सिंहायन आत्मचरित्र : आई कुणा म्हणू मी? | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : आई कुणा म्हणू मी?

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव

मुख्य संपादक, दैनिक पुढारी
पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी ‘पुढारी’ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

‘आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी
ही न्यूनता सुखाची, चित्ती सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी!’

आई इंदिरादेवी
विख्यात चित्रकार गणपतराव वडणगेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले आई इंदिरादेवी यांचे तैलचित्र.

कवी यशवंतांच्या या अजरामर काव्यपंक्ती सतत माझ्या मनी रुंजी घालीत असतात. कारण आज मी यशाच्या आणि वैभवाच्या हिंदोळ्यावर झुलत आहे; पण आनंदाच्या या अत्युच्च क्षणीसुद्धा माझ्या मनात एकच शल्य अगदी खोलवर रुतून बसलेलं आहे. आज माझी आई या जगात नाही! ‘मातृमुखी तो सर्वसुखी’ अशी एक म्हण आहे. मला ती तंतोतंत लागू पडते. कारण मीही मातृमुखीच आहे आणि त्या म्हणीप्रमाणेच मी ‘सर्वसुखी’ही झालो. मला माझ्या आयुष्यात सर्व प्रकारचं लौकिक यश मिळालेलं आहे. परंतु, यशाच्या परमोच्च शिखरावर असतानाच माझ्या आयुष्यात तो काळाकुट्ट दिवस उगवला. 26 जानेवारी, 2009 हाच तो दुर्दैवी दिवस. त्या दिवशी माझी आई आम्हा सर्वांना पोरकं करून हे जग सोडून गेली! आमचं मायेचं छत्र हरपलं! तिच्या वाणीमधून सदैव स्रवणारा अमृताचा झरा अचानक लुप्त होऊन गेला! त्या आठवणींनं आज एका तपानंतरही जीव सैरभैर होऊन जातो.

आईला जाऊन आता बारा वर्षे झाली; पण तिच्या आठवणींचा चित्रपट आजही माझ्या डोळ्यासमोरून झरझर सरकायला लागतो…!
माझी आई! गडहिंग्लज पेट्यातील कसबा नूल गावच्या मुरारराव देसाई-तेलवेकरांची लाडकी लेक. जेवढी प्रेमळ, तेवढीच करारी. मुरारराव देसाई म्हणजे माझे आजोबा. त्यांना वसंत आणि गोविंद असे दोन मुलगे. तसेच बनुबाई, चिंगुबाई आणि अनुसया या तीन मुली. माझे मामा हे भूमिपुत्र. कष्टकरी शेतकरी. त्यामुळे घरात गूळ, तंबाखू, मिरची, शेंग यांचा व्यापार. थोरले वसंतमामा हा सारा व्याप सांभाळायचे. त्यांना शिकारीचाही नाद होता. नदीतील मोठमोठ्या माशांची बंदुकीनं शिकार करण्यात ते चांगलेच तरबेज होते.

सिंहायन आत्मचरित्र
तरुणपणातील आबा व आई.

भरल्या घरात तिन्ही लेकींचेही खूप लाड व्हायचे. घरात सगळे सणवार अगदी धडाक्यात साजरे होत. तिन्हीही मुली दिसायला सुस्वरूप आणि अंगानं काटक. त्यामुळे त्यांची लग्नं जमायला काहीच अडचण आली नाही. तिघी लेकी लग्नानंतर कोल्हापुरात नांदायला लागल्या. थोरल्या बनुबाई दिनकरराव माने सराफांच्या अर्धांगिनी झाल्या, तर धाकट्या अनुसयाबाईंचा संसार दत्तोबा लिंग्रस यांच्याशी सुरू झाला आणि मधली चिंगुबाई वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी, 1935 साली पत्रकार गणपतराव जाधव यांची सहधर्मचारिणी झाली. लग्नानंतर या चिंगुबाईची झाली इंदिरादेवी! सौ. इंदिरादेवी गणपतराव जाधव! जाधवांच्या कुटुंबात प्रेम-वात्सल्याचा अमृतकुंभ हाती घेऊनच तिनं जणू उंबरठ्यावरचं माप ओलांडलं होतं. स्वतःच्या मुलांची आई होण्याच्या आधीपासूनच, ती सार्‍या कुटुंबाची आई झाली होती.

