मनोविकारांचे आव्हान | पुढारी | पुढारी

मनोविकारांचे आव्हान | पुढारी

डॉ. संतोष काळे

मानसिक आजारांकडे शारीरिक आजारांइतक्या गांभीर्याने पाहिले जात नाही आणि त्यांची दखल घेऊन वेळेवर उपचार घेतले जात नाहीत. परिणामी, बदलत्या जगातील ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर मानसिक आजार जडणार्‍यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तणाव, चिंता आणि अन्य मानसिक आजारांनी ग्रस्त लोकांची संख्या वाढली असून, आपल्या देशात प्रत्येक सात व्यक्तींमागे एका व्यक्तीला मानसिक आजाराने ग्रासले आहे. नव्या दशकात प्रवेश करताना मनोविकारांच्या आव्हानाचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. 

मानसिक आजारांचे वाढते प्रमाण पाहता आगामी काळात भारतात मनोरुग्णांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ‘लाइसेंट सायकॅट्री’च्या अहवालानुसार, सध्याच्या काळात देशभरात सुमारे 20 कोटी लोकांना कोणत्या ना कोणत्या मानसिक आजाराने पछाडले आहे. यापैकी सुमारे पाच कोटी लोक डिप्रेशन, सिझोफ्रेनिया आणि अँझाईटी या आजारांनी त्रस्त आहेत. डिप्रेशनमुळे आत्महत्या करणार्‍या व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढत आहे. या सर्वेक्षणानुसार, देशातील सात व्यक्तींमागील एका व्यक्तीला मानसिक आजाराने घेरले आहे. आणखी एका सर्वेक्षणानुसार, देशभरात 2019 च्या मध्यापर्यंत झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये 1500 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा चक्काचूर झाला. यातील सर्वाधिक मालमत्ता सरकारी होती. शेतकर्‍यांच्या आत्महत्या, युवकांमधील असंतोष आणि भडक वक्तव्यांचा भडिमार या गोष्टीही अनेकदा तणावास कारणीभूत ठरत आहेत. भारतात सन 2017 मध्ये प्रत्येक सात व्यक्तींमागील एका व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारे मानसिक आजाराने स्पर्श केला होता. यामध्ये डिप्रेशन, अँझाईटी आणि सिझोफ्रेनिया या आजारांचे बळी ठरलेल्या व्यक्तींची संख्या सर्वाधिक होती. डिप्रेशन आणि अँझाईटी या सार्वत्रिक समस्या असल्याचे दिसून आले. सुमारे साडेचार कोटी लोक या आजारांनी त्रस्त असल्याचे आढळले. या दोन्ही आजारांचा प्रभाव देशभरात वाढताना दिसून येत आहे. उत्तर भारतात अँझाईटीचा (चिंतेचा आजार) प्रभाव महिलांमध्ये आणि विशेषत्वाने दक्षिण भारतात सर्वाधिक पाहायला मिळाला. उत्तर भारतात तुलनेने या आजाराचा प्रभाव कमी दिसला. सर्वांत चिंतेची बाब म्हणजे मानसिक आजारांचे 2017 मधील प्रमाण 1990 च्या तुलनेत दुप्पट पाहायला मिळाले. गेल्याच आठवड्यात ‘लाइसेंट सायकॅट्री’ने अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यात या बाबी उघड झाल्या आहेत.

संबंधित बातम्या

यासंदर्भात केलेल्या सर्वेक्षणानुसार, 2017 मध्ये 19.7 कोटी लोक मानसिक आजारांनी ग्रस्त आढळले. डिप्रेशनच्या (तणाव) रुग्णांची संख्या वयस्क लोकांमध्ये अधिक प्रमाणात आढळली. डिप्रेशनमुळे होणार्‍या आत्महत्यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून आले. लहानपणीच जडणार्‍या मानसिक आजारांचे प्रमाण उत्तर भारतातील राज्यांत सर्वाधिक आढळले. अर्थात, देशभरात मुलांच्या बाबतीतील अशा प्रकारच्या आजारांचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून आले आहे. मनोविकाराने ग्रस्त असलेल्यांमध्ये 33.8 टक्के लोक डिप्रेशनने, 19 टक्के लोक अँझाईटीने तर 9.8 टक्के लोक सिझोफ्रेनियाने ग्रासलेले आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) प्राध्यापक आणि प्रमुख संशोधक राजेश सागर यांच्या मते, देशात मानसिक विकार असणार्‍यांची संख्या बरीच मोठी आहे.

