बहार विशेष : जी. ए. नावाचं गारुड | पुढारी

बहार विशेष : जी. ए. नावाचं गारुड

सोनाली नवांगुळ : जी. ए. कुलकर्णी यांनी पात्राच्या तोंडून विचारलेले प्रश्‍न वाचकासाठीही कळीचे मुद्दे नव्हेत का? कधी कधी एखादा शहाणा लेखक त्याच्या लेखनातून स्वत:ला ओलांडून काही प्रश्‍न उपस्थित करतो. प्रेमात आणि रागातही संदिग्ध राहू नका म्हणून सांगतो. तेव्हा वाचक म्हणून सुरू झालेला प्रवास खासगी आयुष्यात माणूस म्हणूनही समंजस करत नेतो. जी. ए. कुलकर्णी यांचे आजपासून (दि. 10 जुलै) जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त…

अगदी चार दिवसांपूर्वीच ‘द किड विथ ए बाईक’ नावाचा सिनेमा बघत होते. आई नसलेला, वडिलांनी मुलाची आजी वारल्यामुळं एकट्याला झेपणार नाही म्हणून सोडून दिलेला अकरा वर्षांचा सिरील, आपलं अनाथपण अमान्य करण्यासाठी एक वेडसर वेग घेऊन सतत सायकल चालवत असतो. उद्दाम, उद्धट, बेशिस्त, रागाने सणसणणारा हा मुलगा त्याला समजून जवळ घेणार्‍यांना अधिकाधिक दंश करत सुटतो आणि त्याला अव्हेरणार्‍यांच्या पाठीपाठी जाऊन त्यांनी आपल्याला स्वीकारावं म्हणून ढासळत राहतो. त्याच्या बेपर्वाईमागची गोष्ट समजून घेताना सिनेमात मुळीच न सांगितलेली, त्याची जबाबदारी घेणार्‍या तरुण स्त्रीची गोष्ट खुणावत राहाते. आणि हे सगळं सांगितलेलं, न सांगितलेलं तगमगीचं जग बघताना मनातून मात्र हाका येतात आणि आठवत राहतात ती जी. ए. कुलकर्णींच्या कथांमधली माणसं. हे अजब होतं! जीएंच्या कथांमधल्या माणसांनी दाखवून दिलेले गूढ अनुत्तरित प्रश्‍न सिनेमातल्या गोष्टीशी कसलाच संदर्भ नसताना आठवावेत? जीएंनी प्रतीकांमधून व प्रतिमांमधून खुलवत नेलेली सुखदु:खं, पात्रांची विषण्णता, कुरूपता, नियतीशरणता आणि बरंच काही अवेळीच का चाल करून यावं? खरं तर जीएंच्या कथा अलीकडं बर्‍याच काळात वाचल्या नव्हत्या. त्यातले तपशीलही फार स्मरत नाहीत. मात्र त्या कथांचा झालेला परिणाम आजही व्याकूळ करणारं काही बघताना उसळी मारून वर येतो आणि वयाच्या वेगळ्या टप्प्यावर काही वेगळं खुणावतंय का, हे तपासून बघण्यासाठी अधीर करतो.

आणि म्हणूनच, त्यावेळी न कळलेली ‘विदूषक’सारखी कथा वेगळाच उपहास घेऊन समोर उभी राहाते. त्या कथेत अनादी काळापासून मानस सरोवरावर राहणार्‍या हंसहंसींना कावळे कलकलाट करत मानस सरोवर सोडून जायला सांगतात. कारण ते आले त्या क्षणापासून त्यांची सत्ता सुरू होते. हंस विचारतात, ‘तुम्हाला पोहायला येत नसेल तर मानससरोवर हवं कशाला?’ त्यावर कावळे उत्तर देतात, ‘आम्हाला पोहता येत नसेल, पण त्याचा आणि स्वामित्वाचा काय संबंध आहे? आमच्या सत्तेची नृत्यशाला अथवा गायनशाला असेल तर आपल्याला नृत्य, गायन आलं पाहिजे असं थोडंच आहे?’ ही गोष्ट जी वळणे घेत पुढे जाते, ते वाचताना आपण आपोआप आपल्या आसपास घडणार्‍या कौटुंबिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीकडे वेगळंच बघायला लागतो. शेवटी वाचतो आणि नाटक-सिनेमा बघतो तरी का आपण? आपल्या नेहमीच्या दैनंदिनीत नि सवयीमुळं आलेल्या उदासीनतेत गाडली गेलेली एक तिरपी नजर आपल्याला धार करून हवी असते. जीएंनी सुखदु:खं, ताटातूट, माणसाचं एकाकीपण बघायला लावता लावता अचानक विलक्षण चमकायला लावून मध्येच अशी वेगळी द‍ृष्टी दिलेली आहे.

