बहार विशेष : सत्तांतराचा अन्वयार्थ | पुढारी

बहार विशेष : सत्तांतराचा अन्वयार्थ

देवेंद्र फडणवीस हेच आजच्या महाराष्ट्रातील खरे किंगमेकर आहेत हे महिनाभरातील घडामोडींवरून सिद्ध झाले आहे. देवेंद्र फडणवीस ही एक व्यक्ती आहे, त्याबरोबरच तेे एक राजकीय प्रारूपदेखील आहे. हे राजकीय प्रारूप समजून घेतले, तर सत्तांतर का झाले? ते समजून येते. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सत्ता का दिली? यांची कारणेही समजून घेता येतात.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार जवळपास अडीच वर्ष टिकले. अडीच वर्षांनंतर उद्धव ठाकरे सरकार सत्तेवरून पायउतार झाले (29 जून 2022). शिवसेनेचे बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी करून देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होईल, असे वाटत असतानाच अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला. ही घोषणा अनेकांना बुचकळ्यात पाडणारी ठरली. त्यावर अनेक दिवस चर्चा होत राहील. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेच्या बाहेर राहण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र शपथविधीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सांगण्यावरून फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे मंत्रिमंडळात सहभागी झाले. हा निर्णयदेखील मती गुंग करणारा आहे.

गेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित महाराष्ट्राच्या राजकारणावर निर्णायक प्रभाव होता. त्यांना एकत्रित 56 टक्के जागा मिळाल्या होत्या. परंतु सत्तेवर निर्णायक नियंत्रण कोणाचे? हा मुद्दा उपस्थित झाला. या मुद्द्यापासून सत्तासंघर्ष तीव्र झाला. सरतेशेवटी अडीच वर्षांनंतर जून महिन्याच्या शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तास्पर्धेत चिटपट केले. देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची ताकद आहे. तेच खरे किंगमेकर आहेत, असे त्यांनी साधारणपणे स्पष्ट केले आहे.

म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हेच केवळ किंगमेकर नाहीत, तर देवेंद्र फडणवीस हेच आजच्या महाराष्ट्रातील खरे किंगमेकर आहेत. अशी नवी प्रतिमा त्यांनी यशस्वीपणे उभी केली, हे महिनाभरातील घडामोडींवरून सिद्ध झाले आहे. याचा अर्थ, देवेंद्र फडणवीस ही एक व्यक्ती आहे. त्याबरोबरच देवेंद्र फडणवीस हे एक राजकीय प्रारूपदेखील आहे. ही घडामोड जून 2022 मध्ये सुस्पष्टपणे दिसून आली आहे. देवेंद्र फडणवीस हे एक राजकीय प्रारूप समजून घेतले, तर सत्तांतर का झाले? हे समजून येते. तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्ता का दिली? यांची कारणेही समजून घेता येतात. तसेच किंगमेकर फडणवीस शिंदे मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून का सहभागी झाले? या प्रश्नाचे चित्तवेधक उत्तरही मिळू शकते.

देवेंद्र फडणवीस राजकीय प्रारूप

एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस उभे आहेत. या सत्तासंघर्षात देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले. यांची पाळेमुळे राजकीय प्रारूप घडविण्यात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी नवीन प्रारूप घडवले. देवेंद्र फडणवीस राजकीय प्रारूप हे उद्धव ठाकरे राजकीय प्रारूपापेक्षा

वेगळे आहे. त्यामुळे या दोन्ही राजकीय प्रारूपांमध्ये जवळपास छत्तीसचा आकडा दिसतो. एकनाथ शिंदे प्रारूप घडलेले नाही. एकनाथ शिंदे प्रयोगाचा एक भक्कम आधार देवेंद्र फडणवीस आहेत. तसेच आनंद दिघे यांचा वारसा हा त्यांचा सांस्कृतिक दुसरा आधार आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांची आजची पायाभरणी ही एका अर्थाने हिंदुत्व समाज हीच आहे. एकनाथ शिंदे यांच्या सत्तेचा मुख्य आधार देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस राजकीय प्रारूपाची पाच मुख्य शक्तिस्थाने आहेत.