सर्वांचीच काळजी ती मोठ्या वात्सल्यानं घेऊ लागली. लक्ष्मीच्या पावलांनी झालेलं आईचं आगमन सर्व कुटुंबाला सुखदायक आणि वरदायक ठरलं. आमच्या आजीला तर सूनमुख पाहिल्यापासून कृतकृत्य झाल्यासारखं वाटू लागलं. तिच्या सार्‍या जबाबदार्‍या आईनं पेलल्यामुळे आजीच्या जगण्याला विसावा मिळाला.

आमची आई म्हणजे साक्षात गृहलक्ष्मी. ती नेहमी नऊवारी साडी नेसत असे. तिचे पाणीदार डोळे, धारदार नाक, गौरवर्ण आणि अंगभरून सुवर्णालंकार यामुळे सगळ्यांना ती गृहलक्ष्मीच वाटायची. परंतु, ती फक्त गृहलक्ष्मी नव्हती, तर जाधवांच्या घराण्याची भाग्यलक्ष्मीही होती. प्रसिद्ध रंगकर्मी वडणगेकर यांनी तिचं खूप चांगलं तैलचित्र केलेलं आहे. त्यात ती एखाद्या देवतेसारखीच दिसते.

आईनं संसाराचा सारा भार हिमतीनं आणि मोठ्या आनंदानं पेलला होता. हळूहळू संसारवेल फुलत-बहरत गेली. आबाही आता स्थिरावत चालले होते. 1937 ला साप्ताहिक रूपात सुरू झालेला ‘पुढारी’, 1939 पासून दैनिक स्वरूपात निघू लागला. आईनं संसाराची जबाबदारी पूर्ण क्षमतेनं पेलल्यामुळे आबा आपल्या वृत्तपत्राच्या कामात स्वतःला झोकून देऊन कामाला लागले. माझी आई साक्षात अन्नपूर्णाच होती. तिच्या हाताला अमृताची गोडी होती. घरी कुणीही नि कधीही पाहुणारावळा येऊ दे, तो कधी उपाशीपोटी आणि रिकाम्या हातानं गेला नाही. तिच्या या अशा वात्सल्यभरल्या वर्तनानं तिचा सर्वांनाच लळा लागला होता. ती सर्वच लहानथोरांच्या जिव्हाळ्याचं विश्रामस्थान झाली होती. माझ्या आजी-आजोबांची ती सून नव्हे, तर लाडकी लेकच बनली होती.

आणि मग एके दिवशी घरच्या अंगणात आनंद नाचू लागला. आई-आबांच्या संसारवेलीवर एक छान, सुंदरसं फूल उमललं! माझ्या मोठ्या बहिणीचा-अक्काचा जन्म झाला. आबांनी तिचं नाव सुनेत्रा ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तो आईसह सर्वांनाच आवडला. लेक हळूहळू मोठी व्हायला लागली. तिच्या बोबड्या बोलांनी घर आनंदून गेलं. मग अक्काच्या पाठीवर मीनाताई आली. दोन्ही लेकींच्या कौतुकाला आभाळ अपुरं पडत होतं आणि मग अगदी लवकरच, 5 नोव्हेंबर 1945 रोजी अस्मादिकांचा जन्म झाला. पुत्ररत्न झालेले पाहून घरच्या आनंदाला पारावार राहिला नाही. घराचं गोकुळ झालं.

