विमा पॉलिसी मुदतपूर्व बंद करताना… | पुढारी

विमा पॉलिसी मुदतपूर्व बंद करताना...

सतीश जाधव

कधी कधी मुदत संपण्यापूर्वी विमा पॉलिसी बंद करायचा निर्णय काही ग्राहकांना घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे जर नियमित हप्ता भरला जात नसेल तर पॉलिसीचे फायदे मिळतीलच याची खात्री देता येत नाही. ग्राहकाकडून पॉलिसी बंद केली जात असेल तर अनेक लाभांपासून वंचित रहावे लागतेच. त्याचबरोबर विमा कंपन्यांच्या नियमानुसार दंडही भरावा लागतो. परिणामी  ग्राहकाला  आर्थिक नुकसान सोसावे लागते. आर्थिक अडचणींमुळे किंवा अन्य कारणामुळे ग्राहकांना पॉलिसी बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. जेव्हा आपण नवीन पॉलिसी काढतो तेव्हा मुदतपूर्व पॉलिसी बंद केल्यास कोणकोणते शुल्क आकारले जातात, याचा उल्लेख पॉलिसीवर केलेला असतो. त्यामुळे पॉलिसी काढताना सर्व नियम आणि अटी वाचून घेणे किंवा एजंटाकडून समजून घेणे आवश्यक असते. त्याचबरोबर पॉलिसी मध्येच थांबविल्यामुळे कंपनी दंड किंवा शुल्क का आकारते याचीही माहिती करून घेणे गरजेचे ठरते.

पॉलिसी बंदचे शुल्क : विविध कंपन्यांचे शुल्क आणि दंडाचे प्रमाण थोड्याफार प्रमाणात वेगवेगळे असू शकते. पॉलिसीधारक नियमित विमा हप्ता भरत होता का नाही किंवा अनेक वर्षांपासून त्याने जर हप्ता भरलेला नसेल, वारंवार सूचना देऊनही हप्ता भरला जात नसेल किंवा पॉलिसीधारकाला स्वत:हून पॉलिसी बंद करायची असेल अशा विविध परिस्थितीवर आधारित दंडाची आकारणी केली जाते. 

पॉलिसी बंदचे परिणाम : विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) ने ठरवून दिलेल्या नियमानुसार पॉलिसी बंदसंदर्भात शुल्क किंवा दंड आकारले जाते. म्हणूनच पॉलिसी बंद करायची असेल तर त्यासाठी पाच किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे झालेली असावीत. 

पॉलिसी एक वर्षांनंतर बंद केली आणि त्याचा वार्षिक विमा हप्ता 25 हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर त्यासाठी जास्तीत जास्त 3000 रुपये शुल्क आकारले जाते. तसेच वार्षिक विमा हप्ता 25 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यासाठी 6000 रुपये शुल्क आकरण्यात येते. विमाग्राहकाला पॉलिसीचा हप्ता पुढे भरायचा नसेल तर त्या पॉलिसीचे रूपांतर मुदत ठेवीप्रमाणे करू शकतो. त्यासाठी पुढील विमा हप्ता भरायची गरज नाही आणि मुदतीनंतर कंपन्यांच्या नियमाप्रमाणे रक्‍कम ग्राहकाला मिळू शकते. विमा कवचसंदर्भातही नियमात बदल होतात. 

पॉलिसी बंद थांबवल्यानंतर ग्राहकाला मिळणार्‍या विमा कवचाचा लाभ मिळत नाही. दंड शुल्काबरोबरच अन्यही शुल्क आकारले जाऊ शकतात.

Back to top button