एक, देवेंद्र फडणवीस राजकीय प्रारूपाचे पहिले शक्तिस्थान हिंदुत्व समाज हे आहे. हिंदू समाज आणि हिंदुत्व समाज या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या समाजाच्या संकल्पना वितळविल्या. उदा. बहुजन समाज, मराठा समाज, ओबीसी समाज, हिंदू समाज इत्यादी. त्यांनी हिंदुत्व समाज ही संकल्पना राजकारणाच्या प्रक्रियेशी जोडून घेतली. ही घडामोड प्रचंड मोठी आहे. ही कथा शिंदे गट पुन:पुन्हा मांडत होता, हे लक्षात घ्यावे लागेल. ही सत्यकथा उद्धव ठाकरे यांना मान्य नव्हती.

या सूत्राची सुरुवात 2009 पासून झाली होती. 2014 मध्येदेखील देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यात या मुद्द्यावर आधारित संघर्ष होता. 2014 ते 2019 या कालावधीत या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यात दुरावा वाढला होता. परंतु एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदुत्व विचारांचा धागा समान होता. आनंद दिघे हे शिंदेंचे आदर्श गुरू व प्रतीक आहे. देवेंद्र फडणवीस यांना त्या विचारांबद्दल आदर आहे. परंतु ठाकरे ब्रँड हा देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचा अंतिम आदर्श नाही. ठाकरे ब्रँड हा उद्धव ठाकरे यांचा आदर्श आहे. हा महत्त्वाचा मुद्दा या सत्तांतरांच्या प्रक्रियेतील कळीचा दिसतो. हाच मुख्य संघर्ष होता.

दोन, देवेंद्र फडणवीस राजकीय प्रारूपाचे दुसरे शक्तिस्थान दिल्ली आणि महाराष्ट्र यांच्यातील समन्वय हे आहे. दिल्ली हे सत्तेचे केंद्र 1947 पासून आजपर्यंत राहिले आहे, हे देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतले. त्यांनी दिल्लीविरोधी भूमिका कधीच घेतली नाही. त्यांनी हा राजकीय इतिहास समजून घेतला. पंडित नेहरू ते नरेंद्र मोदी यादरम्यान दिल्लीविरोधी गेले, ते राजकारणातून बाहेर पडले. तसेच ज्यांनी जुळवून घेतले, ते महाराष्ट्राच्या राजकारणाचे शिल्पकार झाले. हा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांचा सकारात्मक भाग आहे. या मुद्द्याशी एकनाथ शिंदे यांनी जुळवून घेतले, तर उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा हा मुद्दा नकारात्मक भाग आहे.

तीन, महाराष्ट्राच्या राजकारणाला शहरी आणि ग्रामीण असे दोन चेहरे आहेत. देवेंद्र फडणवीस शहरी चेहरा आहेत; परंतु त्याबरोबरच त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राशी जुळवून घेतले आहे. हा देवेंद्र फडणवीस यांचा मुख्य प्रकल्प आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये भर घालणारे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांना हवे होते. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने देवेंद्र फडणवीस यांची ही गरज पूर्ण झाली.

चार, चौथे शक्तिस्थान राजकीय समाजशास्त्र हे आहे. कारण उच्च जाती, सीकेपी, मराठा, ओबीसी, नवबौद्ध या पाचपैकी तीन समूहांची जुळवाजुळव करावी लागते. देवेंद्र फडणवीस यांनी यापैकी काही समूहांची बांधणी केली आहे. अशी जुळवाजुळव उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी केलेली नाही. पाच, महाराष्ट्राच्या राजकारणात व्यावसायिक आणि उद्योजक यांचा एक वर्ग प्रभावी आहे. या वर्गाची बांधणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे शहरी महाराष्ट्र हा भाजपचा बालेकिल्ला आहे. शहरी भागातील दुसरा स्पर्धक शिवसेना पक्ष होता. भाजपच्या विस्तारातील एक अडथळा अर्थातच शिवसेना हा पक्ष होता. यामुळे एका राजकीय प्रारूपाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता.

