सुल्ली डिल, बुल्‍लीबाई अ‍ॅप : डिजिटल विकृती आवरायलाच हवी! | पुढारी

सुल्ली डिल, बुल्‍लीबाई अ‍ॅप : डिजिटल विकृती आवरायलाच हवी!

सुल्ली डिल, बुल्‍लीबाई अ‍ॅपवरून मुस्लिम महिलांच्या नकळत त्यांच्या फोटोंचा लिलाव करण्यात आला. त्याआधी विकृत पद्धतीने हे फोटो एडिट करण्यात आले. त्यासाठी पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या, लेखक असलेल्या मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यात आलं. त्यांची बदनामी करण्यात आली. यात अटक झालेले सगळेच आरोपी हे अल्पवयीन आहेत. सोशल मीडियातून द्वेषाचं कोडिंग सेट केलं जातंय. ही अल्पवयीन मुलं त्याचे बळी ठरलीत.

गेल्या काही वर्षांमध्ये समाजाबद्दल द्वेष पसरवणं फार सोपं होऊन गेलंय. कधी हे सगळं उघड केलं जातं. तर कधी एखादं फेक अकाऊंट, पेज काढून. त्यासाठी सोशल मीडियातून चुकीच्या पोस्ट फिरवून संभ्रम निर्माण केला जातो. हल्ली व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीतून आपल्यापर्यंत आलेली प्रत्येक गोष्ट खरी वाटायला लागते. हे खोटं-खरं म्हणून सगळीकडे व्हायरल होतं. तेच द्वेषाचं कारण ठरतं.

सोशल मीडियातून सातत्याने काही ठराविक मंडळी मुस्लिम समाजाला टार्गेट करतायत. फेक गोष्टी पसरवून द्वेषाचं कोडिंग सेट केलं जातंय. त्यावर विचार करायला आपल्याकडे वेळही नाही. या सगळ्यात मुस्लिम महिला सॉफ्ट टार्गेट ठरतायत. विशेषतः ज्या सरकारच्या चुकीच्या धोरण, निर्णयांविरोधात भूमिका घेतात. बुल्लीबाई, सुल्ली डिलसारखे अ‍ॅप अशा महिलांच्या बदनामीचं षड्यंत्र आहे.

सुल्ली डिलची नवी आवृत्ती

गिटहबवर सुल्ली डिल हे अ‍ॅॅप बनवण्यात आले. 4 जुलै, 2021 ला पहिल्यांदा सुल्ली डिलवरून मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले. सुल्ली, बुल्ली हे आक्षेपार्ह शब्द मुस्लिम व्यक्‍तीला टार्गेट करण्यासाठी म्हणून वापरले जातात. याच शब्दांचा वापर करून मुस्लिम महिलांची बदनामी करण्यात आली.

सुल्ली डिलवर गेल्यावर युजरला ‘फाईंड युवर सुल्ली डिल ऑफ द डे’वर क्लिक करायला सांगितलं जातं. ते केल्यावर ‘सुल्ली डिल ऑफ द डे’मध्ये तुम्हाला एखाद्या मुस्लिम महिलेचा फोटो दिसतो. हे फोटो त्या महिलेच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या नकळत घेतले जायचे. ट्विटरवर ‘डिल ऑफ द डे’ असं लिहीत यात मुस्लिम महिलांना टॅग केलं जायचं. या फोटोंचे लिलाव व्हायचे.

बुल्लीबाई अ‍ॅप सुल्ली डिलसारखंच काम करायचं. मुस्लिम महिलांच्या बदनामीचं हे दुसरं व्हर्जन म्हणता येईल. बुल्लीबाई अ‍ॅॅपही गिटहबवर बनवण्यात आलं होतं. 1 जानेवारीला अचानक वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या मुस्लिम महिलांचे फोटो या अ‍ॅपवरून अपलोड करण्यात आले.

प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही

जुलैमध्ये सुल्ली डिलची घटना घडली होती. त्यावेळी 80 पेक्षा अधिक मुस्लिम महिलांचे फोटो चुकीच्या पद्धतीने अपलोड करण्यात आले होते. संसदेतही या विषयावर चर्चा झाली. केंद्रीय महिला आयोगानेही हा मुद्दा तेव्हा गांभीर्याने घेतल्याचं म्हटलं होतं. केस दाखल झाली. पण त्यात पुढे काहीच झालं नाही.

गिटहबच्या अधिकारी एरिका ब्रेशिया यांनी त्यावेळी गिटहबवरून सुल्ली अ‍ॅप हटवत असल्याचं म्हटलं होतं. लगोलग ते ब्लॉकही करण्यात आलं. पण पोलिसांच्या पातळीवर ज्या प्रकारे तपास व्हायला हवा, तो झालाच नाही. मुंबई, दिल्लीत एफआयआर दाखल झाले. पण 5 महिने उलटून गेले तरीही कुणाला अटक किंवा चौकशी झाली नाही.

