Gold prices Today | दिवाळीत सोने खरेदीची सुवर्णसंधी! दरात घसरण, आजचा दर काय? | पुढारी

Gold prices Today | दिवाळीत सोने खरेदीची सुवर्णसंधी! दरात घसरण, आजचा दर काय?

पुढारी ऑनलाईन : दिवाळीत धनत्रयोदशी म्हणजेच धनतरेस (Dhanteras) दिवशी सोने- चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. उद्या (दि.१०) धनत्रयोदशी असून त्याआधी सोन्याच्या दरात घट झाली आहे. आज गुरुवारी (दि. ९) शुद्ध सोने म्हणजेच २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅममागे ४२३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६०,११७ रुपयांवर खुला झाला आहे. काल हा दर ६०,५४० रुपयांवर बंद झाला होता. तर चांदीचा दर १०९ रुपयांनी कमी होऊन प्रति किलो ७०,१०० रुपयांवर खुला झाला आहे. (Gold prices Today)

संबंधित बातम्या

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ६०,११७ रुपये, २२ कॅरेट ५५,०६७ रुपये, १८ कॅरेट ४५,०८८ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ३५,१६८ रुपयांवर खुला झाला आहे.

सोन्याचा सर्वकालीन उच्चांकी दर ११ मे २०२३ रोजी ६१,५८५ रुपयांवर गेला होता. सध्याचा दर हा उच्चांकी दराच्या तुलनेत १,४६८ रुपयांनी कमी आहे. तर चांदीचा दर ४ मे २०२३ रोजी प्रति किलो ७६,४६४ रुपयांवर पोहोचला होता. सध्याचा दर सर्वकालीन उच्चाकांच्या तुलनेत ६,२३६ रुपयांनी कमी आहे. (Gold prices Today)

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने दरात घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा दर घसरला आहे. अमेरिकेत सोन्याचा दर ०.८८ डॉलर घसरणीसह प्रति औंस १,९४९ डॉलरवर आला आहे. चांदीचा दर ०.०७ डॉलरने कमी होऊन प्रति औंस २२.४८ डॉलरवर आला आहे.

शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

Back to top button