फडणवीस प्रारूप विरोध

देवेंद्र फडणवीस राजकीय प्रारूप हे मोठा फेरबदल करणारे आहे. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रारूप हे देवेंद्र फडणवीस प्रारूपविरोधी काम करत होते. तसेच उद्धव ठाकरे प्रारूपदेखील फडणवीस प्रारूपविरोधी काम करत होते. या गोष्टीचे आत्मभान देवेंद्र फडणवीस यांना निश्चितपणे आले होते. यामुळे राजकारणाचा महाराष्ट्रातील पट देवेंद्र फडणवीस विरोधी उद्धव ठाकरे किंवा शरद पवार असा उदयास आला होता. या संदर्भातील घडामोडी सतत घडत होत्या. उदाहरणार्थ अजित पवार यांची बंडखोरी रोखली गेली. त्यानंतर भाजपविरोधी शरद पवारांनी भूमिका घेतली.

तसेच ताजी घडामोड म्हणजे राष्ट्रपती निवडणुकीत एक उमेदवार देण्यात शरद पवारांचा पुढाकार दिसत होता. यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे सरळसरळ संघर्ष करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापेक्षा शिवसेनेचा हिंदू मतदार आणि हिंदू ओळख फडणवीस यांनी हिंदुत्व समाजात विलीन करण्याची प्रक्रिया राबविली. फडणवीस प्रारूप असूनही देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणापासून दूर होते. हा एक प्रकारचा पेचप्रसंग उभा राहिला होता, त्यामुळे कधीतरी देवेंद्र फडणवीस या पेचप्रसंगावर मात करणार होते. त्यांना यासाठी एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची वाटली.

त्यांनी शिंदे गटाच्या माध्यमातून ही कोंडी फोडली आहे. यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात त्यांनी प्रवेश केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे राजकारण आपल्या हाती ठेवून दिल्लीचे राजकारण करण्याची मनाची तयारी केली, असे दिसते. दिल्लीच्या राजकीय सत्तेचा एक हमरस्ता उत्तर प्रदेशातून जातो, तर राजकीय अर्थकारण म्हणून दुसरा हमरस्ता महाराष्ट्रातून जातो. कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. या गोष्टींमुळे देवेंद्र फडणवीस यांनी थेट राजकीय

उलथपालथी घडवल्या. तसेच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या हाती सत्ता सोपवली. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे ब्रँडची कोंडी केली. ठाकरे ब्रँडला त्यांच्या आमदारांनी रोखले. या सर्व प्रक्रियेत शहरी महाराष्ट्राचा पुढाकार दिसतो. आज सत्ता शिंदे गटाकडे आली. परंतु ही सत्ता पुढील काळात दहा-पंधरा वर्षे भाजपच्या दारी मुक्कामी राहील, अशी घटना घडली.

महाराष्ट्रात भाजपशी सत्तास्पर्धा करण्याची क्षमता दुसर्‍या पक्षाकडे शिल्लक राहणार नाही. यामुळे ही घडामोड आमूलाग्र बदल घडवून आणणारी ठरली आहे. याबरोबरच दिल्लीमधून भाजपच्या अध्यक्षांची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील होण्यातून व्यक्त झाली. एकनाथ शिंदे ‘मुख्यमंत्री’ आणि देवेंद्र फडणवीस ‘उपमुख्यमंत्री’ अशी नवीन व्यूहरचना दिल्लीची आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात किंगमेकर यांचा सहभाग हा चित्तवेधक मुद्दा आहे. या नव्या सत्ता समीकरणात महाराष्ट्र आणि दिल्ली यांच्यातील सत्तासंरचना दिसते. तसेच फडणवीस राजकीय प्रारूपाच्या विस्ताराच्या घडामोडीही दिसतात.

प्रा. डॉ. प्रकाश पवार (ज्येष्ठ राजकीय विश्लेषक)

Back to top button