मुस्लिम महिला सॉफ्ट टार्गेट

इस्मत आरा द वायरच्या पत्रकार आहेत. त्या सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करत असतात. त्यांचाही फोटो बुल्ली अ‍ॅपवर टाकण्यात आला होता. त्याविरोधात त्यांनी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रारही दाखल केली होती. प्रसिद्ध रेडिओ जॉकी असलेल्या सायमा यांनाही अशाच प्रकारे टार्गेट करण्यात आलं होतं.

प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी, लेखिका नबिया खान, पत्रकार हिबा बेग यांचंही नाव या बुल्लीबाई अ‍ॅपच्या लिस्टमध्ये होतं. पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या, राजकीय महिला नेत्यांची नावं यात होती. अशा 100 पेक्षा अधिक मुस्लिम महिलांची एक लिस्ट तयार करण्यात आली होती. विकृत पद्धतीने फोटो एडिट करून या महिलांच्या फोटोंचा लिलाव करण्यात येत होता.

इस्मत आरा, सायमा यांनी ट्विट करून याबद्दल संतप्‍त प्रतिक्रिया दिलीय. मुस्लिम समाजातल्या एका महिलेनं वेगवेगळ्या मुद्द्यावर आवाज उठवणं मान्य नसल्यामुळेच अशा प्रकारच्या विखाराला खतपाणी घातलं जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जो काही द्वेष पसरवला जातोय, त्याचं मुस्लिम महिला सॉफ्ट टार्गेट ठरतायत.

अल्पवयीन अ‍ॅपचे मास्टरमाईंड

बुल्लीबाई अ‍ॅपनंतर तक्रारी दाखल करण्यात आल्या. वाद निर्माण झाला. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यासोबत अनेकांनी याविरोधात आवाज उठवला. इस्मत आरा यांनी एफआयआर दाखल केला. त्यामुळे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी चौकशीची घोषणा केली. त्यानंतर गिटहबवरून बुल्ली अ‍ॅप ब्लॉक करण्यात आलं.

बुल्लीबाई प्रकरणात श्वेता सिंग, नीरज बिष्णोई, विशाल झा, मयांक रावळ यांना अटक झालीय. हे सगळे 25 वर्षांच्या आतले आहेत. यातला नीरज बिष्णोई बुल्लीबाई अ‍ॅपचा मास्टरमाईंड आहे. त्याचं वय अवघं 21 वर्ष असून, तो बीटेकच्या दुसर्‍या वर्षात शिकतोय. यातल्या विशाल झानं तर वादग्रस्त ट्विट करण्यासाठी एक फेक अकाऊंटही काढलं होतं. जे ट्विटरनं ब्लॉक केलं.

सुल्ली डिलचा मास्टरमाईंड ओंकारेश्वर ठाकूर आहे. त्याला इंदूरमधून अटक करण्यात आलीय. ट्रोल आणि बदनामीसाठी ट्विटरवर ‘ट्रॅडिशनलिस्ट’ नावाचा एक ग्रुप तयार करण्यात आला होता. यात केवळ मुस्लिमच नाही तर दलित, शीख, ख्रिश्चन समाजाविरोधात हिंसक कारवायांसाठी प्रोत्साहन दिलं जायचं. ओंकारेश्वर या ग्रुपचा सदस्य होता. बुल्ली बाई अ‍ॅपचा मास्टरमाइंड नीरज हा ओंकारेश्वर ठाकूरच्या संपर्कात असल्याचं त्यानं पोलीस चौकशीत सांगितलंय.

तरुणांआडून द्वेषाची पेरणी

मास्टरमाईंड असलेली सगळी मुलं पंचविशीच्या आतली आहेत. यातली उत्तराखंडची श्वेता सिंग 18 वर्षांची आहे. तिच्या आईचं कॅन्सरने तर वडिलांचं कोरोनाने निधन झालंय. तिच्या घरची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. महत्त्वाचं म्हणजे श्वेता सिंगच्या ट्विटर अकाऊंटवरून मुस्लिम महिलांचे फोटो बुल्लीबाई अ‍ॅपवर अपलोड केले जायचे.

या दोन्ही प्रकरणात अल्पवयीन मुलांची नावं समोर येत असली तरीही यामागे मोठ्या व्यक्‍तींचे हात असू शकतात. तसा संशय मुंबई पोलिसांनी व्यक्‍त केलाय. मुंबईचे पोलिस आयुक्‍त हेमंत नगराळे यांनी मुस्लिम महिलांच्या बदनामीसाठीच हे अ‍ॅप बनवल्याचं म्हटलंय. शिवाय या अकाऊंटचा संबंध खलिस्तान्यांशी जोडून हिंसा, द्वेष पसरवण्याची योजना होती.

समाजात तेढ निर्माण करण्यासाठी या मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवली गेली. मागच्या काही वर्षांमध्ये सातत्याने मुस्लिम समाजाबद्दल द्वेष पसरवला जातोय. सोशल मीडियातून या सगळ्याला खतपाणी मिळतंय. वेगवेगळ्या संघटनांमुळे ही द्वेषाची पेरणी होतेय. तरुणाईची माथी भडकवली जातात. या दोन्ही प्रकरणांमध्ये सापडलेले मास्टरमाईंड याचेच बळी ठरलेत.

सीमा बिडकर

Back to top button