अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

  •  प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प)

  • गत सप्ताहात निफ्टी अणि सेन्सेक्स निर्देशांकामध्ये अनुक्रमे एकूण 203.95 आणि 775.94 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक 176.24.05 तसेच 59655.06 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 1.14 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 1.28 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. या सप्ताहात मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल लागण्यास सुरुवात झाली. या सप्ताहात सर्वाधिक वाढ होणार्‍या समभागांमध्ये येस बँक (5.54 टक्के), बीपीसीएल (4.20 टक्के), आयटीसी (3.20 टक्के) यांसारख्या कंपन्यांचा समावेश झाला. तसेच निफ्टीला खाली आणणार्‍या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने आयटी (IT) कंपन्यांच्या समभागांनी सहभाग दर्शविला. सर्वाधिक घट इन्फोसिस (11.65 टक्के), टेक महिंद्रा (8.11 टक्के), एचसीएल (2.14 टक्के) या कंपन्यांनी दर्शवली. त्याचप्रमाधे आदित्य बिर्ला समूहाच्या अल्ट्राटेक सिमेंट (3.88 टक्के), ग्रासिम इंडस्ट्रीज (2.30 टक्के) या कंपन्यांच्या समभागामध्ये घट नोंदवली गेली.

 

  •  देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे आर्थिक वर्ष 2022-2023 चे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. चौथ्या तिमाहीत कंपनीचा नफा 19.01 टक्के वाढून थेट 19,299 कोटींवर पोहचला. तसेच कंपनीचा सूलदेखील मागील वर्षाच्या तुलनेत 2.01 टक्के वधारून 1.2 लाख कोटींवरून 2.16 लाख कोटींवर पोहचला. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी रिलायन्स रिटेलने नेत्रदीपक कामगिरी केली. कंपनीचा नफा मागील वर्षाच्या तुलनेत 12.09 टक्के वधारून 2415 कोटींवर पोहचला. तसेच विक्रीदेखील 21.01 टक्के वधारून 61559 कोटींवर पोहोचली. परंतु रिलायन्स इंडस्ट्रीजची दुसरी महत्त्वाची उपकंपनी रिलायन्स जिओ मात्र रिलायन्स रिटेलप्रमाणे नफा वाढविण्यास असमर्थ ठरली. रिलायन्स जिओचा नफा 2.01 टक्के वाढून 4984 कोटी झाला. तसेच कंपनीचा महसूल 2.03 टक्के वधारून 25465 कोटी झाला. प्रतिग्राहक सरासरी महसूल 179 रुपयांवर स्थिर रहिला. नफ्याचा विचार करता रिलायन्स जिओची मागील सात तिमाहीतील ही सर्वाधिक न्यूनतम वाढ आहे.

 

  • मार्च महिन्यात भारताचा घाऊक महागाई दर (डब्लूपीआय इन्फेलेशन इंडेक्स) मागील 29 महिन्यांच्या न्यूनतम स्तरावर म्हणजेच 1.34 टक्क्यापर्यंत खाली आला. सलग दहाव्या महिन्यात घाऊक महागाई दराने घट दर्शविली. मार्च 2022 मध्ये हाच घाऊक महागाई दर 14.63 टक्क्यांपर्यंत गेला होता. नुकतेच किरकोळ महागाई दराचे आकडेदेखील जाहीर झाले. रिझर्व्ह बँकेच्या सहा टक्क्यांच्या लक्षापेक्षा किरकोळ महागाई दर खाली उतरला. किरकोळ महागाई दर मार्चमध्ये सहा टक्क्यांपेक्षा कमी म्हणजेच 5.66 टक्के राहिल्याने व्याजदर वाढीचे सत्र काही काळापुरते थांबवण्याची आशा अर्थविश्लेषकांना आहे.

 

  • देशातील चौथ्या क्रमांकाची फार्मा कंपनी मॅनकाईंड फार्मा, आयपीओद्वारे भांडवल बाजारात प्रवेश करणार. कंपनीचा आयपीओ 25 ते 27 एप्रिल दरम्यान खुला राहणार आहे. कंपनी सध्या 4326 कोटींचा निधी या आयपीओमार्फत उभा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या आयपीओचे किंमत मूल्य सुमारे 5.26 अब्ज डॉलर्स (सुमारे 43,000 कोटी) इतके असेल. आयपीओसाठी किंमत पट्टा 1026-1080 रुपयांदरम्यान ठेवण्यात आला आहे.

