Stock Market Closing Bell | सलग तिसऱ्या सत्रात विक्रीचा मारा, बाजारातील ‘ब्लडबाथ’मागे होते ‘हे ५ घटक | पुढारी

Stock Market Closing Bell | सलग तिसऱ्या सत्रात विक्रीचा मारा, बाजारातील 'ब्लडबाथ'मागे होते 'हे ५ घटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : इराण- इस्रायल युद्धामुळे मध्यपूर्वेत निर्माण झालेला भू-राजकीय तणाव आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपातीला विलंब होण्याची शक्यतेने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. परिणामी भारतीय शेअर बाजारात मंगळवारी (दि. १६) सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली. सेन्सेक्स ४५६ अंकांनी घसरून ७२,९४३ वर बंद झाला. तर निफ्टी १२४ अंकांच्या घसरणीसह २२,१४७ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)

आजच्या घसरणीत निफ्टी आयटी आणि निफ्टी मीडिया या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसला. निफ्टी आयटी २.६ टक्क्यांनी घसरला. क्षेत्रीय आघाडीवर बँक, आयटी, रियल्टी ०.५-१ टक्क्यांनी घसरले. तर ऑईल आणि गॅस निर्देशांक १ टक्क्यानी वाढला. बीएसई मिडकॅप ०.०५ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप ०.५ टक्क्यांनी वाढला.

हेवीवेट शेअर्स घसरले

सेन्सेक्सवर इन्फोसिस, इंडसइंड बँक विप्रो हे शेअर्स प्रत्येकी ३ टक्क्यांनी घसरले. त्यासोबतच बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, टीसीएस, एलटी, बजाज फायनान्स, एसबीआय, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले. दरम्यान, टायटन, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक हे शेअर्स तेजीत राहिले.

निफ्टीवर इन्फोसिस, LTIMindtree, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, विप्रो हे टॉप लूजर्स होते. हे शेअर्स २ ते ४ टक्क्यांपर्यंत घसरले. तर आयशर मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, ओएनजीसी, टायटन, डिव्हिज लॅब हे शेअर्स तेजीत राहिले.

जागतिक कमकुवत संकेत

इस्रायलच्या लष्करी प्रमुखानी “इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल” या विधानामुळे मध्यपूर्वेतील तणाव वाढण्याची शक्यता आहे. याची गुंतवणूकदारांनी धास्ती घेतली आहे.

जगभरातील बाजार गडगडले

मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जगभरातील शेअर बाजार गडगडले आहेत. अमेरिकेतील उच्च व्याजदर, चीनच्या अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती आणि मध्यपूर्वेतील तणाव यामुळे युरोपीय शेअर बाजारातील निर्देशांक घसरले आहेत. आशियाई बाजारातही याचे पडसाद दिसून आले. जपानचा निक्केई निर्देशांक १.९४ टक्क्यांनी घसरून आठ आठवड्यांच्या निचांकी पातळीवर बंद झाला. इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या चिंतेमुळे अमेरिकेतील बाजारातही कमकुवत स्थिती दिसून आली आहे.

परदेशी गुंतवणूकदार विक्रीच्या मूडमध्ये

परदेशी गुंतवणूक विक्रीच्या मूडमध्ये दिसून येत आहेत. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार गेल्या सलग पाच सत्रांत निव्वळ खरेदीदार राहिले आहेत. एनएसई (NSE) च्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, १५ एप्रिल रोजी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) ३,२६८ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) ४,७६२.९३ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. (Stock Market Closing Bell)

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

मध्य पूर्वेतील तणाव वाढल्याने मंगळवारी तेलाच्या किमती वाढल्या आहेत. जून डिलिव्हरीचे ब्रेंट फ्युचर्स ०.५ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ९०.५६ डॉलर झाले आहे.

 हे ही वाचा :

 

Back to top button