कामाची बातमी : तुमचं बँकेतील खाते बंद आहे का?, ‘आरबीआय’ने सुरु केली मोहीम | पुढारी

कामाची बातमी : तुमचं बँकेतील खाते बंद आहे का?, ‘आरबीआय’ने सुरु केली मोहीम

सतीश जाधव :  आपल्याकडे अनेक इनअ‍ॅक्टिव्ह किंवा वापरात नसलेली खाती असतील, तर बँकेत जाऊन त्या खात्यांची माहिती मिळवू शकता. या खात्यांतील शिल्लक रक्‍कम काढून ते खाते कायमचेदेखील बंद करू शकता. आरबीआय आता अशा खात्यांतील रक्‍कम संबंधितांपर्यंत पोहोचवण्याबाबत ‘अ‍ॅक्शन मोड’वर आली आहे.

सामान्यतः पूर्वी एका व्यक्‍तीकडे एक किंवा कमाल दोन बँक खाती असायची. आजघडीला एका व्यक्‍तीच्या नावावर पाच ते सहा खाती आहेत. खात्यांची संख्या ही कोणत्या ना कोणत्या कारणाने वाढत जाते. नोकरीत बदल, एका शहरातून दुसर्‍या शहरात बदल किंवा अन्य कारणे. अशा स्थितीत पूर्वीचे खाते हाताळले जात नाही आणि नव्याच खात्याकडे अधिक लक्ष राहते. एवढेच नाही, तर जुन्या खात्यात शिल्लक रकमेकडेही फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही आणि ही रक्‍कम विड्रॉल न केल्याने वाढतच जाते. आरबीआय आता अशा खात्यांतील रक्‍कम संबंधितांपर्यंत पोहोचवण्याबाबत ‘अ‍ॅक्शन मोड’वर आली आहे.

आपल्याकडे अनेक इनअ‍ॅक्टिव्ह किंवा वापरात नसलेली खाती असतील, तर बँकेत जाऊन त्या खात्यांची माहिती मिळवू शकता. या खात्यांतील शिल्लक रक्‍कम काढून ते खाते कायमचेदेखील बंद करू शकता. खातेदारांच्या उदासीनतेमुळे किंवा दुर्लक्षेमुळे बँकांकडे कोट्यवधींची अनक्लेम्ड रक्‍कम पडून आहे आणि ती वाढतच चालली आहे. या खात्यांची हाताळणी करताना बँकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बहुतांश मंडळी जुने बचत किंवा चालू खाते बंद न करताच नवीन खाते सुरू करतात. जुन्या खात्यात शंभर-पाचशे रुपये असतील तरी ते काढण्याचे कष्ट घेत नाहीत. यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे लोकांना खाते बंद करण्याच्या प्रक्रियेपासून पळ काढायचा असतो. आळशीपणामुळे खात्यातील शिल्लक ही तशीच राहू दिली जाते. अशी लहानसहान सोडून दिलेली रक्‍कम आजघडीला 48 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. आरबीआयने या मुद्द्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. या खात्यांतील रक्‍कम वारसापर्यंत किंवा संबंधित खातेधारकांपर्यंत कशी पोहोचवता येईल, यावर विचार केला जात आहे. आपणही जुन्या खात्यात काही रक्‍कम सोडून दिली असेल, तर ते पैसे काढून घेण्याची अजूनही संधी आहे. या खात्यातील रक्‍कम काढून घेवू शकता

काय आहे ‘आरबीआय’ची मोहीम?

विविध बँकांच्या खातेधारकांच्या खात्यांत पडून असलेली रक्‍कम ही वारशापर्यंत पोहोचण्यासाठी आरबीआयने देशाच्या अनेक राज्यांत मोहीम सुरू केली आहे. आपल्या जुन्या बँक खात्यात असलेली रक्‍कम तातडीने काढून घ्यावी, असे आवाहन आरबीआयकडून केले जात आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये ही रक्‍कम 29264 कोटी रुपये होती, ती 2021-22 मध्ये वाढून 48256 कोटींवर पोहोचली आहे. खातेदारांनी, वारसदारांनी शिल्लक रक्‍कम काढून घ्यावी, अशी आरबीआयची इच्छा आहे. आरबीआयने आठ राज्यांत ही मोहीम सुरू केली आहे.