त्याच सुमारास आबांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ नवी वास्तू उभी केली. घराला नाव दिलं, ‘गोविंद निवास.’ माझ्या पाठीवर मला आणखी चार बहिणी लाभल्या. लीला, जयश्री ऊर्फ दीपा, वैजयंती आणि सगळ्यात धाकटी हेमा. सहा बहिणींचा मी एकटाच भाऊ. आई नि आबा मला ‘बाळ’ म्हणायचे. म्हणून मोठ्या दोन बहिणींचाही मी बाळच झालो, तर छोट्या चौघींचा मी अण्णा झालो. आई-आबांनी माझं नाव मोठ्या कौतुकानं प्रतापसिंह ठेवलं. त्या दोघांनीही आपली स्वप्नं माझ्यात पाहिली. अतिशय मायेनं, प्रेमानं आणि शिस्तीनं माझी जडणघडण केली. माझी शाळा, माझं शिक्षण यावर विशेषतः आईनं बारकाईनं लक्ष ठेवलं. एक वत्सल, प्रेमळ आणि त्याचवेळी शिस्तीच्या नि अभ्यासाच्या बाबतीत कडक अशी आई मला लाभल्यामुळेच माझी आजवरची वाटचाल यशस्वीपणे झालेली आहे.

आमच्या संपूर्ण परिवारात आईचं स्थान अगदी वरचं आणि मानाचं होतं. घरी किंवा नातेवाईकांकडेही कसलाही समारंभ असो, तो आईच्या मार्गदर्शनाखालीच व्हायचा. आम्ही मुलं सहलीला निघालो की, आई आवर्जून जेवणाचा मोठा डबा द्यायची. त्यात नाना प्रकारचे पदार्थ असायचे. आईच्या हातची, एका अन्नपूर्णेची चव त्या अन्नपदार्थांत पुरेपूर उतरलेली असायची. आईच्या प्रेमळ धाकाखाली मी मोठा होत गेलो. कोल्हापुरात प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण संपवून, पुढे मी कायद्याच्या नि पत्रकारितेच्या अभ्यासासाठी पुण्याला गेलो. तिथे सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुखांसारखे मित्र मला भेटले. त्यावेळी आबा किंवा इतर कुणीही पुण्याला यायला निघाले, तर त्यांच्याबरोबर आई आठवणीनं मटणाचा डबा पाठवायची. परंतु, तो माझ्या एकट्यासाठी नव्हे, तर माझ्या सार्‍या मित्रांसाठीही!

मटणाचं सुक्कं, मटण मसाला, मटणाचं लोणचं, मटण पुलाव, बिर्याणी यासारख्या मांसाहारी पदार्थांनी भरलेला डबा आला रे आला की, माझे मित्र त्यावर तुटून पडायचे. रोज रोज कँटीनचं जेवण जेवून तोंडाला आलेली बाबळी निघून जायची; पण खरं तर तिच्या पुरणपोळीची आणि येळवण्याच्या आमटीची तसेच झुणका-भाकरीची चव काही औरच होती. कोंड्याचा मांडा करण्याची कला तिला अवगत होती.

मला आजही चांगलं आठवतं. मामा वरेरकर, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब खर्डेकर, वसंतदादा पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड अशा अनेक मान्यवरांनी आईच्या हातची गरमागरम भाकरी खाऊन तृप्तीचा ढेकर दिला आहे. ‘पुढारी’ हे स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचं बैठकीचं ठिकाण होतं. बैठक आवरली की, ही मंडळी आमच्या शुक्रवार पेठेतल्या घरी येत असत. आईच्या हातच्या सुग्रास भोजनाचा आस्वाद घेत असत. आई गेल्यावर नागनाथअण्णा नायकवडी यांनी ‘चळवळीतील कार्यकर्त्यांची अन्नपूर्णा’ असा खास लेख लिहून आईच्या आदरातिथ्याची थोरवी गायली होती.

आबा सकाळी नऊ वाजताच बाहेर पडायचे. पण आईनं त्यांना न्याहारी केल्याशिवाय कधीही बाहेर पडू दिले नाही. आपल्या पतीची आवडनिवड लक्षात घेऊन त्याप्रमाणे मोठ्या हौसेनं ती स्वयंपाक करायची. त्याबरोबरच आम्हा बहीण-भावंडांचेही सगळे खाण्यापिण्याचे लाड ती मोठ्या मायेनं पुरवायची आणि एवढं करूनही, आबा आणि आम्ही मुलं जेवल्याशिवाय ती स्वतः मात्र अन्नाला स्पर्शही करीत नसे.

‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर’

हे आईला जात्याच ठाऊक होतं. म्हणून चटके तिनं सोसले. आम्हाला त्याची झळ कधीच लागू दिली नाही. आम्हाला मात्र पोटभर खायला घातलं. कितीही बिकट परिस्थिती आली, तरी आई डगमगली नाही. ती प्रचंड सोशिक होती.

आपल्या स्वतःच्या कुटुंबाबरोबरच आपल्या नातलगांची काळजीही आईनं घेतली. किंबहुना हे सारे नातलग म्हणजे आपलं एक मोठं कुटुंबच आहे, असं तिनं मानलं. माझ्या आत्या दोन. बायाक्का आणि सावित्रीबाई. बायाक्का आत्याचं लग्न ज्ञानोबा जाधवांशी, सावित्री आत्याचं लग्न बळवंतराव शिंदे यांच्याशी झालं होतं. दोघींचंही सासर कोल्हापूरच. त्यामुळे दोन्ही आत्यांची मुलं खेळायला आमच्याच घरी येत. बळवंतराव शिंदे यांचं घर बागवान गल्लीत होतं. आईनं आबांच्या मागे लागून शिंदेंच्या सगळ्या मुलांच्या शिक्षणाची सोय लावून दिली.
वयाच्या पाचव्या वर्षांपासून पोटच्या पोरासारखं सांभाळलेल्या वसंताला इंटरपर्यंत शिकवून ‘पुढारी’ कार्यालयातच नोकरीला लावलं ते आईनंच. नूलचे आनंदराव तेलवेकर. ते पदवीधर झाले. त्यांनाही आईनं ‘पुढारी’मध्ये लावून टाकलं. आबांच्या भोवती आईनं अशी विश्वासू माणसांची तटबंदीच उभी केली. यावरून तिच्या द्रष्टेपणाची कल्पना यायला हरकत नाही.

आपल्या बहिणींची बाळंतपणं असोत किंवा आजारपणं, तिनं स्वतः लक्ष घालून निस्तरली. ती त्यांची औषधं किंवा पथ्यपाणी स्वतः पाहत असे. परिवारातील सगळ्याच मुलांची विचारपूस करणं तसेच त्यांना हवं नको ते बघणं, यात आईनं कधीच कसर केली नाही. माहेरी आलेल्या मुलींची योग्य ती सरबराई करणं, त्या सासरी परत निघाल्या की, त्यांची साडीचोळीनं ओटी भरणं, त्यांना लागणार्‍या घरगुती वस्तू भरभरून देणं, ते सारं स्वतः गाडीत नेऊन ठेवणं, इथपर्यंत सगळं आई स्वतःच बघायची. तिला तिच्या सासू-सासर्‍यांनी जसं आपली लेक मानलं, तसेच माझी पत्नी गीतादेवी हिलाही आई-आबांनी आपली लेकच मानलं. तिनंही लेकीप्रमाणेच त्यांना जीव लावला.

माझ्या आईच्या पायात लक्ष्मी होती, यात मुळीच अतिशयोक्ती नाही. ती घरात आली आणि ‘पुढारी’ सुरू झाला. इतकंच नव्हे, तर उत्तरोत्तर ‘पुढारी’ची भरभराटच होत गेली. तिनं तर ‘पुढारी’चा रौप्यमहोत्सव पाहिला. आबांचा अमृत महोत्सव पाहण्याचं भाग्यही तिला लाभलं. तसेच ‘पुढारी’च्या भव्य सुवर्ण महोत्सवाला देशाचे पंतप्रधान प्रमुख पाहुणे म्हणून आले, त्या अमृतमय क्षणांचीही ती साक्षीदार झाली. आबांचं यश तिनं डोळे भरून पाहिलं. त्याचप्रमाणं माझं यशही तिनं अभिमानानं अनुभवलं, तर योगेशचं यश कौतुकानं पाहण्याचं भाग्यही तिला लाभलं. आमच्या मानसन्मानांनी ती धन्य झाली.

