नाशिक : पाच मृतांचे अहवाल पॉझिटिव्ह | पुढारी

नाशिक : पाच मृतांचे अहवाल पॉझिटिव्ह

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संकट वाढत असून, शुक्रवारी (दि.29) दिवसभरात 45 नवीन रुग्ण आढळून आले. तर मालेगावमध्ये यापूर्वीच मृत झालेल्या पाच रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत झालेल्यांची एकूण संख्या 65 झाली आहे. दरम्यान, नव्याने सापडलेल्या 13 जणांमध्ये नाशिक शहरातील 10, मालेगावमधील सहा तर नांदगाव येथील तिघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या एक हजार 156 वर पोहोचली आहे. 786 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. 

नाशिकमध्ये सलग तिसर्‍या दिवशीही कोरोनाबाधितांचा आकडा चिंता वाढविणारा ठरला आहे. आडगाव येथील पोलीस मुख्यालयातील 43 व 29 वर्षीय कर्मचार्‍यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे चिंता व्यक्‍त केली जात आहे. याशिवाय उत्तमनगर येथील एका महिलेला या आजाराची लागण झाली असून, जुन्या नाशिकमधील 21 वर्षीय युवकही पॉझिटिव्ह आढळला आहे. तसेच सिडकोतील लेखानगर येथील 62 वर्षीय महिलेसह जुन्या नाशिकमध्ये वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच  द्वारका येथील गणेशनगर भागात वास्तव्यास असलेल्या 70 वर्षीय व्यक्‍तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पंचवटीतील गणेशवाडी येथील 34 वर्षीय व्यक्‍तीही बाधित सापडली असून, हा इसम यापूर्वी क्रांतीनगर येथे आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. पंचवटीमधील रामवाडी परिसरातील सीताराम कॉलनीत मुंबईहून कामानिमित्त आलेल्या 31 वर्षीय व्यक्‍तीला कोरोना झाला आहे.  पंचवटीतील महालक्ष्मी थिएटर येथील रुग्णाच्या संपर्कातील व त्यांच्याच कुटुंबातील 16 वर्षीय युवती तसेच सिन्‍नर फाटा येथील 26 वर्षीय रहिवाशाला कोरोनाची बाधा झाली आहे. सिन्‍नर फाटा येथील या इसमाला नातेवाइकांच्या संपर्कामुळे बाधा झाल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली. आज सापडलेल्या नवीन रुग्णांमुळे नाशिक शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 161 झाली आहे. त्यापैकी 50 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर आठ जणांचा या आजाराने मृत्यू झाला. शहरात सध्या 103 रुग्णांवर उपचार सुरू असून, शुक्रवारी मनपाच्या रुग्णालयांमध्ये नव्याने 77 संशयित दाखल झाले. अद्यापही 128 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. मनपाने तीन भाग प्रतिबंधित वगळले आहेत.

संबंधित बातम्या
Back to top button