‘हेपिटायटीस बी’चा आजार | पुढारी

‘हेपिटायटीस बी’चा आजार

हेपिटायटीस बी या रोगाची लक्षणे साध्या हिवतापासारखी असतात. त्यामुळे अनेकदा त्याचे गांभीर्य कळत नाही, पण हा आजार वाढला तर तुमच्याकडून दुसर्‍यांना याची लागण होऊ शकते.

हेपिटायटीस बी हा रोग तुमच्या यकृतावर हल्ला चढवतो. अनेकदा मोठ्यांना हा रोग होतो आणि पटकन बरेही वाटू लागते. कधी कधी मात्र जास्त कालावधीसाठी हा रोग शरीरात ठाण मांडून बसतो. तेव्हा हा तीव्र स्वरुपाचा असतो. जास्त प्रमाणात असल्यास तो तुमचे यकृत पूर्णपणे निकामी करू शकतो. लहान मुले आणि तरुण यांना बर्‍याचदा हा तीव्र स्वरूपाचा हेपिटायटीस बी चा संसर्ग होतो.

संसर्ग कसा होऊ शकतो?

* रुग्णाचे इंजेक्शन, सुईचा पुनर्वापर केला तर.
* निर्जंतुक न केलेल्या सुईने गोंदण करून घेतल्यास
* रोग्याचे दाढीचे ब्लेड, ब्रश वापरल्यास
* संसर्ग झालेल्या गर्भवतीकडून आपल्या गर्भाला संक्रमण, त्यामुळेच गर्भवतीची चाचणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे.

लक्षणे समजून घ्या

थोडी कणकण, खूप थकवा, डोके दुखी, अन्नावरची इच्छा उडणे, पोट खराब आहे असे वाटणे किंवा उलटीची भावना होणे. पोटात दुखणे, संडासला काळी होणे, गडद रंगाची शू होेणे, त्वचा व डोळे पिवळे दिसणे. बर्‍याचदा तीव्र स्वरुपाच्या हेपिटायटीस बी रोगात कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत.

निदान कसे कराल ?

तुम्हाला यापूर्वी कधी हेपिटायटीस बी झाला असेल किंवा नसेल तरीही एक साधी रक्ताची चाचणी केल्यास याचे निदान होऊ शकते. यासाठी प्रतिबंधक लस असल्यास त्याची माहिती तुम्हाला डॉक्टर देऊ शकतो. या रोगाने तुमचे यकृत खराब झाले असे तुमच्या डॉक्टरांना वाटत असेल तर ते सुईने तुमच्या यकृताचा नमुना घेऊन त्याची चाचणी म्हणजे बायोप्सी करू शकतात.

डॉ. मनोज कुंभार

Back to top button