टेस्टोस्टेरॉन : एक महत्त्वाचे संप्रेरक | पुढारी | पुढारी

टेस्टोस्टेरॉन : एक महत्त्वाचे संप्रेरक | पुढारी

डॉ. महेश बरामदे

टेस्टोस्टेरॉन हे पुरुषत्वाचे संप्रेरक मानले जाते. या संप्रेरकाच्या निर्मितीनंतर व्यक्तीच्या शरीरात पुरुषी बदल होऊ लागतात, हे त्यामागील कारण होय. शास्त्रज्ञ याला ‘मेल सेक्स हार्मोन’ असे म्हणतात. अर्थात, महिलांमध्येही टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक आढळते; मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प असते. पुरुषाच्या अंडकोशात हे संप्रेरक तयार होते. पुरुषाच्या आयुष्यात, प्रत्येक टप्प्यावर या संप्रेरकाची मोठी भूमिका असते. पुरुषाच्या स्नायूंमधील बदल, दाढी उगवणे, आवाज बदलणे, केसांचा विकास, स्त्रीसंगाची क्षमता, कामुकता आदी सर्व गोष्टी याच संप्रेरकाच्या माध्यमातून नियंत्रित केल्या जातात. अनेकांना आपल्या शरीरात या संप्रेरकाचे प्रमाण कमी आहे, असे वाटते. काही उपायांद्वारे या संप्रेरकात वाढ करता येते.  

व्यायाम आणि वजन उचलणे : टेस्टोस्टेरॉन वाढविण्यासाठी सर्वांत उपयुक्त उपाय म्हणजे व्यायाम. त्यामुळेच जे पुरुष नियमित व्यायाम करतात, त्यांचे स्नायू आणि शरीराचा आकार प्रमाणबद्ध झाल्याचे दिसते आणि त्यांची क्षमताही वाढल्याचा अनुभव येतो. ‘रेझिस्टन्स ट्रेनिंग’ म्हणजे वजन उचलण्यासारखे व्यायाम केल्यास टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाच्या प्रमाणात वाढ होते. याखेरीज ‘एचआयआयटी ट्रेनिंग’सुद्धा उपयुक्त ठरते.

प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि कार्बोहायड्रेटचे सेवन : आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींचाही आपल्या आरोग्यावर आणि टेस्टोस्टेरॉनच्या प्रमाणावर बराच परिणाम होतो. संशोधनानुसार अतिखाण्यामुळे शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. त्याचप्रमाणे प्रथिनयुक्त, आरोग्यवर्धक पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात केल्यास टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते. त्याचप्रमाणे कार्बोहायड्रेट्स आणि उत्तम प्रतीचे स्निग्ध पदार्थ टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत वाढ करू शकतात. त्यामुळे आपल्या आहारात अशा पदार्थांचा अंतर्भाव करावा, जेणेकरून फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांचा समतोल राखला 

जाईल. 

टेस्टोस्टेरॉनचे शरीरातील प्रमाण वाढविण्यास उपयुक्त असल्याच्या जाहिराती करणारी अनेक उत्पादने बाजारात येतात. परंतु, त्यापैकी काही औषधेच टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढविण्यास उपयुक्त असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यातील एक महत्त्वाची औषधी म्हणजे अश्वगंधा. एका अध्ययनानुसार अश्वगंधाचे सेवन केल्याने टेस्टोस्टेरॉनची पातळी 17 टक्के, तर वीर्याचे प्रमाण 167 टक्क्यांपर्यंत वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे अन्य एका संशोधनात आल्याचा अर्कसुद्धा टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढण्यास उपयुक्त असतो, असे आढळले आहे. अर्थात, आल्यावर करण्यात आलेले बहुतांश प्रयोग प्राण्यांवर करण्यात आले आहेत. परंतु, आल्याचे अनेक फायदे असतात, हे लक्षात घेऊन रोजच्या आहारात आल्याचा समावेश करावा. अर्थात, प्रकृती पाहून! 

उन्हात बसणे, ड-जीवनसत्त्व घेणे : बारा महिने सुरू असलेल्या एका संशोधनांती शास्त्रज्ञांनी असे नमूद केले की, रोज थोडा वेळ उन्हात बसल्यामुळे टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाची निर्मिती 25 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. त्याच आधारावर शास्त्रज्ञांनी या प्रक्रियेला नैसर्गिक टेस्टोस्टेरॉन वर्धक मानले आहे. शहरांमध्ये बहुतांश लोक उन्हापासून बचाव करताना दिसतात. त्यामुळे शहरांच्या तुलनेत खेडेगावातील पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण अधिक असते. 

चांगली झोप, भरपूर आराम : शरीरासाठी झोप ही एक आवश्यक प्रक्रिया आहे. परंतु, आजकाल लोकांचा दिनक्रम अत्यंत वाईट बनला आहे. चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम आणि आहार जितका आवश्यक आहे, तितकीच झोपही आवश्यक आहे. एका अध्ययनानुसार, जे लोक दिवसाकाठी चार तास किंवा त्याहून कमी झोप घेतात, त्यांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी बरीच घटते. याच संशोधनात असे आढळून आले आहे, की दर एक तासाची झोप आपल्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण 15 टक्क्यांनी वाढवीत असते. त्यामुळे दिवसाकाठी सात ते नऊ तास झोप घेणे अत्यावश्यक आहे. 

 

Back to top button