 

  •  रिझर्व्ह बँकेकडून एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड यांच्या विलीनीकरणास मान्यता दिल्यानंतर विलीनीकरण पश्चात (पोस्ट मर्जर) नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली. बँकांसाठी रिझर्व्ह बँकेचे काही कठोर नियम आहेत. या नियमांचे अनुपालन करणे बँकांना बंधनकारक असते. रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला विलीनीकरण पश्चात टप्प्याटप्प्याने या नियमांचे अनुपालन करण्यासाठी तीन वर्षांची मुदत दिली. तसेच सेबीनेदेखील एचडीएफसी म्युच्युअल फंडाला प्रायोजक बदलण्याची मुभा दिली. एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक यांच्या विलीनीकरणामुळे एचडीएफसी म्युच्युअल फंडाचा प्रायोजक (Sponsor) यापुढे एचडीएफसी लिमिटेडऐवजी एचडीएफसी बँक असेल.

 

  • देशातील महत्त्वाची आयटी कंपनी एचसीएल टेकचा नफा मागील तिमाहीच्या तुलनेत 2.07 टक्क्यांनी घसरून 4096 कोटींवर 3983 कोटींपर्यंत खाली आला. कंपनीचा महसूलदेखील 0.35 टक्क्यांनी घसरून 26606 कोटी झाला. आर्थिक वर्ष 2024 साठी महसूल वाढीचे उद्दिष्ट 6 ते 8 टक्क्यांदरम्यान निश्चित करण्यात आले आहे.

 

  • फेसबुकची प्रवर्तक कंपनी मेटाने कर्मचारी कपात करण्याचे निश्चित केले. फेसबुकसह तिच्या उपकंपन्या इन्स्ट्राग्रामन रियालिटी लॅब्ज आणि व्हॉट्स अ‍ॅपमध्ये 4000 ची कर्मचारी कपात केली जाणार. यापूर्वी कंपनीने 21000 लोकांना कामावरून काढले आहे.

 

  • लंडनमधील वेदांता रिसोर्ससेची भारतीय कंपनी वेदांताने हिंदुस्थान झिंक कंपनीमधील आपला 2.44 टक्क्यांचा हिस्सा गहाण ठेवला. याद्वारे सुमारे 1500 कोटी निधी उभारणीचे कंपनीचे लक्ष वेदांता कंपनीचा हिंदुस्थान झिंक लिमिटेडमध्ये एकूण 64.92 टक्के हिस्सा आहे. यापैकी सुमारे 91.35 टक्क्यांचे समभाग यापूर्वीच गहाण ठेवण्यात आले आहेत. वेदांता कंपनीचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनी आतापर्यंत 103.24 दशलक्ष समभाग यापूर्वीच गहाण ठेवले आहेत. या गहाण ठेवलेल्या समभागातून उभारलेल्या निधीचा वापर प्रामुख्याने वेदांतावर असलेले कर्ज फेडण्यासाठी केला जाणार आहे.

 

  • परदेशी गुंतवणूकदार जीक्यूजी पार्टर्नसने आयटीसी कंपनीमधील आपला हिस्सा 1.29 टक्क्यांवरून 1.44 टक्क्यांपर्यंत वाढविला. यापूर्वी जीक्यूजी पार्टर्नसनी अदानी पोर्टस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन, अदानी एंटरप्रायजेसमध्ये 5446 कोटी गुंतवले आहेत.

 

  • इन्व्हेस्को गुंतवणूकदार उद्योग समूह झी एंटरटेन्टमधून 5.11 टक्के हिस्सा विक्री करून बाहेर पडला. एकूण 204.05 समभाग किमतीवर 49.11 दशलक्ष समभागांची विक्री करण्यात आली. मार्च 2022 पर्यंत इन्व्हेकस्कोचा झी कंपनीमध्ये 18 टक्के हिस्सा होता. परंतु गुंतवणूकदार आणि प्रवर्तक यांच्यामध्ये झालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर इन्व्हेस्को गुंतवणूकदार झी कंपनीमधून बाहेर पडला.

 

  • गत सप्ताहात ओपेक राष्ट्रांनी तेल कपात जाहीर केल्यानंतर सुमारे 10-12 टक्क्यांनी ब्रेंट क्रूड आणि अमेरिकेचे डब्ल्यूटीआय क्रूड 8.10 टक्क्यांनी वधारले होते. परंतु या सप्ताहात पुन्हा एकदा आर्थिक मंदीच्या भीतीने ब्रेंट क्रूड प्रती बॅरेल 80 डॉलर दर, तर डब्ल्यूटीआय क्रूड प्रती बॅरल 77 डॉलरपर्यंत खाली आले.

 

  • 14 एप्रिल रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 1.65 अब्ज डॉलर्सने वधारून 586.41 अब्ज डॉलर्सवर पोहचली.

 

Back to top button