कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर रत्नागिरी जिल्हा | पुढारी | पुढारी

कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर रत्नागिरी जिल्हा | पुढारी

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या सहा महिन्यांच्या कोरोनाबाधित बाळाचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आला आहे. साखरतर येथील ‘त्या’ दोन महिलांसह बाळाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर असून नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्‍त केले. गुरुवारी रात्री सोळा जणांचे अहवाल प्राप्‍त झाले. कोरोनाच्या द‍ृष्टीने या आशादायक स्थितीतुमळे जिल्हा लवकरच ग्रीन झोनमध्ये येणार आहे.

जिल्ह्यात गेल्या पंचवीस दिवसांत कोरोनाबाधित सहा रुग्ण सापडले होते. यातील शृंगारतळी येथील पहिला रुग्ण बरा होऊन घरी परतला तर खेड येथे सापडलेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर दिल्‍ली प्रवास केलेला मुंबईतील एक प्रौढ रत्नागिरीत आढळून आला होता. मात्र, त्याचेही दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले. त्यालाही रुग्णालयातून सोडण्यात आले. मात्र, 14 दिवसांसाठी या व्यक्‍तिला क्‍वारंटाईन करण्यात आले आहे. 

दरम्यान, साखरतर येथील दोन्ही महिलांसह बाळाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. यामुळे बर्‍या झालेल्या रुग्णांचा 14 दिवसांचा क्‍वारंटाईन कालावधी संपल्यानंतर रत्नागिरी जिल्हा ग्रीन झोनमध्ये येणार आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या शून्य झाली आहे.

जिल्ह्यातील तिघांचाही दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने आता  रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्‍त होणार आहे.  मात्र 3 मेपर्यत लॉकडाऊन असल्याने नागरिकांनी त्याचे काटेकोर नियमांचे पालन करावे, असे आवाहन ना. उदय सामंत यांनी केले आहे. 20 एप्रिलपासून उद्योग, व्यवसायांना मुभा देण्यात आली आहे. अटीशर्थींचे पालन करुन हे व्यवसाय सुरु करावेत. सोशल डिस्टन, मास्क वापरणे यालाही नागरिकांनी महत्व द्यावे असेही. ना. सामंत यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील नागरिकांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वांचे रक्षण करणार्‍या आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा, महसूल यंत्रणा, सफाई कर्मचार्‍यांपासून सर्वांनाच नागरिकांनी सहकार्याचा हात दिला आहे. जिल्हा कोरोना मुक्‍ततेकडे वाटचाल करीत असल्याने सर्वांचीच जबाबदरी वाढली असल्याचेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात कोरोनाचा परत शिकराव होऊ नये, यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहनही ना. सामंत यांनी केले आहे. 

गुरुवारी रात्री 16जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये छोट्या बाळाचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे नऊ पत्रकारांचेही स्वॅप नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचेही अहवाल निगेटीव्ह आले आहेत. मुंबईच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरीतील पत्रकारांची त्यामुळे सुटकेच्या निश्‍वास टाकला आहे.

Back to top button