मी तिच्यासाठी बांधलेल्या ‘इंदिरा निवास’ या बंगल्यात वास्तव्य करताना तिचा ऊर आनंदाने आणि समाधानानं भरून आला. शीतल आणि योगेश या लाडक्या नातवंडांच्या कोडकौतुकात ती स्वतःला विसरून गेली. इतकंच नव्हे, तर त्यांचे शाही थाटात झालेले विवाह तिनं मोठ्या आनंदानं अनुभवले. परंतु, बसल्या जागेवरूनच. कारण तिला कुठे बाहेर जाता येत नव्हतं, हिंडता-फिरता येत नव्हतं. तो एक दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. तिची अवस्था मला आठवली, तरी आजही माझं मन सुन्न-बधिर होऊन जातं.

घरातून बाहेर पडताना देवाला आणि मोठ्यांना नमस्कार केल्याशिवाय जायचं नाही, ही आईनं आम्हा सगळ्यांना लावलेली शिस्त. आमच्या घरी आजही त्याचं पालन केलं जातं. आम्ही शुक्रवार पेठेतील ज्या गल्लीत पूर्वी राहत होतो, तिथे आई आणि आबांना सगळे दादा आणि वहिनी म्हणायचे. आमची आई एकदम स्ट्रिक्ट. आपल्या मुलींनी सातच्या आत नव्हे, तर सहाच्या आतच घरात आलं पाहिजे, असा तिचा खाक्या होता. आज लक्षात येतं की, तिची शिस्त होती, त्यामुळेच आम्हालाही शिस्त लागली.

बहिणींचं चौथीपर्यंतचं शिक्षण एकनाथ विद्यालयात आणि नंतरचं शिक्षण पेटाळ्याच्या पद्माराजे हायस्कूलमध्ये झालं. त्याला अपवाद हेमाचा. ती कुटुंबात सर्वात लहान. तिचं सुरुवातीचं शिक्षण बालमंदिरमध्ये झालं. नंतर ती होलिक्रॉसमध्ये गेली. तिला इंग्रजी माध्यमातून शिकवायचा माझाच आग्रह होता. दहावीपर्यंत शिक्षण झालं की, मुलींची लग्नं व्हायची. असा तो काळ होता. परंतु, अशा काळातही आई-आबांनी माझ्या बहिणींना पदवीपर्यंत शिकवलं. मुलींनी खूप शिकलं पाहिजे. वेळप्रसंगी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, असं आबा नेहमीच म्हणायचे. आईनंही त्यांच्या विचारांना पाठिंबाच दिला.

नूलसारख्या गावात आणि त्या काळात मुलींनी शिकणं, तशी अशक्य कोटीतील गोष्टच होती. त्यातूनही ती थोडेफार शिकली होती. मात्र, तिला शिक्षणाचं महत्त्व कळत होतं. म्हणूनच आपण नाही, निदान आपल्या मुलांनी तरी उच्चशिक्षित व्हावं, अशी तिची तळमळ होती. त्यामुळे आमच्या शिक्षणाला तिनं सदैव प्रोत्साहन दिलं. आम्हाला धाकही दाखवला. आम्ही शाळेत जात नाही म्हटलं की, ती चक्क आम्हाला खोलीत कोंडून घालायची. एरव्ही लोण्याहूनही मऊ असणारी आई, याबाबतीत मात्र वज्राहूनही कठीण व्हायची. त्यामुळेच आम्ही शिकलो. मोठी अक्का पदवीधर झाली. त्यामुळे इतर बहिणीही तिच्या मागूनच शिकत राहिल्या. लीला तर मिरजेत मेडिकल कॉलेजमध्ये शिकली. परीक्षेच्यावेळी आबाही तिच्यासोबत मिरजेला जायचे आणि पेपर होईपर्यंत आपण पंढरपूरला जाऊन यायचे. आमचं घर म्हणजे गोकुळच होतं. लहानपणापासून मी बघत आलो होतो. यशवंतराव चव्हाणांपासून कितीतरी मोठी माणसं आमच्या घरी यायची. खरं तर, त्यांचं मोठेपण कळण्याचं ते माझं वय नव्हतं. आमच्यासाठी ते आबांचे मित्र, एवढीच त्यांची ओळख. आमच्या घरी त्यावेळी फारसे नोकर-चाकर नव्हते. म्हणून मग चहा वगैरे देण्याचं काम बहिणीच पुढं येऊन करायच्या.