महाराष्ट्र, बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, पंजाब, तमिळनाडू राज्यांत आरबीआयकडून मोहीम सुरू असून; त्यानुसार संबंधितांना पैसे काढून घेण्याबाबत आवाहन केले जात आहे. नॅशनल कॅम्पेनअंतर्गत या राज्यांत प्रादेशिक भाषांबरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषेतूनही खातेधारकांना आवाहन केले जात आहे.

‘अनक्लेम्ड डिपॉझिट’ किंवा दावा न केलेल्या रकमेमध्ये बचत खात्यातील शिल्लक, चालू खात्यातील शिल्लक, मुदत ठेवी किंवा अन्य प्रकारच्या खात्यांतील रकमेचा समावेश असतो. नोकरी बदलल्यामुळे अनेक मंडळी दुसर्‍या शहरात जातात आणि नव्याने खाते सुरू केले जाते. अशा वेळी जुने खाते बंद करण्याचे कष्ट घेत नाहीत. जुन्या खात्यात असलेली किरकोळ रक्‍कम काढण्याची तसदी घेत नाहीत. याशिवाय एखाद्या खातेदाराची मुदत ठेव असेल आणि त्याचे निधन झाल्यास, ती ठेव ‘विड्रॉल’ करण्याची प्रक्रिया रेंगाळते. तसेच नातेवाइकांना त्या ठेवीची माहिती असेतच असे नाही. एखादेवेळी ते खाते आणि मुदत ठेव कोणत्या बँकेत आहे, हेदेखील ठाऊक नसते. परिणामी अशा खात्यांची संख्या वाढते आणि एकूण रक्‍कम वाढत दिवसेंदिवस वाढतच जाते.

रक्‍कम कशी काढता येईल?

जुनी खाती कोणकोणत्या बँकांत आहेत, हे जर ठाऊक असेल आणि खातेक्रमांक नोंदवून ठेवलेला असेल, तर बँकेत त्याची चौकशी करायला हवी. बँक अधिकार्‍याकडून पैसे काढून घेण्याची प्रक्रिया जाणून घ्यावी आणि त्यानुसार खात्यात पडून असलेली रक्‍कम काढून घ्यावी. संबंधित खात्याचे पासबुक, चेकबुक असेल तर पैसे काढणे आणखीच सुलभ जाते. शाखा बंद झालेली असेल तर क्षेत्रीय कार्यालयात संपर्क करावा. अन्य एका उदाहरणाचा विचार केल्यास, खातेधारकाचा मृत्यू झाला असेल आणि त्या कारणांमुळे खाते सक्रिय नसेल तर वारसदारांनी खातेदारांचे मृत्यू प्रमाणपत्र, वारस असल्याचा पुरावा सादर केल्यास खात्यातील रकमेवर दावा करता येतो. खात्यावर नॉमिनीचे नाव असेल, तर त्या व्यक्‍तीस सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर पैसे ट्रान्स्फर होतात.

व्याज मिळत नाही

अनक्लेम्ड बँक डिपॉझिटवर सध्या बँकांकडून कोणत्याही प्रकारचे व्याज दिले जात नाही. कारण या खात्याच्या देखभालीवर बँकांना बराच खर्च करावा लागतो. नियमानुसार एखादे खाते सलग दहा वर्षांपर्यंत सक्रिय राहत नसेल, तर ती रक्‍कम ‘अनक्लेम्ड डिपॉझिट’ श्रेणीत जमा केली जाते. ते पैसे आरबीआयकडेे असलेल्या डिपॉझिटर एज्युकेशन फंडमध्ये ट्रान्स्फर केले जातात.

हेही वाचा :

 

Back to top button