Dental Care | दातांच्या अस्वच्छतेमुळे होतो पायरिया, जाणून घ्या लक्षणे | पुढारी

Dental Care | दातांच्या अस्वच्छतेमुळे होतो पायरिया, जाणून घ्या लक्षणे

डॉ. निखिल देशमुख

आपल्या दातांना आरोग्य व सौंदर्याचा आरसा मानला जातो. मात्र बहुतेक जणांना कमी वयातच दातांच्या दुखण्याला सामोरे जावे लागत असते. दात व तोंड व्यवस्थित स्वच्छ न करणे हेच दातांच्या दुखण्यामागील प्रमुख कारण असते. दातांच्या अस्वच्छतेमुळे होणार्‍या आजाराला पायरिया असे म्हटले जाते. तोंडाची दुर्गंधी, हिरड्यांमधून रक्त येणे, दात दुखणे, दात ठिसूळ होणे अशी या आजाराची लक्षणे आहे. (Dental Care)

पायरिया हा आजार शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे, हिरड्या खराब होणे, दातांची स्वच्छता न राहणे या कारणांमुळे होत असतो. पायरिया झालेल्या व्यक्तीच्या हिरड्या पिवळ्या होत असून, त्यातून रक्त येत असते. तोंडातून दुर्गंधी येत असते. आपल्या तोंडात 700 प्रकारचे विषाणू असतात. तोंड व दातांची स्वच्छता न ठेवल्यास त्यांची संख्या कोटींच्या घरात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तोंडात वाढलेले विषाणू आपले दात व हिरड्यांवर हल्ला चढवितात व हळूहळू आपल्या दातांना आधार देणार्‍या हाडांना नष्ट करतात. पायरियावर उपचार करता येतो. पायरियाने हलत असलेले दातदेखील आपल्याला उपचाराने मजबूत करता येऊ शकतात. चांगल्या पद्धतीने दात, जीभ व तोंडाची स्वच्छता, हाच पायरियावर प्रथमोपचार आहे. हिरड्यांवर या आजाराचा अधिक प्रभाव पडला असेल तर सर्जरी करून त्या व्यवस्थित केल्या जातात. दात किडले असतील तर रूट कॅनॉल करून ते आपल्या आधीच्या दातासारखे दात करता येतात. (Dental Care)

 

Back to top button