व्ही. टी. पाटील तर घरातल्यासारखेच होते. कित्येक वेळा सकाळी सकाळीच फिरत फिरत ते सात-साडेसात वाजताच आमच्या घरी यायचे आणि आल्याआल्याच, ‘वहिनी, चहाऽ!’ असा आवाज द्यायचे. सुप्रसिद्ध साहित्यिक मामा वरेरकर कितीतरी दिवस आमच्या घरी मुक्कामालाच होते. आम्ही सात भावंडं शिवाय आई-आबा, आजी-आजोबा असं आमचं कुटुंब. शिवाय आमच्या दोन आत्या, दोन मावशा. त्यांची मुलं. या जम्बो फॅमिलीचं सारं आईच करायची. मदतीसाठी तिचा हात सदैव वरच होता. ती सढळ हातानं कोणालाही मदत करायची. विशेष म्हणजे आबांनीही त्यावर कधी आक्षेप घेतला नाही. याबाबतीत दोघेही सारख्याला वारकेच भेटले होते.

पहाटे चार वाजताच आईचा दिवस सुरू व्हायचा. आम्ही जागे व्हायचो, तेव्हा तिनं दारात सडा-रांगोळी काढलेली असायची. घरात कामाला बायका असायच्या. पण आपल्या माणसांची कामं आपणच करण्यात तिला जो आनंद मिळायचा, तो दुसर्‍या कुठल्या गोष्टीत क्वचितच मिळाला असेल. घरच्यांचं करताना तिनं कधी चिडचिड केल्याचं मला आठवत नाही. घरात तर सतत माणसांचा राबता. आल्या गेल्यांचं हसतमुखानं करणं हा तिचा स्वभावच होता. त्यामुळेच व्ही. टी. पाटील आबांना म्हणायचे,
“गणपतराव, तुमचं घर म्हणजे गोकुळ आहे बघा!”

खरं तर, मुली मोठ्या होऊ लागल्या की, त्या आईच्या मदतीला येतात. आईचा भार हलका करतात. मात्र, आमची आईच वेगळी होती. बहिणींना अभ्यासाला वेळ मिळावा, याची दक्षता ती घेत असे. अभ्यास सोडून मुलींनी घरातली कामं करावीत, असं तिला कधीही वाटलं नाही. स्वयंपाक करताना मात्र पिठाचा एक शेवटचा गोळा बहिणींसाठी राखून ठेवायची आणि त्याची भाकरी रोज एकेका बहिणीला करायला शिकवायची. रोजच घरात ताजं ताक असायचं. प्रत्येक बहिणीला पाळीपाळीनं ती ताक ढवळायला सांगायची. त्यांच्या अभ्यासात व्यत्यय न आणताच त्यांच्याकडून छोटीमोठी कामं करून घेऊन त्यांना घरकामात ट्रेन करायची तिची पद्धत कौतुकास्पदच होती. मुली कितीही शिकल्या, तरी त्यांना घरकाम नीट करता आलं पाहिजे, याची दक्षता ती घेत असे. ‘उद्या सासरी गेलात, तर सगळं नीट आलं पाहिजे. नाहीतर तिथले लोक मला नावं ठेवतील,’ असं आई बहिणींना समजावून सांगायची. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून तिनं जे संस्कार केले, ते आम्हाला आमच्या आयुष्यात फार मोलाचे ठरले.

