MSSC : ‘महिला बचत सन्मानपत्र योजनेत’ गुंतवलेल्या पैशांची गरज भासल्यास काय करावे? | पुढारी

MSSC : 'महिला बचत सन्मानपत्र योजनेत' गुंतवलेल्या पैशांची गरज भासल्यास काय करावे?

MSSC : सामान्य बचत योजनेच्या तुलनेत महिला आणि तरुणींचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी सरकारने महिला बचत सन्मानपत्र योजना सुरू केली आहे. या योजनेवर 7.5 टक्के हिशोबाने व्याज दिले जात आहे. ‘एमएसएससी’मध्ये (महिला सन्मान बचतपत्र योजना) दोन वर्षांपर्यंत पैसे जमा करावे लागतात. त्यानंतर आपल्याला व्याज आणि मूळ रक्कम परत मिळते.

‘एमएसएससी’ या योजनेत कमाल दोन लाख रुपयांपर्यंत पैसे जमा करता येतात. मात्र अनेक महिलांच्या मनात काही प्रश्न उपस्थित राहू शकतात आणि ते म्हणजे पैसे जमा केल्यानंतर अचानक त्याची गरज भासली तर पैसे काढता येतील का? त्यासाठी काय करावे लागेल?

MSSC :मुदतपूर्व बंद करण्याचे नियम

महिला सन्मान बचतपत्र योजना ही दोन वर्षांत मॅच्युअर होते. परंतु अचानक पैशाची गरज भासत असेल आणि योजनेला एक वर्ष पूर्ण झाले असेल, तर जमा केलेल्या पैशातील चाळीस टक्के रक्कम काढू शकता. आपण दोन लाख रुपये जमा केले असतील, तर एक वर्षानंतर आपल्याला 80 हजार रुपये काढता येतात. त्याचवेळी खातेधारक हा गंभीर आजारी असेल किंवा त्याचा मृत्यू झाला असेल, तर महिला सन्मान बचतपत्र योजनेचे खाते सहा महिन्यांनंतर बंद करता येते. अशा वेळी व्याजदरात दोन टक्के कपात होऊन पैसे वारसदारास परत दिले जातात.

MSSC : व्याजदर चढउताराचा परिणाम नाही

महिला सन्मान बचतपत्र योजनेवर सध्या 7.5 टक्के दराने व्याज दिले जात आहे. सरकारकडून यात बदल झाला तरी विद्यमान खातेधारकांच्या व्याजावर त्याचा परिणाम होत नाही. म्हणजे खाते सुरू करण्याच्या तारखेला जो व्याजदर निश्चित केलेला असेल तोच व्याजदर मॅच्युरिटीपर्यंत कायम राहील.

MSSC : सुकन्या समृद्धी योजनेपेक्षा ही योजना वेगळी कशी?

महिला सन्मान बचतपत्र योजना आणि सुकन्या समृद्धी योजना या दोन्ही योजना वेगवेगळ्या असून, त्याचे उद्देश विभिन्न आहेत. सुकन्या समृद्धी योजनेत दहा वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलीसाठी गुंतवणूक केली जाते. त्याचवेळी महिला सन्मान बचतपत्र योजना ही कोणत्याही वयोगटातील मुलगी आणि महिलेसाठी आहे. दोन्ही योजनांतील गुंतवणुकीची रक्कम, त्याची मर्यादा, मॅच्युरिटीचा कालावधी आणि व्याजदरात फरक आहे. सुकन्या समृद्धी योजना ही मुलीचे भवितव्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने सुरू केली तर एमएसएससीचा उद्देश हा केवळ महिलांना अधिक व्याजदर देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्याचा आहे.

विनिता शाह

Back to top button