संबंधित बातम्या

आज जी. ए. असते तर त्यांनी शंभरीत पदार्पण केले असते. आणि का, कोण जाणे, खात्री वाटते की ते जसे होते तसेच असते. माणसांना टाळणारे, फार कुठे न दिसणारे, चर्चा व सभासमारंभांना फारच अपवादात्मक प्रसंग असेल तरच उपस्थित राहणारे… त्यांना चिकटलेल्या विक्षिप्‍त, तर्‍हेवाईक, तुसडा वगैरे विशेषणांना जागत खासगीपणा जपणारे. त्यांच्या या गूढ, रहस्यमय व्यक्‍तिमत्त्वाचा पोत आणखीच बळकट करणार्‍या त्यांच्या सगळ्या कथा. वयाच्या छत्तीसाव्या वर्षी पहिला कथासंग्रह प्रकाशित झालेल्या धारवाडात राहणार्‍या या इंग्रजीच्या प्राध्यापकानं नंतर खूप कथा लिहिल्या, अनुवाद केले. वाचणार्‍याच्या मनाची फरफट होईल अशा तर्‍हेनंं माणसाच्या आयुष्याला लांबून, जवळून नि अतिजवळून बघत गाफील क्षणी त्याची वेदना, त्याची लालसा, ओंगळपणा, उद्रेक नि शून्यपण पकडणारा हाच रहस्यमयी लेखक ‘मुग्धाची रंगीत गोष्ट’ आणि ‘बखर बिम्मची’ लिहितो यावर विश्‍वास बसू नये इतका प्रसन्‍न, रसरशीत! लहान मुलांचं मूलभूत कुतूहल अलवार हातांनी पकडणारा! हे सगळं कसं होतं हे समजून घ्यावंसं वाटतं, म्हणूनच जीएंनी लिहिलेल्या, अनुवाद केलेल्या व जीएंच्या लेखनाची दोन्ही बाजूंनी समीक्षा करणार्‍या व त्यांच्या खासगी आयुष्याविषयी सांगणार्‍याही सगळ्या पुस्तकांकडं पुन: पुन्हा परतावं लागतं. या पुस्तकांची यादी एका क्लिकसरशी मिळू शकते म्हणून ती इथं नोंदवत नाही. एक जरूर नोंदवेन की, त्यांच्या पुस्तकांच्या अर्पणपत्रिकांच्या चर्चेच्या निमित्तानं त्यांचं खासगी आयुष्य समजून घेण्याची व खासगी होरपळीतून त्यांच्या कथांच्या गाभ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न वाचक, समीक्षक करत आले आहेत. जीएंच्या पत्रव्यवहाराचे जे खंड प्रकाशित झाले आहेत, त्यातून हा माणूस नेमका होता तरी कसा, याची संगती लागत जाते. गोळीबंद घट्ट कथा लिहिणारे जी. ए. आपल्या संपादकांना, प्रकाशकांना, मित्रांना पत्र लिहिताना सहज, गोष्टीवेल्हाळ वाटत राहतात. त्यांचं वाचन, चिंतन, आसपास घडणार्‍या गोष्टींविषयी मतप्रदर्शन वाचताना मजा येते.