आईनं केलेल्या पदार्थांना एक वेगळीच चव असायची. याबाबतीत यशवंतराव चव्हाणांची एक आठवण आजही माझ्या ध्यानी आहे. दिवाळीचे दिवस होते आणि यशवंतराव फराळासाठी आमच्या घरी आले होते. डिशमधले सगळे पदार्थ सोडून, ते आईच्या हातची बाकरवडीच संपवत राहिले. मग ते आबांना म्हणाले, “संपादक, ही बाकरवडीची प्लेट तेवढी बाजूला ठेवा. मला काही त्या खाण्याचा मोह आवरत नाही!” त्यावर आबा हसून म्हणाले, “खरंय तुमचं! व्यक्तिशः मलाही तिच्या हातच्या बाकरवड्याच जास्त आवडतात.” आणि ते खरंही होतं. दिवाळीच्या काळात आबा बाकरवडीच तेवढी खायचे. तसेच आईनं केलेलं पिठलंही आम्हा सर्वांना फार आवडायचं. आईच्या हातच्या फराळाच्या पदार्थांची चव वेगळीच असायची.

अगदी मटणापासून शाकाहारी जेवणापर्यंत सगळेच पदार्थ ती चवदार बनवायची. सकाळी आम्ही अभ्यासाला बसलेलो असायचो. नऊ-साडेनऊच्या दरम्यान तिनं दिलेल्या आमटीच्या फोडणीचा वास स्वयंपाक घरातून आला की, आमचं अभ्यासावरचं लक्षच उडायचं. तोंडाला पाणी सुटायचं. त्या मस्त लसणाच्या फोडणीनं आमची भूक आपोआपच चाळवायची. तिच्या हातची आमटी, चाकवताचं गरगटं, रसपोळी, दम बिर्याणी आणि मटण चॉप्स यांची चव आजही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. आईची दम बिर्याणी तर एकदमच स्पेशल. बिर्याणीत फुललेला कोळसा टाकून ती त्यावर तुपाची धार सोडायची आणि ते झाकून ठेवायची. त्यामुळं बिर्याणीला एक खमंग वास यायचा.

तेव्हा ओव्हन हा प्रकार नव्हता. त्यामुळे मोठ्या घमेल्यात वाळू आणि कोळशाचे निखारे घालून ती त्यावर केक करायची. केकसाठी देशी गावठी अंड्यांचा वापर ती करत असे. आईच्या हातच्या केकची चव इतरत्र कोठेही आम्हाला मिळाली नाही. म्हणूनच आईची पणती माझी नात ऐश्वर्या हिने लंडनला जाऊन जगातील सर्वात प्रसिद्ध अशा फ्रेंच कॉलेजमध्ये पाककलेची पदवी घेतली; पण तिने आपल्या पणजीच्या नावाने तिच्या हातचा केक, तिची रेसिपी वापरून तयार केला आणि त्याला नाव दिले ‘ग्रँडमाज केक!’ असा हा आमचा वारसा.

तिनं केलेल्या स्टफ पापलेटची चव तर अविस्मरणीयच. तिची अनारसे तर चक्क तोंडात घातली की विरघळायची, इतकी खुसखुशीत आणि चवदार. ही अनारसे घरच्या तुपात तळलेली असत. मुंबईत माझ्या पत्नीच्या घरी सिद्धारूढ स्वामींचा सप्ताह असायचा. त्यासाठी आई अनारशाचं पीठ कोल्हापूरहून तयार करून पाठवायची. त्यामुळे आईची अनारसे मुंबईतही जायची. ती तूप कढवताना त्यात खाऊची पानं टाकायची. त्यामुळे तुपाला एक प्रकारचा खमंगपणा यायचा आणि ती पानंही खाणं पौष्टिक असायचं. आबांना मधुमेह होता. आई त्यांचं पथ्यपाणी काटेकोरपणे सांभाळायची. खास त्यांच्यासाठी ती शुगर फ्रीच्या गोळ्या वापरून रसपोळीसारखे पदार्थ बनवीत असे.

आबा बाहेरगावी निघाले की, त्यांना वाटेत भूक लागली, तर खाण्यासाठी चपाती-भाजीचा डबा आवर्जून त्यांच्यासोबत द्यायची. फक्त आबांचीच नव्हे, तर इतक्या मोठ्या कुटुंबातील प्रत्येकाचं काळजीनं करणार्‍या आमच्या आईकडे एवढी कामाची प्रचंड ऊर्जा कशी आहे, असा प्रश्न नेहमीच मला पडायचा. आबांना शुगर होती. मधुमेह अनुवंशिक मानला जातो. परंतु, आईंना मधुमेह नसल्यामुळे आम्हा भावंडांपैकी कुणालाच तो झाला नाही. निरोगीपणाची ही गुणसूत्रं आम्हाला आईकडूनच मिळाली होती. यात मुळीच संशय नाही. ही तिनं आम्हाला दिलेली सर्वात मोठी देणगीच म्हणावी लागेल.

