सोरायसिस रुग्णांना हवी प्रेमाची वागणूक | पुढारी

सोरायसिस रुग्णांना हवी प्रेमाची वागणूक

फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना म्हटला जातो. या महिन्यात सर्व जण आपल्या जवळच्या प्रत्येक व्यक्‍तीला गुलाब, चॉकलेट, भेटकार्ड देऊन आपलं त्याच्याप्रति असलेलं प्रेम व्यक्‍त करून ते नातं अधिक घट्ट करतात; पण हे प्रेम वा आपलेपणा सोरायसिस रुग्णांना मिळत नाही. त्यांना अपमानीत केलं जात, वा त्यांना दुर्लक्षित केलं जातं. जगात साधारणत: 125 दशलक्ष लोक सोरायसिसच्या विकाराने ग्रस्त आहेत.

सोरायसिस या आजारामुळे रुग्णाला शारीरिक आणि भावनिक असे दोन्ही प्रकारच्या जीवनात वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या आजारामुळे रुग्णांना काही वेळा आत्मविश्‍वासाचा अभाव, अवघडलेपणामुळे नवीन नातेसंबंध निर्माण करणं आणि सध्या सुरू असलेले संबंध टिकवणं कठीण जातं. त्यांचा आजार स्वीकारणं हे त्यांना व नातेवाईकांना नेहमीच जड जातं. या स्थितीचा मोठा परिणाम त्यांच्या नात्यांवर होतो. या रुग्णांना त्यांचा नातेवाईकांकडून प्रेम, आपलेपणा मिळत नाही. त्यामध्ये कुटुंबीय, मित्र मंडळी आणि त्यांचे जिवलग, जोडीदार यांचा समावेश असतो.

सोरायसिसमुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ताण आणि भावनिक दबाव सहन करावा लागतो. असे अनेक रुग्ण असतात ज्यांना अशावेळी सर्वांपासून अलिप्‍त राहावेसे वाटते; पण असे असले तरी ज्या रुग्णांना त्यांच्या कुटुंबाकडून आणि त्यांच्या सामाजिक वर्तुळातून पाठिंबा मिळतो, त्यांना स्वतःची शारीरिक स्थिती अधिक चांगली ठेवणं शक्य होते. असे रुग्ण उपचारांनाही अधिक चांगला प्रतिसाद देतात. याच्या जोडीला प्रेम, भावनिक पाठिंब्यामुळे किरकोळ ते गंभीर सोरायसिस रुग्णांमध्ये औषधं आणि उपचार पद्धतीमध्ये प्रभावी परिणाम दिसून येतात.

संबंधित बातम्या

त्यामुळे ज्यांच्या जिवलगांना सोरायसिसचा त्रास आहे त्यांनी यासाठी विशेष प्रयत्न करा. त्यांना प्रेम द्या, आपलेपणा द्या, आपुलकीने त्यांची काळजी घ्या, ती व्यक्‍तीही घरातील एक महत्त्वाची व्यक्‍ती आहे, हे त्याला जाणवून द्या. त्यांना सर्वोत्तम उपचार मिळवून देण्यासाठी आणि त्यांची तब्येत सुधारण्यासाठी त्यांना त्वचारोगतज्ज्ञांकडे घेऊन जा.

Back to top button