Stock Market | मार्केटमध्ये तेजी येऊ शकते, पण गुंतवणूक सावधपणे करा | पुढारी

Stock Market | मार्केटमध्ये तेजी येऊ शकते, पण गुंतवणूक सावधपणे करा

अनिल पाटील, प्रवर्तक, एस. पी. वेल्थ, कोल्हापूर

आजच्या काळात शेअर मार्केट नवनवीन तेजीचा उच्चांक गाठत आहे. अशा वेळी काय करायला हवे, हा प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदारांच्या मनात तयार होत आहे. या प्रश्नावर प्रकाश झोत टाकणारा लेख.

सध्या भारतीय शेअर मार्केटने 750038 चा टप्पा पार करून नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे. सेन्सेक्सचा प्रवास 1980 साली 100 अंकाने सुरू झाला होता. आज त्याने 75000 चा टप्पा पार केला आहे. देशातील सेन्सेक्सने सुरवातीला 1980 साली 1,00,000/- रुपये गुंतवणूक केली आहे. त्याचे आज 7,50,00,000/- रु झाले आहेत. याचा अर्थ, मागील 44 वर्षांत सेन्सेक्सने 16.24% इतका परतावा दिला आहे. या क्षेत्राचा किती लोकांनी फायदा करून घेतला आहे, हे पहिले तर 4 ते 5% लोकांनी या क्षेत्रात गुंतवणूक करून फायदा करून घेतला असल्याचे दिसते. (Stock Market)

या क्षेत्राकडे पाहताना दीर्घकाळासाठी म्हणून पहिले पाहिजे; परंतु अनेक लोक अल्पकाळासाठी गुंतवणूक करतात आणि नुकसान करून घेतात. नंतर या क्षेत्राकडे दुर्लक्ष करतात. आज 144 कोटी लोकसंख्येपैकी पहिल्यांदा मार्च 24 अखेर 14 कोटी लोकांच्या डीमॅट खात्यांचा टप्पा गाठला आहे. एकूण लोकसंख्येपैकी 7% लोक या क्षेत्रामध्ये आता फायदा घेण्यासाठी उतरले आहेत. प्रत्येक वर्षी सेन्सेक्स नवनवीन उच्चांक प्रस्थापित करीत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत मार्केटमधील वेगवेगळ्या इंडेक्सने या वर्षीही नवीन उच्चांक प्रस्थापित केले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत झालेला बदल आणि दिलेला परतावा खाली दर्शविला आहे.

यावर्षी अमेरिकेसह अनेक देशांमध्ये निवडणुका होत आहेत. म्हणजेच जगातील 60% लोक निवडणुकीला सामोरे जात आहेत. कोणत्या देशात कोणत्या पक्षाचे सरकार येणार हे माहीत नसते. त्यामुळे निवडणुकीचा काळ देशाच्या व्यवस्थापन बदलाच्या द़ृष्टीने मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण करत असतो.

आपल्या देशातही पुढच्या महिन्यामध्ये निवडणूक असून, मोदी सरकार येणार हे गृहीत धरून आता शेअर मार्केट एका नव्या उंचीवर पोहोचलेले आहे. जर काही बदल झाले तर मात्र अस्थिरता मोठ्या प्रमाणात जाणवेल. मागील वर्षांमध्ये शेअर मार्केटने भरभरून परतावा दिलेला आहे. याची कारणे अशी आहेत.

1) परदेशी गुंतवणूकदार यांचा सहभाग वाढला असून, मागील आर्थिक वर्षात FII यांनी 1,75,000/- कोटींची गुंतवणूक केलेली आहे.

2) मागील वर्षी एकूण मार्च 23 मध्ये 11 कोटी डीमॅट खाती होती. सध्या ही संख्या 14 .60 कोटीपर्यंत झाली आहेत. मागील वर्षभरामध्ये साडेतीन कोटी नवीन डीमॅट खाती उघडली आहेत. आपल्या भांडवली बाजारामध्ये सर्वसामान्य लोकांचा सहभाग मोठ्या जोमाने वाढताना दिसत आहे. डिसेंबर 2023 मध्ये 40 लाख लोकांनी डीमॅट खाती उघडलेली आहेत. प्रत्येक महिन्याला 30 ते 42 लाख नवीन खाती येत असून, मध्यमवर्गीय नवनवीन गुंतवणूकदार भांडवली बाजारांमध्ये उतरत आहेत.

