Intel layoff | जगभरात नोकरकपातीची लाट! आता इंटेल २०० कर्मचाऱ्यांना देणार नारळ, ३ महिने विनापगारी काम | पुढारी

Intel layoff | जगभरात नोकरकपातीची लाट! आता इंटेल २०० कर्मचाऱ्यांना देणार नारळ, ३ महिने विनापगारी काम

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात मोठी सेमीकंडक्टर चिप उत्पादक कंपनी इंटेल देखील कर्मचारी कपात (Intel layoff) करत आहे. CRN कडून आलेल्या एका रिपोर्टनुसार, Intel कंपनी ३१ जानेवारीपासून काही कर्मचार्‍यांना काढून टाकण्यास सुरुवात करणार आहे. मोठ्या आर्थिक संकटामुळे त्यांच्या उत्पादन विक्रीवर परिणाम झाला आहे. यामुळे कर्मचारी कपात केली जात असल्याचे कारण कंपनीने पुढे केले आहे.

एका रिपोर्टनुसार, कंपनी किमान २०१ कर्मचार्‍यांना खर्च कपातीचा एक भाग म्हणून काढून टाकणार आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की “वर्कर अॅडजस्टमेंट अँड रीट्रेनिंग नोटिफिकेशन्स”मधून असे दिसून आले आहे की इंटेलच्या फॉलसम, कॅलिफोर्निया या ठिकाणी असलेल्या सुमारे १११ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार आहे. तर कंपनीचे मुख्यालय असलेल्या सांता क्लारा येथील ९० कर्मचार्‍यांना कामावर न येण्यास सांगण्यात आले आहे.

ओरेगॉन लाइव्हने दुसर्‍या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की चिपमेकर इंटेल कंपनीने जगभरातील त्यांच्या उत्पादन/फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना तीन महिने विनावेतन रजेवर (unpaid leave) जाण्यास सांगितले आहे. “मॅन्युफॅक्चरिंग टॅलेंट टिकवून ठेवणे हा दीर्घकालीन वृद्धीसाठी इंटेलच्या पोझिशनिंगचा मुख्य घटक आहे. व्हॉलंटरी टाइमऑफ कार्यक्रम (Voluntary timeoff programmes) अल्पकालीन खर्च कमी करण्यासाठी आहे आणि कर्मचार्‍यांना आकर्षक टाइमऑफ पर्याय दिला आहे,” अशी माहिती रिपोर्टमध्ये चिपमेकरच्या हवाल्याने दिली आहे. फायनान्शिअल टाईम्सने नुकतेच एक वृत्त दिले होते की इंटेल कंपनीने आयर्लंडमधील कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची विनावेतन रजा देऊ केली आहे.

इंटेलचे सीईओ पॅट गेल्सिंगर यांनी याआधी म्हटले होते की कंपनी खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. काही कठीण निर्णय निष्ठावंत इंटेल कर्मचाऱ्यांवर परिणाम करणारे आहेत, पण आम्हाला वाढत असलेल्या गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर समतोल साधण्याची गरज आहे. (Intel layoff)

इंटेल कॉर्पोरेशन ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आणि तंत्रज्ञान कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय सांता क्लारा, कॅलिफोर्निया येथे आहे. ही जगातील सर्वात मोठी सेमीकंडक्टर चिप उत्पादक कंपनी आहे.

दरम्यान, स्विगी आणि एडटेक स्टार्टअप वेदांतू यासह अनेक भारतीय कंपन्या शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहेत. एका वृत्तानुसार, Swiggy या महिन्यात सुमारे २५० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार करत आहे. एडटेक स्टार्टअप वेदांतूने नोकरकपातीच्या चौथ्या राउंडमध्ये तब्बल ३८५ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

हे ही वाचा :

Back to top button