रत्नागिरीत १२ रुग्ण वाढले; एकूण कोरोनाबाधित २०८ | पुढारी

रत्नागिरीत १२ रुग्ण वाढले; एकूण कोरोनाबाधित २०८

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा गुरुवारी (दि. २८) दोनशेच्या पार गेला असून, एकूण रुग्ण संख्या २०८ झाली आहे. 

गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात १२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये संगमेश्वर तालुक्यात चार जण त्यातील तिघेजण मेगी गावातले आहेत. चिपळूण तालुक्यातील दोन जण पॉझिटिव्ह असून दोघेही वाघिवरे गावांमधील रहिवासी आहेत. तर दापोली रत्नागिरी तालुक्यांमध्ये प्रत्येकी तीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

संबंधित बातम्या

आतापर्यंत ७६ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी रात्री पॉझिटीव्ह सापडलेल्या १२ जणांमध्ये आमदार योगेश कदम यांच्या चालकाचा समावेश आहे. बुधवारी रात्री पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या बाराजणांपैकी ६ जण रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात आहेत. 

क्रांतीनगर मजगाव येथील ४५ वर्षीय स्त्री ठाणे येथून आली होती. रत्नागिरी तालुक्यातील भंडारपुळे येथील ६२ वर्षीय वृध्द मुंबईतून आले होते. आगवे येथील २७ वर्षीय तरुण मुंबईतून आला होता. संगमेश्‍वर उक्षी वरचीवाडी येथील ५७ वर्षीय पुरुष मुंबईतून, साखरपा मुरलीधरआळी येथील ४४ वर्षीय स्त्रीही मुंबईतून आली होती. 

साखरपा देवळे येथील २५ वर्षीय तरुणही मुंबईतून आला होता. राजापूर तालुक्यातील प्रिंदावन येथून २९ वर्षीय तरुण, कोतापूर येथील ५५ वर्षीय प्रौढ तर कोंडीवले येथील ८ वर्षीय बालक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

कळंबणी येथे असणारा १९ वर्षीय तरुण चाकाळे बौध्दवाडी येथील असून तो कल्याण येथून आलेला आहे. तर चिपळूण मार्कंडी येथील ३४ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली असून तो डॉक्टर आहे. त्याची मुंबई प्रवासाची नोंद नाही. तर जामगे येथील २४ वर्षीय तरुण कांदिवलीमधून आला होता. आमदार योगेश कदम यांचा चालक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान हा तरुण कांदिवलीहून लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात आल्याची चर्चा सुरु आहे.

मुंबईतून येणारा ३० वर्षीय तरुण अर्ध्या रस्त्यात आला असताना, त्याने नायर रुग्णालयात केलेल्या टेस्टचा अहवाल प्राप्‍त झाला. हा अहवाल पॉझिटीव्ह असल्याची माहिती मिळाल्यानंतर या तरुणाने थेट जिल्हा रुग्णालय गाठले. या ठिकाणी त्याला उपचारासाठी दाखल करुन घेण्यात आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णाने वेळीच घेतलेल्या भूमिकेबद्दल प्रशासनाने त्याचे कौतुक केले. गेल्या काही दिवसात होमक्‍वारंटाईन झालेले चार ते पाचजण पुन्हा मुंबईला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पोलिस, महसूल, आरोग्य या तीनही यंत्रणांची मोठी धावपळ उडाली होती. 

मुंबईवरुन येणार्‍या चाकरमान्यांनी होम क्‍वारंटाईनला शिक्षा न समजता, यामुळे सर्वांच्याच सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे आवाहनही केले जात आहे.

मिरज येथून गुरुवारी १२८ अहवाल प्राप्‍त झाले. हे सर्व अहवाल निगेटीव्ह आहेत. यामध्ये दापोली २५, कळंबणी १, संगमेश्‍वर ५८, रत्नागिरी २१, कामथे १४ व राजापूर ९ अहवालांचा समावेश आहे.

जिल्ह्यात होम क्वारंटाईनची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. बुधवारी ही आकडेवारी ८९ हजार १२८ वर गेली होती.जिल्ह्यात अद्याप २०३ जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. जिल्हा रुग्णालयात ६४, कामथे उपजिल्हा रुग्णालयात ११, उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे ११, गुहागर ग्रामीण रुग्णालयात ३, खेड तहसीलदार अंतर्गत ६३, रत्नागिरी तहसीलदार २९, संगमेश्वर तहसीलदार यांच्या अंतर्गत ४ जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Back to top button