कांजिण्याची समस्या | पुढारी

कांजिण्याची समस्या

लहान मुलांना होणारा हा संसर्गजन्य आजार आहे. दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हा आजार होण्याची अधिक शक्यता असते. किंबहुना त्यांना हा आजार होतोच.

याआजारात सुरुवातीला एक ते दोन दिवस ताप येतो आणि नंतर प्रामुख्याने पायावर, पोटावर, पाठीवर फोड उठतात. या फोडांमध्ये पाण्यासारखा स्राव असतो. हे फोड फुटल्यावर काही दिवस काळसर डाग राहतो. थंडीत आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला या आजाराचा प्रादुर्भाव जास्त असतो. लहानपणी कांजिण्या झाल्या नसतील, तर मोठेपणी कांजिण्या येण्याची शक्यता असते.

हा आजार वॅरीसेला झोस्टर नावाच्या विषाणूंमुळे होतो.  हा संसर्गजन्य आजार आहे. कांजिण्या आलेल्या बालकाच्या फोडांपासून, त्याच्या कपड्यांपासून तसेच हवेतून या आजाराचा प्रसार होतो. या आजाराचा एका बालकाकडून दुसर्‍या बालकाकडे थेट संसर्ग होऊ शकतो. नाकातून तसेच घशातून बाहेर पडणार्‍या हवेचा दुसर्‍या व्यक्तीशी संपर्क आला की, कांजिण्यांची लागण होते.

कांजिण्यांचा कालावधी सात ते एकवीस दिवसांचा असतो. एकदा कांजिण्या येऊन गेल्यावर त्या व्यक्तीत रोगप्रतिकारक क्षमता उत्पन्न होते. त्यामुळे एकदा हा आजार झाल्यावर आयुष्यात पुन्हा कधीही तो होत नाही. ताप येणे, शरीरावर फोड येणे, अंग दुखणे, खाज सुटणे, सर्दी, खोकला होणे ही या आजाराची लक्षणे आहेत.

-डॉ. प्राजक्ता पाटील

Back to top button