एका अशाच कवी ग्रेसना लिहिलेल्या पत्रात त्यांची ‘कावळे’ ही कविता वाचून जी. ए. लिहितात, ‘कावळा हा विलक्षण पक्षी तर खराच. संपूर्णपणे व नि:संशय काळा रंग असूनही त्याच्या बसण्यात किंवा हालचालीत कधी खंत, ओशाळेपणा नाही. मी आहे! अशी निर्विकार स्थिर जाणीव. टू बी चे स्पष्ट उदाहरण. भारद्वाजाकडे पाहताच तो बिचकतो. आपण फार भडक तर दिसत नाही ना, हा बुजरेपणा त्याच्यात आहे. टेड ह्यूग्जने कावळ्याच्या रूपकावर अनेक कविता लिहिल्या आहेत. पण तेथे कावळ्याला आपली परंपरा नाही. कावळ्याची ओळख चिमणीबरोबर अगदी लहानपणापासून होते. मग हळूहळू चित्र गुंतागुंतीचे होते. शेणाचे घर विसरले जाते. सासुरवाशिणीचा निरोप त्याच्याबरोबर माहेरी जातो. पाहुणे येण्याची वर्दी आणण्याची जबादारी त्याच्यावर पडते. कुणी आले नाही, तर ‘फसव्या मेला’ अशा शिव्यादेखील वाट्याला येतात, पण कावळ्याविषयीच्या आपल्या भावना तितक्या सोप्या नाहीत. तोच कावळा घरातून गेला तर माणसे घर बदलतात. आणि कावळ्याचे मैथूनदेखील आपली गडद छाया घेऊन येते व शेवटी सारा हिशेब बंद करण्यासाठी पिंड शिवायला कावळाच हवा. आवडत्या व्यक्‍तीच्या अतृप्‍त इच्छा ज्यांना खरे म्हणजे काही अर्थ उरलेला नसतो, कळायच्या त्या अखेर कावळ्याकडून! त्या कळवायला कावळ्यालाच अखेर शरण जावे लागेल…’ आणि एका पत्रात हक्‍काने व बालहट्टाने स्वत:चा व आपल्या मामाचा म्हणजे जीएंचा वाढदिवस साजरा करणार्‍या व त्याचं निमित्त करत पापे आणि चॉकलेट लुटणार्‍या भाचीविषयी ते लिहितात, ‘इतकी हवीहवीशी वाटणारी लुटारू बाई इतिहासात कधी झाली नसेल!’

तर्‍हेवाईक स्वभावाचे, अलंकारिक व बोजड लिहिणारे, निराशावादी, गूढपणाच्या अस्तराखाली राहून गंमत बघणारे, संत साहित्याबद्दल पूर्वग्रह असणारे, गांधींविषयी टोकाची मते असणारे, मार्क्सवादाची खिल्ली उडवणारे, आपल्या पत्रांमधून तिरकस आणि विरोधाभासी शेरे मारणारे अशा जी. ए. कुलकर्णी यांच्याविषयी नि त्यांच्या लेखकपणाविषयी असणार्‍या सगळ्या आक्षेपांकडे नीट बघता येईल. पण त्या लेखकाला समग्र वाचल्याशिवाय हे करावं का? का करावं? ज्या लेखकानं आपल्या एका कथेत अनुयायांबद्दल अशी टिप्पणी केली होती, ‘त्याला स्वत:विषयीचे एकांगी विचार भावणार नाहीत असं समजूया का?’ ‘यात्रिक’ या कथेत ते एका पात्राकरवी म्हणतात, ‘अनुयायांवर फारसा भरवसा टाकू नका. अनुयायी मिळणं हा इतिहासातला एक योगायोग आहे. बहुतेक धर्मसंस्थापकांचे विचार पाहा. त्यातील अनेक विचार त्याच्या आधी कुणी ना कुणी सांगितलेच होते, पण ते सगळे सामान्य ठरले व काळानं त्यातील एकट्याचीच संस्थापक म्हणून निवड केली. पहिल्या काही अनुयायांची गोष्ट सोडा. प्रत्येक प्रवाह उगमाजवळ स्वच्छ पारदर्शक असतोच; पण नंतरचे अनुयायी तुमच्या शिकवणीनं मोहित होऊन धर्माला चिकटून राहतात असं तुम्हाला वाटतं का? कारण तो धर्म भेसळून क्षुद्र, अर्थहीन झाला तरी अनुयायी मात्र तसेच त्याला बिलगून राहतात. याचं एकच कारण आहे. अशा वेळी एखाद्या धर्माचे अनुयायी असणं ही डोळसपणे स्वीकारलेली कृती नसून, ती एक अंगवळणी पडलेली केवळ सवय झालेली असते आणि अशांच्या संख्येच्या आधारे तुम्ही तुमच्या ज्ञानाची पारख करता, हे सगळं विचित्र नाही का?’

जीएंनी पात्राच्या तोंडून विचारलेले प्रश्‍न एका वाचकासाठीही कळीचे मुद्दे नव्हेत का? कधी कधी एखादा शहाणा लेखक त्याच्या लेखनातून स्वत:ला ओलांडून काही प्रश्‍न उपस्थित करतो. प्रेमात आणि रागातही संदिग्ध राहू नका म्हणून सांगतो. तेव्हा वाचक म्हणून सुरू झालेला प्रवास खासगी आयुष्यात माणूस म्हणूनही समंजस करत नेतो. जी. ए. कुलकर्णींच्या लेखनानं व त्यांच्यावरील बाजूच्या व विरोधातल्या समीक्षेनं माझ्यापुरतं तरी हे केलंच आहे.

हेही वाचा

Back to top button