फुफ्फुसातील फायब्रॉसिस : माहिती आणि उपचार | पुढारी

फुफ्फुसातील फायब्रॉसिस : माहिती आणि उपचार

डॉ. अरविंद काटे

तुम्हाला नेहमी थकवा येतो का? सतत येणार्‍या खोकल्यामुळे तुम्ही अस्वस्थ असता का? अचानक कमी झालेल्या वजनामुळे तुम्हाला काळजी वाटते का? असे असेल तर तुम्हाला कदाचित फुफ्फुसांचा फायब्रॉसिस झाला असण्याची शक्यता असते. या आजारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

जेव्हा फुफ्फुसाच्या उतींना इजा होते किंवा भेगा पडतात, तेव्हा होणार्‍या आजाराला फुफ्फुसांचा फायब्रॉसिस असे म्हणतात. या जाड, कठीण उतीमुळे फुफ्फुसांचे कार्य व्यवस्थित पार पडत नाही. त्याचप्रमाणे फायब्रॉईडने अधिक गंभीर स्वरूप धारण केले की, तुम्हाला श्‍वास लागतो आणि परिस्थिती बिकट होऊन बसते. फुफ्फुसांच्या फायब्रॉईडसाठी अनेक घटक कारणीभूत असतात. त्याचप्रमाणे फुफ्फुसांच्या फायब्रॉईडमुळे होणारे फुफ्फुसाचे नुकसान भरून काढता येत नाही; पण यासंदर्भात दिलासादायक बाब ही की, औषधे आणि थेरपीमुळे या लक्षणांना हाताळता येते आणि जीवनमानात सुधारणा करता येऊ शकते.

फायब्रॉईडची लक्षणे, कारणे आणि उपचार ः

फुफ्फुसांच्या फायब्रॉईडमुळे फुफ्फुसाला पडणार्‍या भेगा पूर्णपणे बर्‍या करता येत नाहीत आणि त्यांची वाढ थांबविण्यासाठी एकही उपचार पद्धती सध्या उपलब्ध नाही.

यासाठी याच्या लक्षणांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तुम्हाला फुफ्फुसांचा फायब्रॉसिस झाला असेल तर, धाप लागणे, कोरडा खोकला, थकवा, अचानक वजन कमी होणे, स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना होणे, बोटे किंवा पायांची बोटे रुंद आणि गोलाकार होणे, यासारखी लक्षणे दिसतात. फुफ्फुसांच्या फायब्रॉसिसचा प्रकार आणि गांभीर्य हे व्यक्‍तीनुसार बदलते. काही व्यक्‍ती या आजारामुळे पटकन आजारी पडतात, तर काही व्यक्‍तींमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे दिसून येतात आणि हळूहळू म्हणजे काही महिन्यांच्या किंवा वर्षांच्या कालावधीत ही लक्षणे गंभीर स्वरूप धारण करतात. त्याचप्रमाणे काही रुग्णांच्या बाबतीत लक्षणे वेगाने गंभीर स्वरूप धारण करतात. म्हणजे, धाप लागणे हे लक्षण काही दिवस ते आठवड्यांपर्यंत टिकून राहते. काही वेळा ही परिस्थिती इतकी गंभीर होते की, त्या व्यक्‍तीला मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. त्यामुळे या आजारासाठी अँटिबायोटिक औषधे, कॉर्टिकॉस्टेरॉईड औषधे किंवा इतर औषधे देऊ शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला अशी काही लक्षणे दिसून आली तर, लगेचच डॉक्टरची भेट घ्यावी. त्याला विलंब केला तर परिस्थिती गंभीर होऊ शकते.

कारणीभूत ठरणारे घटक ः

फुफ्फुसातील फायब्रॉसिसमुळे फुफ्फुसातील हवेच्या पिशव्यांना भेगा पडतात आणि त्या जाड होतात. त्यामुळे तुमच्या रक्‍तप्रवाहामध्ये ऑक्सिजन जाण्यास अडथळा निर्माण होतो. काही विषारी घटक दीर्घ काळ शरीरात जाणे, विशिष्ट प्रकारचे आजार, रेडिएशन थेरपी आणि काही औषधे यामुळे फुफ्फुसांना अपाय होऊ शकतो. त्याचप्रमाणे सिलिकाचे कण, धान्यांचे कण, धातूंचे कण आणि पक्षी वा प्राण्यांची विष्ठा इत्यादी विविध प्रकारचे विषारी घटक इजा पोहोचवू शकतात.

धोकादायक घटक ः

फुफ्फुसाचा फायब्रॉसिस मुले आणि नवजात बालकांमध्ये दिसून येत असला, तरी मध्यमवयीन आणि वृद्धांमध्येही हा आजार आढळून येतो. धूम्रपान न करणार्‍यांच्या तुलनेत धूम्रपान करणार्‍यांमध्ये किंवा पूर्वी धूम्रपान केलेल्यांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो. त्याचप्रमाणे खाणकाम, शेती किंवा बांधकामाच्या ठिकाणी काम करणार्‍या किंवा फुफ्फुसाला अपाय करणार्‍या दूषित घटकांच्या संपर्कात आल्यास फुफ्फुसांचा फायब्रॉसिस होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे काही प्रकारचे फायब्रॉसिस आनुवंशिकही असतात.

प्रतिबंधात्मक उपाय ः 

फुफ्फुसांचे पुनर्वसन केल्याने तुमच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यास आणि जीवनमानात सुधारणा करण्यास मदत होते. सहनशक्‍ती वाढविण्यासाठी शारीरिक व्यायाम करणे, फुफ्फुसांची क्षमता वाढविण्यासाठी श्‍वसनाचे व्यायाम, धूम्रपान टाळणे, आहारासंदर्भात समुपदेशन आणि साहाय्य यांचा त्यात समावेश होतो.

फुफ्फुसांचा आजार असलेल्या व्यक्‍तीचे वजन कमी होते. कारण, अन्‍न सेवन करणे कठीण जाते आणि जेवताना श्‍वास घेण्यासाठी अतिरिक्‍त ऊर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे अतिरिक्‍त कॅलरी असलेला सकस आहार घेणे फायद्याचे ठरते. ताजी फळे, तृणधान्ये, कमी चरबी किंवा चरबीमुक्‍त पदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा आहारात समावेश करावा. ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट, अतिरिक्‍त मीठ असलेले पदार्थ आणि साखरयुक्‍त पदार्थ वर्ज्य करावेत. तज्ज्ञांशी चर्चा करून योग्य आहार ठरवू शकता. त्याचप्रमाणे चालणे, सायकल चालवणे इत्यादी व्यायाम तुम्ही करू शकता. पुरेशी विश्रांती घ्यावी.डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमितपणे घ्या. असे केल्याने तुमच्या जीवनमानात निश्‍चित सुधारणा होईल.

 

Back to top button