कोरोनाः आयुर्वेदाने सहज मात शक्य | पुढारी

कोरोनाः आयुर्वेदाने सहज मात शक्य

सांगली : पुढारी वृत्तसेवा

आयुर्वेद हे हजारो वर्षापासून ऋषिमुनींनी संशोधन केलेले औषधी वनस्पती शास्त्र आहे. आयुर्वेदामध्ये कष्ट साध्य व असाध्य आजारही बरे करण्याची ताकद आहे. कोरोनासारख्या  आजारावर आयुर्वेदिक वनस्पतींद्वारे तयार केलेल्या औषधांच्या माध्यमातून  कोरोनाला प्रतिबंध निश्चितच करू शकतो, अशी प्रतिक्रिया वैद्य धनंजयराव दादासाहेब परदेशी यांनी व्यक्त केली. 

गेल्या 57 वर्षापासून ते आयुर्वेदाचे गाढे अभ्यासक असून  आयुर्विज्ञानाचार्य हे 55 वर्षापूर्वी आयुर्वेद आणि युनानीचे पदवीधर आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनातून अनेक असाध्य व्याधींवर यशस्वी उपचार करीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आयुर्वेदिक उपचारांविषयी माहिती दिली. त्यांच्या मते आयुर्वेदात बर्‍याचदा आजाराचे नाव न देता आजार बरे केले जातात. त्यामध्ये वात, पित्त, कफ प्रकृती या त्रिदोषांचे चढ-उतार, ऋतुमान, देश, काल, संसर्ग या व अशा अनेक मानसिक व्यथा यावरून नाव न देता यशस्वी उपचार केले जातात. यामधून अनेक असाध्य व कष्ट साध्य आजार बरे होतात. 

सध्या जगाला भेडसावणारी कोरोनाची महामारी  यामध्ये ताप, सर्दी, पडसे, खोकला, घशात खवखव, नाकातील स्त्राव, घशातील कफ, प्राणवह स्त्रोतसाच्यादृष्टीने फुफ्फुसामध्ये श्वासोच्छवासाला होणारे अडथळे अशी जीवघेणी लक्षणे  आढळू लागली आहेत. यावर आयुर्वेदाने निश्चितच मात करता येते. 

अशी लक्षणे आढळणार्‍या किंवा लक्षणे नसणार्‍या व्यक्तींनाही रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक उपचारांची गरज आहे. गेले पाच महिने लक्षणे आढळणार्‍या व्यक्तींवर उपचार केले. त्यापैकी आजपर्यंत एकही व्यक्ती दगावली किंवा आजारी पडली नाही. सुंठ, मिरे, दालचिनी, गुळवेल, पिंपळी, कोरफड, हळद, त्रिफळा, महासुदर्शन चूर्ण याबरोबरच गोमुत्रातून शुद्ध केलेली कडूनिंब, काढेचिराईत, निरगुडी, निर्मळी, अश्वगंधा, ढोरगुंज, सफेद चंदन, शिलाजीत, गोरखमुंडी, गोक्षूर, गुगुळ, हरीतकी, चक्रमर्द, हरिद्राखंड, शंखपुष्पी अशा अनेक सिद्ध केलेली औषधे असाध्य आजारात आणि कोरोनासदृश्य आजारात उपयोगी ठरू लागली आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असणार्‍या रुग्णांवर मी उपचार करत असून  माझ्या औषधाविषयी जर कोणाला शंका असतील त्या कोणत्याही पॅथीमधील डॉक्टर, वैद्य यांना मी ते सप्रमाण सिद्ध करून दाखवू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.

कोणतीही शंका कोणीही विचारावी, माझे उपचार त्यांना मी सांगू शकतो. कारण आज समाजाला याची नितांत गरज आहे. अनेक भागात बेड मिळत नसल्यामुळे रुग्ण दगावत आहेत. ही फार मोठी शोकांतिका आहे. लोकांनीही घाबरून जाता कामा नये. तातडीने उपचार घ्यावेत. 

सरकार आपल्यापरीने आटोकाट प्रयत्न करत आहे. त्याला लोकांनीही साथ देणे गरजेचे आहे. या महामारीतून वाचण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी अशा सर्वांनी एकमेकांना कमी न लेखता या महामारीतून सर्वांवरती उपचार करून रोगमुक्त, सदृढ, आरोग्यसंपन्न समाज घडविण्यासाठी समन्वय साधणे गरजेचे आहे. आज औषध दुकानामध्ये प्रचंड गर्दी वाढू लागली आहे. लोक बर्‍याचवेळा मनानेच औषधे खरेदी करतात किंवा गरज नसतानाही खरेदी करतात. हे थांबणे गरजेचे आहे. त्याबरोबरच लोक हवालदिल झाले आहेत. त्यांनाही विश्वासात घेणे गरजेचे आहे.

नागरिकांनी काय दक्षता घ्यावी

 लोकांनी घरातून बाहेर पडता कामा नये. 

 गरम पाण्याची वाफ घ्यावी, कोमट पाणी प्यावे.

 भीती न बाळगता तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

 लक्षणेविरहीत रुग्णांचे होम आयसोलेशन किंवा कोविड सेंटरमध्ये उपचार करणे

 साबणाने हात स्वच्छ धुवावेत. हस्तांदोलन टाळावे.

 पाणी गरम करून त्यामध्ये हळद, सुंठ टाकून गुळण्या कराव्यात.

 स्वतःच्या मनाने किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार घेवू नयेत.  कारण त्याचा अपायही होवू शकतो. 

 नियमित व्यायाम करावा.

Back to top button