Rakesh Jhunjhunwala : ‘बेअर’मध्ये गुंतवणूक करून बनले ‘बिग बुल’, जाणून घ्या प्रवास… | पुढारी

Rakesh Jhunjhunwala : ‘बेअर’मध्ये गुंतवणूक करून बनले ‘बिग बुल’, जाणून घ्या प्रवास...

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे निधन झाले. ते बरेच दिवस आजारी होते. राकेश झुनझुनवाला हे भारतीय शेअर मार्केटच्या जगतात ‘बिग बुल’ म्हणून ओळखले जात. विशेष म्हणजे जेव्हा त्यांनी ट्रेडींग सुरू केले तेव्हा ते सुरुवातीला ‘बेअर’ (अस्वल) मार्केटमध्ये गुंतवणूक करायचे. हा तो काळ होता जेव्हा हर्षद मेहतांना ‘बिग बुल’ म्हटले जायचे.

कुटुंबाकडून व्यवसायाची समज

लहानपणी राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांना कुटुंबाकडूनच व्यवसायाची समज मिळू लागली. त्यांचे वडील आयकर अधिकारी होते. झुनझुनवाला यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, आमचे बाबा शेअर बाजारावर बातम्यांचा कसा परिणाम होतो हे सांगायचे. झुनझुनवाला यांनी 1985 मध्ये शेअर बाजारात पहिली गुंतवणूक केली. हा तो काळ होता जेव्हा ते सिडनहॅम कॉलेजमध्ये शिकत होते. याचदरम्यान, त्यांनी चार्टर्ड अकाउंटन्सीचा (सीए) अभ्यास सुरू केला आणि शेअर मार्केटधील गुंतवणूक, तसेच त्यतील बारकावे समजून घेण्यात गुंतले. राकेश झुनझुनवाला यांनी केवळ 5,000 रुपयांच्या तुटपुंज्या भांडवलाने शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात झुनझुनवाला यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, त्यांना शेअर मार्केटमधील पहिला विजय ‘टाटा टी’च्या माध्यमातून मिळाला. त्यांनी या कंपनीत गुंतवलेली रक्कम तिप्पट झाली. खरे तर झुनझुनवाला यांनी ‘टाटा टी’चे 5,000 शेअर्स 43 रुपयांना विकत घेतले होते. 1986 मध्ये त्यांना या स्टॉकमधून 5 लाख रुपयांचा नफा झाला.

1985 मध्ये दलाल स्ट्रीटमध्ये पाऊल

राकेश झुनझुनवाला यांच्या (Rakesh Jhunjhunwala) गुंतवणुकीची यशोगाथा अवघ्या पाच हजार रुपयांपासून सुरू झाली. आज त्यांची एकूण संपत्ती 40 हजार कोटींच्या आसपास आहे. 1985 मध्ये मुंबईच्या दलाल स्ट्रीटमध्ये दाखल झालेले राकेश झुनझुनवाला आपल्या वडिलांकडून प्रेरणा घेऊन या व्यवसायात आले. पण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यावरून झुनझुलवालांचे कान त्यांच्या वडीलांनी टोचले होते. एका मुलाखतीदरम्यान, झुनझुनवाला म्हणाले होते की, जेव्हा मी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचे ठरवले तेव्हा माझ्या वडिलांनी मला पैसे देण्यास नकार दिला. तसेच या कामासाठी कोणत्याही मित्रांकडून पैसे उसने घ्यायचे नाहीत असेही वडीलांनी निक्षूण सांगितले. जर शेअर मार्केटमध्ये उतरायचे असेल तर त्यासाठी स्वत:च्या मेहनतीने कमावलेले पैसे त्यात गुंतव असा मोलाचा सल्ला दिला होता.

संबंधित बातम्या

टाटाच्या शेअर्सचा नफा

व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) असणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी 1985 मध्ये पाच हजार रुपये गुंतवून गुंतवणूकदार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. एकेकाळी त्यांनी टाटा ग्रुपच्या टाटा टी कंपनीचे पाच हजार शेअर्स 43 रुपये दराने खरेदी केले.

तीन महिन्यांत ‘टाटा टी’च्या शेअर्सची किंमत वाढली. त्यानंतर 1986 मध्ये झुनझुनवाला यांनी हा शेअर 143 रुपयांना विकला. या निर्णयामुळे झुनझुनवाला यांना तीन महिन्यांत 2.15 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 लाख रुपयांचा नफा झाला.

अशा प्रकारे झाले शेअर मार्केटमधील बिगबुल…

पुढील तीन वर्षांत राकेश झुनझुनवाला शेअर्समध्ये पैसे गुंतवून कोट्यधीशांच्या यादीत आले. या तीन वर्षांत त्यांनी सुमारे कोट्यवधींचा नफा कमावला होता. यानंतर त्यांनी टाटा ग्रुपच्या दुसऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले. यातून ते भारतीय शेअर मार्केटमधील बिग बुल बनवले.

