अस्थमाचे निदान व उपचार यामधील तफावत | पुढारी

अस्थमाचे निदान व उपचार यामधील तफावत

दरवर्षी मे महिन्यातील पहिला मंगळवार हा ग्लोबल इन्स्टिट्यूट फॉर अस्थमा या संस्थेतर्फे ‘जागतिक अस्थमा डे’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 3 मे रोजी हा दिवस जगभरात साजरा होत आहे. या दिवशी जगभरामध्ये अस्थमा-दम्याबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो व प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या थीम घेऊन हा कार्यक्रम राबवण्यात येतो. या वर्षीची थीम आहे “CLOSING GAPS IN ASTHMA CARE.’ याचा अर्थ – अस्थमाचे निदान व उपचार यामधील तफावत किंवा अंतर कमी करणे.

समाजामध्ये वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक स्तरांमध्ये तसेच वेगवेगळे वंश व देश यामध्ये अस्थमाचे निदान व उपचार यामधील तफावत आहे ती कमी करणे म्हणजेच सर्वांना चांगले उपचार उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे.

अस्थमाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दहा वर्षांत याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे आणि हे वाढण्याचे कारण वाढते शहरीकरण, बदलती जीवनशैली, बदलत्या खाण्याच्या सवयी व वाढते प्रदूषण ही आहेत. अस्थमाचे बर्‍याचदा वेळीच निदान केले जात नाही आणि त्यामुळे त्यावर उपचार करण्यास खूप उशीर होतो. आनुवंशिकता आणि वातावरणातील घटक हे अस्थमामधील महत्त्वाचे घटक आहेत. या आजारामध्ये श्वासनलिकेला सूज येते त्यामुळे येणार्‍या त्रासाचा समावेश होतो.

दम्याची लक्षणे :

1) वारंवार उद्भवणारा खोकला. विशेषत: रात्री आणि पहाटे, श्वास घेणे कठीण होते, खूप दिवस सलग खोकला राहणे.
2) धाप लागल्यासारखे होणे.
3) छातीत शिट्टीसारखा आवाज येणे.
4) रात्री झोपल्यावर छातीत घरघर आवाज येणे.
5) खेळताना किंवा पळताना लवकर दमल्यासारखे होणे.

ही लक्षणे औषधे घेतल्यावर तात्पुरती बरी होतात व काही दिवसांनी परत येतात व हळूहळू ही लक्षणे वाढत जातात.
काहीवेळा लहान मुलांमध्ये धाप लागणे, खोकला येणे अशा गोष्टी होतात; पण प्रत्येकाच्या बाबतीत तो अस्थमा असतो असे नाही. यातील काही बालके ही वाढत्या वयानुसार पूर्ण बरी होतात; पण काही बालकांना पुढे दमा चालू राहू शकतो. ज्या बालकांमध्ये आनुवंशिकता असते किंवा इतर अ‍ॅलर्जी दिसतात, त्यांना पुढे अस्थमा राहण्याची शक्यता जास्त असते.

मोठ्या माणसामध्ये धूम्रपान, वारंवार धुराशी येणारा संपर्क (चूल किंवा इतर प्रकारचा धूर) यामुळे दम्याची ही लक्षणे वाढतात. काही वेळा कामाच्या ठिकाणी धूर किंवा तत्सम वायूच्या सतत संपर्काने दमा होतो याला ‘ऑक्युपेशनल अस्थमा’ असे म्हणतात.

दम्याचे निदान

अस्थमाचे निदान प्रामुख्याने लक्षणावरून होते. त्यासाठी काही तपासण्या केल्या जातात.

अस्थमाच्या पेशंटला त्रास

– यामध्ये ट्रिगर्स व अ‍ॅलर्जेन असे प्रकार आहेत.

ट्रिगर्स – म्हणजे या वस्तूची अ‍ॅलर्जी नसते; पण या वस्तूमुळे अस्थमाचा त्रास वाढतो. उदा. 1) धूर – अगरबत्ती, सिगारेट, स्टोव्ह, लाकूड, शेणकूट, तंबाखू यांचा धूर, खडूची पावडर, टाल्कम पावडर, स्ट्रॉग परफ्यूम, बॉडी स्प्रे.

अ‍ॅलर्जेन- म्हणजे ज्या वस्तूची अ‍ॅलर्जी असते.उदा. 1) धूळ- कारपेट, गादी, सॉफ्ट टॉईज यावरील धूळ. 2) घरातील ओल्या भिंतीवरील बुरशी. 3) हवेतील परागकण. 4) प्राण्यांच्या अंगावरील लव.
अस्थमा असणार्‍यांनी वरील सर्व गोष्टी टाळाव्यात.

दम्यावरील उपचार : सुरुवातीच्या काळात जेव्हा एखाद्याला त्रास होतो त्यावेळी औषधे, वाफ द्यावी पण जसजशी ही लक्षणे वाढत जातात व वारंवार होतात त्यावेळी मात्र योग्य ट्रिटमेंट करणे आवश्यक आहे. यामध्ये रिलिव्हर्स आणि प्रिव्हेंटर्स अशा दोन प्रकारांची औषध वापरली जातात.

रिलिव्हर्स : ही औषधे खोकला, ताप, शिटी सारखा आवाज होताना दिली जातात.

कंट्रोलर – ही औषधे ज्यावेळी वारंवार त्रास व्हायला लागतो त्यावेळी चालू केली जातात व ही जास्त दिवसांसाठी द्यावी लागतात. तसेच यामध्ये प्रामुख्याने इन्हेलरचा समावेश होतो

इन्हेलर- यालाच मीटरडोस इन्हेलर असेही म्हणतात. इन्हेलरमधून औषधे देताना ती ज्या ठिकाणी गरज आहे, त्या ठिकाणी म्हणजे श्वासनलिकेत जातात आणि रक्तात जात नाहीत. तसेच इन्हेलरमधून जाणारे औषधाचे प्रमाण तोंडाने दिलेल्या औषधांपेक्षा खूप पटीने कमी असते. योग्य प्रकारचे इन्हेलर योग्य डोसमध्ये गेल्यास अस्थमाचा त्रास बर्‍यापैकी कमी होतो. उपचार चालू केल्यानंतर जसे त्रास कमी होत जातात, त्याप्रमाणे औषधांचे डोसही कमी कमी केले जातात. अस्थमा जर अलर्जीमुळे होत असेल तर त्याला अलर्जीक अस्थमा असे म्हणतात व अ‍ॅलर्जी स्किन प्रिक टेस्ट करून आपण हा अस्थमा अ‍ॅलर्जीमुळे आहे की नाही हे पाहू शकतो. या ट्रीटमेंटला इम्युनोथेरपी असे म्हणतात. या ट्रीटमेंटमध्ये ज्या वस्तूची अ‍ॅलर्जी आहे त्या वस्तूच्या विरुद्ध शरीरामध्ये प्रतिकारशक्ती तयार होऊन शरीराची प्रतिकार शक्ती वाढवली जाते व व त्यामुळे श्वासनलिकेची सूज येण्याचे प्रमाण कमी होऊन अस्थमाचा त्रासही कमी होतो.

अशाप्रकारे अस्थमाचे योग्य उपचार केल्याने त्याचे बरेच त्रास कमी होऊ शकतात व त्यासाठी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

डॉ. साईनाथ पोवार

Back to top button