मानसिक आजारांकडे विशेष लक्षच न देणे हे यामागील कारण आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वस्तुतः देशात मानसिक आरोग्य सेवांचा समावेश सर्वसामान्य आरोग्य सेवांमध्ये करण्याबरोबरच मानसिक आजारांवर उपचार घेण्याविषयी लोकांमध्ये असलेली लज्जा दूर करणे आवश्यक आहे. 1990 मध्ये एकंदर रुग्णांच्या संख्येपैकी 2.5 टक्के लोक मनोविकारांनी ग्रस्त असल्याचे दिसून येत असे. 2017 मध्ये हे प्रमाण बदलले आणि एकंदर रुग्णसंख्येच्या तुलनेत 4.7 टक्के लोक मनोविकारांनी ग्रस्त असल्याचे दिसून आले. 2017 च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, आपल्या देशातील लोकसंख्येच्या 7.5 टक्के लोकांना मानसिक आजारांनी घेरले आहे. 2005 ते 2015 या दहा वर्षांच्या कालावधीत जगभरात डिप्रेशनच्या रुग्णांचे प्रमाण 18 टक्क्यांनी वाढले. त्यावेळी जगभरात डिप्रेशनने ग्रस्त सव्वातीन कोटी लोक आढळून आले होते. त्यातील निम्मे रुग्ण आग्नेय आशियातील असल्याचे दिसून आले.

सर्वाधिक आणि सरासरी मनोरुग्णांचे प्रमाण असलेल्या राज्यांचा क्रम पुढीलप्रमाणे सांगितला गेला आहे. डिप्रेशनचे सर्वाधिक रुग्ण क्रमशः तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, केरळ, गोवा आणि महाराष्ट्रात आढळून आले. सर्वांत कमी अँझाईटीपीडित रुग्णांची संख्या क्रमशः मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार, मेघालय आणि केरळमध्ये आढळून आली. पंजाब विद्यापीठाच्या काही मनोविकार संशोधकांनी आणि पीजीआय चंदीगड येथील काही मनोविकार चिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही चॅनेल्सवर चालणार्‍या आक्रमक चर्चा, अपघात आणि हिंसाचाराच्या घटना आणि त्यांचे वार्तांकन, त्यात मृतदेह, बलात्काराची द़ृश्ये आणि घरगुती हिंसाचाराची द़ृश्ये वारंवार दाखविली जाणे या गोष्टींमुळे तरुणांमध्ये तणाव आणि अन्य मानसिक आजार मूळ धरतात. तज्ज्ञांच्या मते, काही औषधनिर्मिती कंपन्यांकडून तयार करण्यात येणारी वेदनाशामक औषधेही तणाव आणि दबाव वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. अशा औषधांचा वारेमाप वापर आणि खुली विक्री यामुळे तरुण पिढी तणावाच्या आजाराला बळी पडत आहे. हिंसा, तणाव, डिप्रेशन हे आजार राजकीय आंदोलने आणि निवडणुका यामुळेही वाढत असल्याचे दिसून आले आहे. पंजाब, राजस्थान, हरियाणा या राज्यांत गेल्या काही वर्षांपासून अंमली पदार्थांचे सेवन करणार्‍यांचे प्रमाण वाढताना दिसते. त्यामुळे आगामी काळात डिप्रेशन, अँझाईटी, दिशाहीनता, भरकटलेपण अशा मानसिक अवस्थांमध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत. सीमेपलीकडून अंमली पदार्थांची होणारी तस्करीही देशातील तरुण पिढीमध्ये मनोविकार वाढविण्यास कारणीभूत ठरली आहे.

Back to top button