2003 मध्ये त्यांनी टाटा समूहाची कंपनी टायटनमध्ये पैसे गुंतवले. त्यावेळी त्यांनी टायटनचे सहा कोटी शेअर्स तीन रुपये दराने खरेदी केले होते. एकेकाळी झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे सुमारे 4.5 कोटी शेअर्स होते, ज्यांचे मूल्य 7000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. अलीकडेच राकेश झुनझुनवाला यांनी सुमारे 50 मिलियन डॉलर्सच्या मोठ्या गुंतवणुकीसह त्यांची अकासा नावाची एअरलाइन सुरू केली.

पत्नी रेखा, अकासातील सर्वात मोठी शेअरहोल्डर

भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जाणारे झुनझुनवाला यांनी आपल्या मागे मोठे व्यावसायिक साम्राज्य सोडले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी रेखा झुनझुनवाला, मुलगी निष्टा झुनझुनवाला, मुलगा आर्यमन झुनझुनवाला, मुलगी आर्यवीर झुनझुनवाला असा परिवार आहे. राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती सुमारे 40 हजार कोटींच्या आसपास आहे. त्यांच्या अकासा एअरलाईन कंपनीमध्ये सर्वात मोठी भागीदारी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे आहे. दोघांचा एकूण वाटा 45.97 टक्के आहे.

‘शॉर्ट सेल’चे तज्ज्ञ खेळाडू

झुनझुनवाला हे शॉर्ट सेलमधील तज्ञ मानले जात. एका मुलाखतीत झुनझुनवाला यांनी स्वत: सांगितले होते की, त्यांनी शेअर्स विकून खूप पैसा कमावला आहे. हर्षद मेहता घोटाळा समोर आल्यानंतर 1992 मध्ये शेअर बाजार कोसळला होता. झुनझुनवाला यांनी या काळात खूप शॉर्ट सेलिंग केली.

‘टायटन स्टॉक’वर प्रेम…

झुनझुनवाला यांचा शेअर बाजारातील सर्वाधिक पसंतीचा स्टॉक म्हणजे घड्याळ आणि दागिने बनवणारी कंपनी टायटन. हा टाटा समूहाचा भाग आहे. या कंपनीत गुंतवणूक करून त्यांनी भरपूर पैसा कमावला. 31 मार्च 2021 रोजी तिमाहीच्या समाप्तीपर्यंत राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनी, टाटा मोटर्स, क्रिसिल, ल्युपिन, फोर्टिस हेल्थकेअर, नजर टेक्नॉलॉजीज, फेडरल बँक, डेल्टा कॉर्प, डीबी रियल्टी आणि टाटा कम्युनिकेशन्ससह 37 स्टॉक होते आहेत.

अकासा Airline लाँच करणे हा राकेश झुनझुनवालाचा ड्रीम प्रोजेक्ट होता. अकासा एअरची विमानसेवा सुरू झाल्याचा उल्लेख त्यांनी अनेक वेळा केला. नुकतेच 7 ऑगस्ट रोजी अकासाच्या पहिल्या विमाने मुंबई ते अहमदाबाद दरम्यान पहिले उड्डाण केले. यानंतर बरोबर 7 दिवसांनी एअरलाइनचे सर्वात मोठे स्टेकहोल्डर म्हणजेच राकेश झुनझुनवाला यांनी अखेरचा श्वास घेतला.

आपण बुल आणि बेअर मार्केट काय आहे ते पाहुया…

बुल मार्केट : बुल मार्केट म्हणजे अशी स्थिती, जिथे आर्थिक बाजारपेठ वाढते व भविष्यात तशी अपेक्षा ठेवते. या मार्केटचा आलेख नेहमीच वरील बाजूने मार्गक्रमण करतो. हे त्याच्या बेसलाइनला (आर्थिक क्रियांच्या सुरुवातीच्या काळात) किंवा चक्राच्या तळाशी (खालील टोकाशी) सुरु होते. बाजार मजबूत असेल आणि पुढील शक्यता फायदेशीर असतात, तेव्हा बुल मार्केट स्थिती येते. यातून गुंतवणुकदारांचा आत्मविश्वास वाढत जातो, ज्यात जास्त लोकांना खरेदी करायची असते व कमी लोकांना विक्री करायची असते.

बेअर मार्केट: बेअर मार्केट ही बुल मार्केटच्या अगदी उलट स्थिती आहे. वित्तीय बाजारात शेअरचे मूल्य घसरत असते आणि आणखी घसरण्याची चिन्हे असतात. ही बाजार सुधारणेची स्थिती असते. बेअर (अस्वल) मार्केटचा आलेख खालील बाजूने मुसंडी मारतो. बाजारात मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्यास वृद्धीची शक्यता कमी असते, तेव्हा ही स्थिती उद्भवते. ‘बुल-रन’च्या उच्चांकी स्थितीनंतर बेअर मार्केटची स्थिती येते, ती अगदी बाजाराचा तळ गाठेपर्यंत टिकते.

Back to top button