क्रिकेट : मिताली राज युगाचा अस्त | पुढारी

क्रिकेट : मिताली राज युगाचा अस्त

मिताली राजच्या वाट्याला कौतुक आले, तसेच टीकाही आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसेच तिनेही केले. आज भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. महिला क्रिकेट संघ संक्रमणातून जात आहे. या परिस्थितीत महिला क्रिकेटला मितालीसारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे.

गेल्या आठवड्यात दोन बातम्या पाठोपाठ आल्या. भारताच्या दोन महिला खेळाडू मिताली राज आणि स्मृती मंधाना यांनी आयसीसीच्या महिला क्रिकेट खेळाडूंच्या एकदिवसीय क्रिकेटच्या रँकिंगमध्ये पहिल्या दहा खेळाडूंच्यात स्थान मिळवले. त्यानंतर पाठोपाठ बातमी आली ती मिताली राजच्या सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची. मिताली राजच्या या बातमीने खरोखरच एका राजयुगाचा अस्त झाला आहे. 26 जून 1999 ला सुरू झालेली आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळजवळ 23 वर्षे गाजवून तिने तिची बॅट म्यान केली.

निव्वळ कालखंडाच्या हिशोबात मांडायचे, तर भारतीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या 24 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दी खालोखाल हा विक्रम असेल. अर्थात, महिला क्रिकेटने अलीकडे फोफावत व्यावसायिक रूप घेतल्याने 23 वर्षे खेळूनही तिच्या वाट्याला 12 कसोटी, 232 एकदिवसीय आणि 89 ट्वेन्टी-ट्वेन्टी सामनेच आले. भारतीय महिला क्रिकेट संघ हा सध्या संक्रमण काळातून जात आहे. हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना यासारख्या खेळाडूंकडे जबाबदारी सोपवून मिताली राज, झुलन गोस्वामी यासारख्या बुजुर्ग खेळाडू निवृत्तीच्या मार्गावर होत्याच. मिताली राजच्या निवृत्तीने यावर शिक्‍कामोर्तब झाले.

महिला क्रिकेटला आज संधी, ग्लॅमर आणि पैसे मिळत आहेत; पण दोन दशकांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. अशा वेळी सिकंदराबादमधल्या हवाई दलातून निवृत्त झालेल्या दोराई राज यांच्या घरात आठ वर्षांच्या मितालीवर क्रिकेटचे संस्कार घडायची सुरुवात झाली होती. त्याचे झाले असे की, छोट्या मितालीला उशीरपर्यंत झोपण्यापासून परावृत्त करायला तिचे वडील तिला सकाळी सकाळी मितालीच्या भावाबरोबर त्याच्या सिकंदराबादमधल्या सेंट जॉन्स क्रिकेट अकादमीत घेऊन जायचे. भावाचा क्रिकेटचा सराव चाललेला असायचा तेव्हा छोटी मिताली सीमारेषेबाहेर बसून आपला अभ्यास करत बसायची. आपला अभ्यास झाल्यावर मिताली मैदानात उतरायची आणि बॅट घेऊन फटकेबाजी करायची. तिचे चेंडू टोलवणे, नैसर्गिक पदलालित्य तिथल्या क्रिकेट प्रशिक्षक ज्योती प्रसाद यांनी अचूक हेरले आणि मितालीत मोठी क्रिकेटपटू होण्याची कुवत आहे, हे त्यांनी ओळखले.

भारताने 1997 च्या महिला विश्‍वचषकाचे यजमानपद भूषवले होते; पण भारत काही अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला नव्हता. भारतात महिला क्रिकेट अस्तित्वात होते; पण ते फोफावत नव्हते. याच दरम्यान मिथाली राजने 1999 ला पदार्पण केले आणि पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यातच तिने आयर्लंडच्या विरुद्ध तडाखेबाज नाबाद 114 धावांची खेळी केली. तिची जोडीदार रेश्मा गांधी हिनेही शतक झळकावले आणि दोघींनी 258 धावांची भागीदारी करत इंग्लिश महिला खेळाडूंचा 26 वर्षे अबाधित विक्रम मोडला. अर्थात, पुढे नऊ वर्षांनी हाही विक्रम मोडला; पण या खेळीने मिताली राजने नुसत्या आपल्या आगमनाचीच वर्दी जगाला दिली नाही, तर भारतीय महिला क्रिकेटच्या नव्या युगाची ती नांदी होती.

मितालीने तीन वर्षांत कसोटी पदार्पण केले. अपेक्षांच्या ओझ्याखाली आणि मोठ्या सामन्यात खेळायच्या दडपणात ते अपयशी ठरले. महिला क्रिकेटमध्ये कमी कसोटी सामने होतात तेव्हा पदार्पणात शून्यावर बाद झाल्यावर पुढची संधी महत्त्वाची होती. त्यात तिने अर्धशतक झळकावले; पण तिची खरी गुणवत्ता दिसून आली, ती पुढच्या इंग्लंडविरुद्धच्या टाँटनच्या कसोटी सामन्यात. ज्यात तिने 214 धावा काढल्या. महिला क्रिकेटमध्ये वैयक्‍तिक धावांचा तो विक्रम ठरला. या नुसत्या धावा नव्हत्या, तर मिताली राज भारतीय संघाचा आधारस्तंभ बनण्याची सुरुवात होती. 1997 च्या विश्‍वचषकाच्या तयारीच्या कॅम्पमध्ये खेळायला येण्यार्‍या 14 वर्षांच्या कोवळ्या मितालीचे रूपांतर एका परिपक्‍व खेळाडूत झालेले होते.

