कोव्हिड नंतर तोंडाची चव परत मिळवण्यासाठी… | पुढारी

कोव्हिड नंतर तोंडाची चव परत मिळवण्यासाठी...

डॉ. जेनिफर प्रभू

सध्या कोव्हिड-19 मुळे होणारी आणि काही वेळा दीर्घकाळ टिकणारी एक गुंतागुंत समोर आली आहे. ती म्हणजे वास घेण्याची क्षमता (अ‍ॅन्सोमिआ) किंवा चव घेण्याची क्षमता (अ‍ॅगेशिआ) आणि काही वेळा या दोन्ही क्षमता गमावल्या जातात. अमेरिकेतील एका प्रमुख मासिकाच्या मते, सौम्य ते मध्यम स्वरूपाचा संसर्ग झालेल्या जवळजवळ 86% रुग्णांनी वास घेण्याची क्षमता गमावल्याचे सांगितले आहे.

इतकीच संख्या तोंडाची चव गेलेल्या रुग्णांचीही आहे. अशी तक्रार असलेले सहा दशलक्षहून अधिक रुग्ण असून ही संख्या वाढतेच आहे. कोव्हिड मुळे सुदैवाने, चव व वास या क्षमता कमी झालेल्या रुग्णांना अन्नसेवन करण्यास मदत व्हावी, याद़ृष्टीने डॉक्टर, पोषणतज्ज्ञ व थेरपिस्ट यांच्याकडे आधीच काही उपाय आहेत.

रेडिएशन किंवा केमोथेरपी असे दीर्घकाळ चालणारे वैद्यकीय उपचार घेतल्याने या संवेदना कमी झालेल्या रुग्णांसाठी यापूर्वी उपाय करावा लागला आहे. या संवेदना पुन्हा याव्यात यासाठी काही विशिष्ट पाककृती, चवीचे पदार्थ वापरले जातात. यावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर तुमच्या मानसिक आरोग्यावर व शारीरिक आरोग्यावरही लक्षणीय परिणाम होऊ शकतो. (जसे वजन घटणे, अपुरे पोषण होणे, इ.). त्यासाठी काही व्यायाम व पाककृती जाणून घेऊन वास व चवीची संवेदना सुधारण्यासाठी वापर करता येईल.

विविध प्रकारचे वास रोज जाणूनबुजून हुंगले तर तुमच्या संवेदना पूर्वपदावर येण्यासाठी मदत होते, असे अभ्यासातून समोर आले आहे. हे वास म्हणजे लवंग किंवा दालचिनी अशा तीव्र वासाच्या मसाल्यांचे असू शकतात, किंवा लवेंडर किंवा लिंबू अशा इसेन्शिअल ऑइलचे असू शकतात. दिवसातून दोन वेळा, किमान चार वास प्रत्येकी 15 सेकंद तरी हुंगले पाहिजेत.

यातून तुमच्या विचारांना व मनालाही चालना मिळते. यापैकी एखादा वास तुम्हाला येत नसेल तर तो वास कसा असतो हे आठवण्याचा प्रयत्न करा. यामुळे नर्व्ह (मज्जातंतू) कार्यरत होतील आणि आपोआप त्या मूळ वासाशी जोडल्या जाण्याचा प्रयत्न करतील!

* आंबट – लोणचे, लिंबू किंवा चिंच अशा एखाद्या आंबट पदार्थाने तुम्ही जेवायला सुरुवात केली तर लाळ ग्रंथींना चालना मिळत असल्याने सिद्ध झाले आहे. यामुळे जेवणातील अन्य चवी तुमच्या चव घेण्याच्या संवेदनांना चालना देऊ शकतात.

* उमामी : जपानीमध्ये उमामीचा शब्दशः अर्थ आहे स्वादिष्टपणाची झलक. यास आता पाचवी चव मानले जाते (गोड, आंबट, कडू व खारट यासह). सोया सॉस, लसूण, आळंबी, बटाटे असे उमामी पदार्थही लाळग्रंथींना चालना देतात.

* तिखट : अनेक तिखट पदार्थांमध्ये असलेल्या कॅप्सेसिन या घटकामुळे ओलफॅक्टरी (स्मेल) नर्व्हचे व संबंधित ग्रंथींचे कार्य सुधारण्याची क्षमता प्राप्त होते. नाकातील मार्गीकांमध्ये अडथळे आले असतील तर ते दूर करण्यासाठीही यामुळे मदत होते.

* चॉकलेट : चव घेण्याची क्षमता राहिली नसेल तर ती परत मिळवण्यासाठी अनेकदा केवळ चॉकलेट उपयुक्त ठरते. ते अबालवृद्ध सर्वांनाच आवडतात. त्यामुळे याचा आरोग्यदायी फायदा करून घेऊ शकतो.

* वर नमूद केल्याप्रमाणे, एका पदार्थामध्ये निरनिराळ्या स्वरूपाचे घटक समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला मऊ पदार्थ नको वाटत असतील तर थोडे करकुरित पदार्थ समाविष्ट करा. काही वेळा अन्न पदार्थांपेक्षा शेक किंवा सूपसारखे पातळ पदार्थ घेणे सोयीचे वाटते.

* तापमान : अनेक कोव्हिड-19 रुग्णांना गरम किंवा कोमट पदार्थांऐवजी थंड किंवा फ्रोझन पदार्थ बरे वाटतात, असे आढळले आहे. गरम पदार्थ खाण्याचा विचार तुम्हाला त्रासदायक वाटत असेल तर तो पदार्थ गरम न करता खाण्याचा विचार करा किंवा फ्रुट स्मुदी किंवा कोल्ड सिरप घ्यायचा विचार करावा.

* सातत्य महत्त्वाचे : हताश न होण्याचा प्रयत्न करा. चव घेण्याच्या संवेदना पुन्हा जागृत व कार्यरत होण्यासाठी सतत प्रयत्न करणे व निरनिराळ्या चवी चाखून बघणे गरजेचे आहे. या आठवड्यात एखादे विशिष्ट अन्न बेचव वाटत असेल तर काही दिवसांनी ते पुन्हा खाऊन बघावे.

Back to top button