3) म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून दर महिन्याला नियमित गुंतवणूक पद्धत सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून मार्च 2024 मध्ये 8.39 कोटी खात्यांतून 19270 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. हा आजपर्यंतचा नवीन उच्चांक ठरला आहे. मागील वर्षात सरसरी 16 ते 18000 कोटी दर महिन्याला म्युच्युअल फंडातून नियमित गुंतवणूक पद्धतीने (Systematic Investment Plan SIP) च्या माध्यमातून गुंतवणूक झालेली आहे. अनेक मार्गांनी भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढल्याने आपल्या देशातील शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी पाहावयास मिळत आहे.

4) NPS (नॅशनल पेन्शन स्कीम) आपल्या देशामध्ये लोकप्रिय होत असून, सर्वसामान्य लोकांच्याकडून मोठ्या प्रमाणात आणि नोकरदारांच्याकडून दर महिन्याला नॅशनल पेन्शन स्कीममध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. नॅशनल पेन्शन स्कीमच्यावतीने जमा झालेला पैसा हा काही प्रमाणात इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक केला जातो. या ठिकाणाहून प्रचंड मोठा पैसा इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक होत आहे.

5) आयुर्विमा कंपनीकडून युलिप पॉलिसी विकून जमा झालेला पैसा हा आपल्या देशातील इक्विटी मार्केटमध्ये गुंतविला जातो. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होताना दिसत आहे.

वरीलप्रमाणे अनेक मार्गांनी इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याने शेअर मार्केट हा प्रत्येक वर्षी नवनवीन उच्चांक प्राप्त करीत आहे.

मार्केटचा तेजी आणि मंदी हा स्वभाव असतो. तेजी आणि नंतर मंदी आणि नंतर तेजी हे सातत्याने येत असते. आता ही तेजी अजून किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही. निवडणुकीच्या निकालावर मार्केटचा कल कळेल. आता तेजी चालू आहे, तर मार्केट जसेजसे वर जाईल त्याप्रमाणे नफा पदरात टाकून घेतला पाहिजे म्हणजेच आपला पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग केला पाहिजे. परंतु मार्केटची दुसरी बाजू पाहिली असता, मार्केट आता खूप महाग आहे, असे म्हणता येत नाही. मार्केटचे आकडे पाहण्यापेक्षा मार्केटचा पीई रेषो पाहिले असता, मार्केट स्वस्त की महाग कळते.

सध्या सेन्सेक्सचा पीई रेषो 25.68 इतका आहे. निफ्टी मिडकॅपचा पीई रेषो 34 आहे. स्मॉल कॅप पीई रेषो 27 इतका दाखवीत आहे. बँक निफ्टीचा पीई रेषो 16.5 इतका आहे. बँकिंग क्षेत्रात अजून गुंतवणूक करण्यास वाव आहे, असे दिसते. याचा अर्थ, मार्केट लार्ज कॅपपेक्षा मिड कॅप स्मॉल कॅप क्षेत्र महाग वाटतात. त्या ठिकाणच्या गुंतवणुकीवर खूप चांगला परतावा मिळाला आहे, तर काही प्रमाणात नफा काढून घेतला पाहिजे. नवीन गुंतवणूक करताना सावधपणे केली पाहिजे. मागील परतावा पाहून नवीन गुंतवणूक करताना एकदम गुंतवणूक करण्यापेक्षा थोडी थोडी गुंतवणूक केली पाहिजे कारण मार्केट वरच्या स्तरावर असताना गुंतवणूक केली, तर भविष्यात परतावा कमी मिळण्याची शक्यता असते. या गोष्टीचा बोध घेऊन थोडी थोडी गुंतवणूक सावधपणे केली पाहिजे. मार्केट अल्पकाळासाठी जरी पडले तरी दीर्घ काळासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

अजून तेजी येऊ शकते

कोव्हिडचा काळ संपला. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणजे महागाई वाढली आणि या महागाईवर मात करण्यासाठी प्रत्येक राष्ट्रांनी व्याजदर वाढविले. त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण युरोप आणि अन्य देशांवर मंदीचे सावट निर्माण झाले. आता येणार्‍या काळात व्याजदर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येणार्‍या वर्षभरात तसे झाले तर इतर देशातील मार्केटमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढत जातो. मार्केटमध्ये अजून तेजी येऊ शकते आणि इतर देशांनी व्याजदर कमी केले, तर त्या देशातील गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक म्हणून भारत देशाला प्राधान्य देतात. परिणामी, परदेशी गुंतवणूकदरांचा ओघ अजून मोठ्या प्रमाणात वाढला तर अजून मोठी तेजी येण्याची शक्यता आहे. (Stock Market)

Back to top button