मिताली राज आणि सचिन तेंडुलकर यांच्या दीर्घ कारकिर्दीत खूप साम्य आढळते, ते त्यांच्या दोन ते तीन पिढ्यांच्या खेळाडूंबरोबर खेळण्यातून. कृष्णम्माचारी श्रीकांतच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा कोवळा सचिन पुढे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वापर्यंत खेळला आणि त्यात स्वतःही नेतृत्वाची धुरा सांभाळली. एकदिवसीय सामन्यात मितालीने पदार्पण केले, ते चंद्रकांता कौलच्या नेतृत्वाखाली आणि अनेक स्थित्यंतरे बघत ती कर्णधार झाली ती शेवटपर्यंत. सचिन तेंडुलकरचे जेव्हा कसोटीत पदार्पण झाले (1989) तेव्हा त्याच्या शेवटच्या कसोटीतील संघातील बहुतांशी साथीदार वय वर्षे दोन ते पाच वयोगटात होते. मोहम्मद शामी तर जन्मलाही नव्हता. मितालीच्या बाबतीत सांगायचे, तर तिला आदर्श मानून महिला क्रिकेटमध्ये आलेल्या लहान वेदा कृष्णमूर्ती किंवा स्मृती मंधाना जेव्हा आंतरराष्ट्रीय खेळाडू झाल्या, तेव्हाही मिताली राज क्रीजच्या दुसर्‍या टोकाला त्यांना साथ द्यायला उभी होती.

हे तिचे यश आहे आणि ते आले आहे, कठोर परिश्रमातून! तिच्या वडिलांच्या सैनिकी शिस्तीतून! तिला लहान वयात मिळलेले ज्योती प्रसाद, संपत कुमार यांच्या प्रचंड परिश्रमातून तिची कारकीर्द घडली आहे. क्रिकेटसाठी तिने वैयक्‍तिक आयुष्यात अनेक गोष्टींवर पाणी सोडले. ना ती कुठच्या कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकायची, ना तिच्याकडे क्रिकेटव्यतिरिक्‍त कुठचा दुसरा प्लॅन होता. तेव्हा क्रिकेट खेळून यशस्वी होणे हेच तिचे एकमेव उद्दिष्ट होते.

संपत कुमार तिचे प्रशिक्षक असताना रोजचे सहा ते तास प्रशिक्षण, शिवाय एका पॅसेजमध्ये तिला फक्‍त सरळ फटके मारण्यासाठी सराव आणि चेंडूवर नजर इतकी बसली पाहिजे म्हणून संध्याकाळी 6 ते 8 मधला सराव, असा तिचा दिनक्रम असायचा. यामुळे तिच्या कुटुंबीयांपेक्षा तिची जास्त जवळीक तिच्या संघ सहकार्यांशी झाली. तिचे क्रिकेटशी नाते इतके जुळले होते की, वैयक्‍तिक आयुष्यात जोडीदार केला नाही हे बरे झाले, असे तिचेे म्हणणे होते. ते खरेच वाटते. कारण लग्‍न, संसार यात अडकली असती तर ती इतके यश मिळवू शकली नसती.

मिताली राजच्या इतक्या प्रदीर्घ कारकिर्दीत जसे तिच्या वाट्याला कौतुक आले, तसेच टीकाही आली. अलीकडच्या काळात प्रशिक्षक रमेश पोवार यांच्याबरोबर झालेला वाद, तिचा संथ स्ट्राईक रेट इथपासून ते तिच्यामुळे संघात दोन गट पडले आहेत, इथपर्यंतची टीका तिच्या वाट्याला आली. अर्थात, कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसेच तिनेही केले. पण तिची निवृत्ती आता कधीही ऐकू येईल असेच वातावरण काहीसे निर्माण झाले होते.

इतकी प्रदीर्घ कारकीर्द असून महिला क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळातील उदासीनतेमुळे तिला फक्‍त बाराच कसोटी सामने फक्‍त खेळता आले, ही खंत आहे. आज मात्र महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघ संक्रमणातून जात असल्याने मितालीच्या अनुभवाची उणीव सुरुवातीला नक्‍कीच भासेल; पण भारताच्या कानाकोपर्‍यात पोहोचलेल्या महिला क्रिकेटला मितालीसारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे. भारताच्या गावागावांतून अशा गुणी महिला क्रिकेटपटू शोधून, त्यांना जर मितालीच्या अनुभवाचे प्रशिक्षण मिळायची सोय झाली, तर मितालीचे राज कायमच भारतीय महिला क्रिकेटच्या अव्वल रूपाने सत्तास्थानी असेल.

निमिष वा. पाटगावकर

Back to top button