मातीच्या भांड्यातील पाणी आणि आरोग्य | पुढारी

मातीच्या भांड्यातील पाणी आणि आरोग्य

पूर्वी गार पाण्यासाठी घरोघरी माठ आणले जात. त्यात पाणी भरून मातकट वासाच्या पाण्याने गार पाणी पिण्याची तल्‍लफ भागायचीच; पण शरीरातील उष्णता कमी होण्यासाठीही मदत व्हायची. अर्थात, नंतर फ्रिज आले आणि प्लास्टिकचा शोध लागल्यानंतर माठाची जागा प्लास्टिक बाटल्यांतील फ्रिजच्या गार पाण्याने घेतली. अर्थात, मातीच्या भांड्यातील गार पाण्याचा घशाला त्रास होत नसे; पण फ्रिजमधील पाण्याने घशाचे आजार वाढीस लागले. आता पुन्हा एकदा पर्यावरणाची काळजी घेण्याच्या उद्देशाने का होईना आपण पुन्हा एकदा मातीकडे वळतो आहोत.

पर्यावरण रक्षणासाठी आपण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतोच. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधतही असतो. त्यातील एक भाग म्हणजे आता मातीच्या बाटल्या मिळू लागल्या आहेत. या आकर्षक आकारात उपलब्ध असतात. दिसताना या बाटल्या इतर बाटल्यांसारख्या असल्या तरी त्यातील पाण्याचे फायदे अनंत आहेत. अर्थात, मातीची भांडी लवकर फुटतात. तसेच मातीपासून तयार झालेल्या या बाटल्या खरेदी करताना मनात काही संभ्रम निर्माण होतात; पण मातीच्या भांड्यांची उपयोगिता जरूर लक्षात घ्यावी. त्याचे आरोग्यावर होणारे फायदेही जाणून घ्यावेत. 

चांगल्या चयापचयासाठी : मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आरोग्य फायदे होतातच. मातीच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील टेस्टोस्टेरोनची पातळी संतुलित राहते. तर प्लास्टिक शरीरातील हार्मोन्सच्या पातळीत घट करते. मातीच्या भांड्यातील पाणी नैसर्गिकरीत्या थंड होत असल्याने शरीराची चयापचय क्षमता किंवा मेटाबोलिझम वाढण्यास मदत होते. 

संबंधित बातम्या

नैसर्गिक थंड पाण्यासाठी : मातीची भांडी ही सच्छिद्र असतात. त्यामुळे जेव्हा माठात पाणी ठेवतो तेव्हा त्याचे बाष्पीभवन होते. मातीला अत्यंत सूक्ष्म छिद्रे असतात. त्यातून पाणी पाझरते ते बाहेरील उष्णतेतून ऊर्जा घेते जेणेकरून गॅस निर्माण होऊ शकेल आणि बाष्पीभवनाच्या या प्रक्रियेतून पाणी थंड होते. 

पर्यावरणपूरक : प्लास्टिक पर्यावरणाची हानीच करते; पण माती ही पर्यावरणातून म्हणजेच निसर्गातून येते. त्यामुळे पर्यावरणाची हानी करत नाही. काचेच्या बाटल्याही मिळतात; मात्र त्या महाग असतात. त्या सांभाळून वापराव्या लागतात. फुटल्यास इजाही करू शकतात; मात्र मातीच्या बाटल्यांचे तसे होत नाही. त्या फुटल्या तरी त्याने इजा होत नाही. तसेच त्या सांभाळणे, निगा राखणेही सोपे आहे. 

मातीचे क्षारीय गुण : माती ही क्षारीय गुणांची असते. पाण्याच्या आम्लाचा संपर्क होतो तेव्हा त्याचे पी.एच. संतुलन योग्य राहते. मातीच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याचे पी.एच. संतुलित राहत असल्याने पित्त होणे तसेच पोटात वायू होण्याची समस्या दूर होते. 

हिलिंग पॉवर किंवा रोग बरे करण्याची क्षमता : मातीमध्ये विविध खनिजे, इलेक्ट्रोमॅग्‍नेटिक ऊर्जा असते. जेव्हा आपण मातीच्या घड्यात पाणी साठवतो तेव्हा त्या पाण्यातही ते गुण उतरतात. त्यामुळे काही विकारांना हे पाणी उपयुक्‍त ठरते. पाण्यातही हिलिंग पॉवर किंवा बरे करण्याची क्षमता निर्माण होते. 

थोडक्यात, पर्यावरणाच्या काळजीपोटी विविध पर्यायात मातीच्या बाटल्या हा एक उत्तम मार्ग आहे. तो आपल्याला पर्यावरणाच्या, मातीच्या जवळ नेतोच; पण बिनबोभाट अनेक आरोग्याचे फायदेही करून देतो. प्लास्टिकला पर्याय म्हणून मातीच्या बाटल्या वापरणे नक्‍कीच शहाणपणाचे ठरेल. थोडीशी काळजी घेऊन त्या वापरल्या तर अधिक काळ टिकतीलही आणि आपला पर्यावरण राखण्याचा उद्देशही सफल होईल. प्लास्टिकचा आग्रह, गुलामी सोडू या आणि पुन्हा मातीकडे वळू या.

Back to top button