आजच्याप्रमाणंच तेव्हाही शेतात जनावरं होती. त्यामुळे घरात दूध, तूप भरपूर. त्यामुळे आई घरातच खवा करायची. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी गुलाबजाम ठरलेलेच. रोजच्या स्वयंपाकाचं काम सांभाळून ती हे कशी करायची, हा प्रश्न मला आता पडतो. दिवाळीत तर मोठमोठे डबे भरून ती फराळाचं करायची. तिची बाकरवडी आणि बेसन लाडू तर अल्टिमेटच! तिच्या हातचे बेसन लाडू लोकनेते बाळासाहेब देसाईंना फार आवडायचे.

आमच्याकडे बाहेरचं खाणं फारसं नसायचंच. बाहेरचं काही खाण्यापेक्षा, ‘गरम चपाती करून देते. ती खा!’ असा आईचा आग्रह असायचा. परीक्षेच्या काळात आम्ही रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचो. त्या काळात आमच्यासाठी, केकचे छोटे कप्स आणि खारी बिस्किटं तिनं तयार करून ठेवलेली असत. स्वतः बाजारात जाऊन मनपसंद भाजी खरेदी करणं, हा तिचा आवडीचा छंद होता. आबांच्या बरोबर पन्हाळ्याला गेल्यावर वाटेत गाडी थांबवून जवळपासच्या खेड्यातील ताजा, टवटवीत भाजीपाला खरेदी करण्याचा तिचा उपक्रम कधीही चुकत नसे. आईच्या हातचं लोणचं एवढं स्वादिष्ट असायचं की, ते पाहूनच तोंडाला पाणी सुटायचं. ते इतकं फेमस होतं की, गल्लीतलं कुणी ना कुणी सतत मागून न्यायचं. दारात मासे विकणार्‍या बायकाही मासे विकून झाले की, जाताना तिच्याकडून लोणचं मागून न्यायच्या.

खरं तर, सगळं तिचंच होतं, पण स्वतःसाठी काही मागायचं म्हटलं की, तिची जीभच उचलत नसे. दुसर्‍याला देण्याची मात्र तिला भारी हौस. याच हौसेपोटी तिनं माझ्या आजीला अक्षरशः दागिन्यांनी मढवून टाकलं होतं. आपलं घर आणि आपलं कुटुंब यांचीच काळजी तिला सदैव होती. तिची नजर चौफेर होती. नियोजन अगदी पक्कं असायचं. घरात सत्यनारायणाची पूजा जरी असली, तरी तिची आदल्या दिवशीच तयारी पूर्ण झालेली असे. साधे बदाम सोलून, कट करून किंवा बेदाण्याचे देठ काढून ते वेगवेगळ्या डबीत ठेवलेले असत.

दोन्ही आत्यांचे पती लवकर वारले. त्यामुळे त्यांना आईनं आमच्याकडेच ठेवून घेतलं. त्यांचं, त्यांच्या मुलांचं शिक्षण, लग्न, माहेरपण, सारं सारं आईनंच केलं. इतकेच नव्हे, तर भावांच्या नि बहिणींच्या मुलांचंही तिनं केलं. भाचा दत्ता याला आयटीआयला घातलं. त्याला पुढे एमएसईबीत नोकरी लागली. मग तो आईला पैसे द्यायचा.

पण त्याचे पैसे न खर्च करता तिनं ते स्वतंत्रपणे जपून ठेवले आणि त्यातून त्याचं घर बांधलं. त्याला हक्काचं घर मिळवून दिलं. सगळ्यांचं चांगलं करणं हा जणू तिचा वसाच होता. तिची इच्छाशक्तीही फार प्रबळ होती.

Back to top button