असणार आहे.

अर्जेंटिनाबरोबरच नेदरलँडच्या संघाची कामगिरीही अलीकडील काळात नेहमीच चर्चेत राहिली आहे. 2010 मध्ये हा संघ फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. 2014 च्या नेदरलँडने उपांत्य फेरी गाठली होती. पण नंतरच्या काळात या खेळाडूंची कामगिरी सुमार बनल्याने 2016 मध्ये झालेल्या युरो कपच्या स्पर्धेतही नेदरलँडला प्रवेश मिळवू शकला नाही. गेल्या वर्षभरापासून हा संघ पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आल्याचे दिसत आहे. युरो कप 2020 मधील धमाकेदार फरफॉर्मन्सनंतर नेदरलँड आता फिफा वर्ल्डकप स्पर्धेत आपल्या दमदार 26 खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे. सध्या हा संघ फिफा क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे.

भारत यंदाही प्रेक्षकच

हॉकीमध्ये दबदबा निर्माण करणार्‍या भारताला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या मैदानावर प्रेक्षकाचीच भूमिका बजवावी लागली आहे. 1950 मध्ये भारतीय संघ फिफासाठी पात्र ठरला होता. मात्र त्यावेळी भारतीय खेळाडू शूज न घालता पायाने खेळत होते. स्पर्धेत पायाने फुटबॉल खेळण्याची परवानगी दिली जात नव्हती. तसेच भारतीय संघ ब्राझीलला पाठवण्यासाठी भारताकडे त्यावेळी पैसे देखील नव्हते, असे म्हटले जाते. अर्थात आतापर्यंत भारतात फुटबॉलकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला असला तरी स्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळेच यंदाच्या विश्वचषकासाठीही सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय फुटबॉल संघ पात्र ठरू शकलेला नाही. फिफा रँकिंगचा विचार भारत 106 व्या स्थानावर आहे. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांना यंदाही अन्य देशांतील खेळाडूंच्या कौशल्याचा आनंद घेत त्याला दाद देण्यातच धन्यता मानावी लागणार आहे.

कमलेश गिरी

Back to top button