फूट अल्सरची समस्या आणि उपचार | पुढारी

फूट अल्सरची समस्या आणि उपचार

डॉ. भावेश पोपट

बॉडी अल्सर्स ही केवळ त्वचेची समस्या नव्हे, तर तो त्याहून अधिक गंभीर वैद्यकीय अवस्थेचा परिणाम आहे. वैद्यकीय तज्ज्ञाकडून वेळीच तपासून घेतले, तर शारीरिक वेदना व आर्थिक फटका दोन्ही टाळले जाऊ शकते. 

पायाच्या शिरांमधील अल्सर्स हे सामान्यपणे गात्रांमधील (लिम्ब) कमकुवत रक्ताभिसरणामुळे होतात. ते काही आठवड्यांपासून ते काही वर्षांपर्यंत राहू शकतात. हृदयाकडे रक्त परत पाठवणार्‍या पायातील शिरा त्यांचे काम नीट करत नाहीत, तेव्हा ते रक्त उलटे परत येते. यामुळे गात्रांवरील दाब वाढतो, त्वचा कमकुवत होते आणि त्यामुळे ती घासणे किंवा बरे करण्यासाठी तिला छेद देणेही कठीण होऊन बसते. व्हेन्स अल्सरमागील सर्वाधिक आढळणारी कारणे म्हणजे प्रायमरी व्हेरिकोज व्हेन्स, पोस्ट थ्रॉम्बोटिक सिंड्रोम, डीप व्हेन रिफर्स, मे-थर्नर सिंड्रोम आणि पेल्विक कंजेशन सिंड्रोम होय. व्हेनस अल्सर्स काही वेळा प्राणघातक वैद्यकीय अवस्थांपर्यंत जाऊ शकतातच, शिवाय रुग्णाच्या दैनंदिन आयुष्याचा दर्जा यामुळे खालावतो.

दैनंदिन आयुष्यातील मूलभूत हालचाली रुग्णासाठी कठीण होऊन बसतात. व्हेनस अल्सर्स होण्याचे प्रमाण बरेच आहे, त्याचे परिणाम एवढे घातक आहेत, तरीही भारतीय वैद्यकशास्त्रात या समस्येकडे पुरेसे लक्ष देण्यात आलेले नाही. गंभीर वैद्यकीय समस्यांबद्दल रुग्णांमध्ये असलेल्या अज्ञानामुळे सौम्य स्वरूपाच्या फूट सोर्सकडे दुर्लक्ष केले जाते आणि आजाराचे निदान वेळेत होऊ शकत नाही. त्यात अल्सर्सचे मूळ कारण शोधून काढण्यासाठी निदानात्मक सुविधा फारशा खात्रीशीर नाहीत, तसेच त्या सहज उपलब्ध होत नाहीत. आयव्हीयूएससारख्या अलीकडेच लागलेल्या वैद्यकीय संशोधनामुळे अचूक निदान शक्य झाले आहे. निदान अचूक झाल्यास रुग्णासाठी सर्वोत्तम उपचार योजना आखता येते. ही योजना रुग्णासाठी वैद्यकीय व आर्थिक अशा दोन्ही द़ृष्टींनी लाभदायी ठरू शकते.

मे-थर्नर सिंड्रोम

मे-थर्नर सिंड्रोम (इलिअ‍ॅक व्हेन काँप्रेशन सिंड्रोम/इलिओकॅवल काँप्रेशन सिंड्रोम/कॉकेट सिंड्रोम) हा व्हेनस फूट अल्सर आहे. या अवस्थेमध्ये ओटीपोटातील उजवी इलिअ‍ॅक धमनी डाव्या इलिअ‍ॅक धमनीवर दाब आणते आणि तिला अरुंद करून टाकते. परिणामी, रक्ताभिसरण असामान्य पद्धतीने होते आणि याचा परिणाम अल्सर्स किंवा डीव्हीटी अशा अनेक घातक स्वरूपांत होऊ शकतो. हे प्राणघातकही ठरू शकते. या अवस्थेतून जाणार्‍या बहुतेक रुग्णांना जोपर्यंत डीप व्हेन थ्रॉम्बोसिस (डीव्हीटी) होत नाही, तोपर्यंत लक्षणे जाणवत नाहीत. या गुठळ्या सहसा पायाच्या खालील भागात (पोटर्‍यांमध्ये) किंवा मांडीत होतात; पण त्या शरीराच्या अन्य भागांमध्येही होऊ शकतात. काही रुग्णांमध्ये डीव्हीटी न होताही वेदना, सूज, जडपणा जाणवणे, अल्सर्स किंवा डाव्या पायातील शिरा फुगणे आदी लक्षणे दिसून येतात. चालण्यास त्रास होत असल्याने दैनंदिन कामे कठीण होऊन बसतात.  

निदान व उपचार

याची लक्षणे फारशी जाणवत नसल्याने त्याचे निदान कठीण आहे. डॉक्टर रुग्णाला त्याचा वैद्यकीय इतिहास विचारण्यापासून तसेच त्याच्या शारीरिक तपासणीपासून सुरुवात करतात. रुग्णाची डावी इलिअ‍ॅक शीर अरुंद झाली आहे का, हे डॉक्टर इमेजिंग चाचण्यांचा वापर करून बघतात. एकदा का मे-थर्नर सिंड्रोमचे निदान झाले, की सर्जन स्टेंट आणि बलून्स वापरून अँजिओप्लास्टी करतात आणि आक्रसलेली इलिअ‍ॅक शीर रुंद करतात. रक्तप्रवाह सुरळीत झाला की, रक्त पायात साकळून राहत नाही आणि मे-थर्नर सिंड्रोम दूर होतो. 

 

Back to top button