हिरड्यांना सूज का येते?; जाणून घ्या कारणे | पुढारी

हिरड्यांना सूज का येते?; जाणून घ्या कारणे

डॉ. निखिल देशमुख

हिरड्यांवर सूज आल्यास आपल्याला बराच त्रास सहन करावा लागतो. सूज आल्यास हिरड्या दुखू लागतात आणि त्या नाजूक बनतात. हाताचा अथवा अन्य कोणताही स्पर्श झाल्यास त्या दुखू लागतात. या वेदना सहन करणे अनेकांना शक्य होत नाही. हिरड्या सूजण्याची अनेक कारणे असतात.

टार्टर किंवा प्लाक दातांवर जमल्याने हिरड्यांना सूज येते. याला जिंजीवायटीस असं म्हणतात. जिंजीवायटीसचं इंफेक्शन वाढलं तर हिरड्यांना आलेली सूज वाढते. याला पेरिओडाँटायटिस असं म्हणतात. व्हायरल किंवा फंगल इंफेक्शनमुळे काही वेळा ही सूज येऊ शकते. याखेरीज कवळी लावल्यानंतर सूज येण्याची शक्यताही अधिक असते. काही पदार्थ खाल्ल्यामुळे होणार्‍या किंवा दातांच्या किंवा हिरड्यांच्या अलर्जीमुळेही सूज येऊ शकते. हिरडीजवळ जखम झाल्यामुळे तेथे सूज येते. याखेरीज गरोदरपणात होणार्‍या हार्मोनमधील

बदलांमुळे हिरडी सुजण्याची शक्यता असते. काही वेळा शरारीतील उष्णता वाढल्यामुळेही हिरड्यांना सूज येऊ शकते. बहुतेक जण अशा प्रकारची सूज दिसल्यास घरगुती उपाय करताना दिसतात. पण, त्याऐवजी दंतवैद्यकाचा सल्ला घेणे आवश्यक असते. कारण बरेचदा घरगुती उपायांमुळे तात्पुरता दिलासा मिळत असला, तरी मूळ समस्या तशीच राहते. हिरड्यांच्या दुखण्याकडे, सुजण्याकडे लक्ष न दिल्यास गंभीर स्थिती ओढावू शकते. हिरड्यांना सूज येऊ नये यासाठी मौखिक आरोग्य चांगले राखणे गरजेचे आहे.

दिवसातून दोन वेळा स्वच्छ दात घासणे आणि अन्नपदार्थांचे सेवन केल्यानंतर खळखळून चुळा भरणे अपरिहार्य मानावे. तसेच तंबाखू, गुटखा, मावा, कोल्ड्रिंक, सोडा, अतिगोड पदार्थ यांचे सेवन दातांबरोबरच हिरड्यांच्या आरोग्यासाठीही मारक ठरते, हे लक्षात ठेवावे.

Back to top button