Lok Sabha Election 2024 | बिहारात चुरशीच्या लढती, नितीशकुमार, तेजस्वी यादव यांची प्रतिष्ठा पणाला | पुढारी

Lok Sabha Election 2024 | बिहारात चुरशीच्या लढती, नितीशकुमार, तेजस्वी यादव यांची प्रतिष्ठा पणाला

सुनील डोळे

महागाई, बेरोजगारी आणि स्थानिक मुद्दे बिहारमध्ये यावेळच्या लोकसभा निवडणुकीत प्रभावी ठरत असल्याचे दिसून येते. पहिल्या दोन टप्प्यांत हेच चित्र दिसून आले. एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी यांच्यातील लढाईत बसपनेही उडी घेतल्यामुळे ही निवडणूक रंगतदार बनली आहे. एनडीएपुढे गेल्या वेळच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे, तर इंडिया आघाडीपुढे आपल्या जागा वाढविण्याचे आव्हान आहे. त्यामुळे नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बिहारमध्ये लोकसभेसाठी आज (मंगळवारी) तिसर्‍या टप्प्यातील मतदान होत असून, त्यामध्ये झंझरपूर, सुपौल, अरारिया, मधेपुरा आणि खगारिया या पाच मतदार संघांचा समावेश आहे. यावेळी एनडीएला विरोधी इंडिया आघाडीने तुल्यबळ उमेदवार दिल्यामुळे चुरस वाढली आहे. बसपने पाच उमेदवार रिंगणात उतरवले असून, त्यामुळे होणार्‍या मतविभाजनाचा फायदा कोणत्या पक्षाला मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पाच जागांसाठी 55 जण निवडणूक रिंगणात उतरले असून, त्यात तीन महिलांचाही समावेश आहे.

झंझरपूर येथील तिरंगी लढतीत जदयूने विद्यमान खासदार रामप्रीत मंडल यांना पुन्हा तिकीट दिले असून, त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या विकासशील इन्सान पक्षाने सुमनकुमार महासेठ यांना मैदानात उतरवले आहे. इंडिया आघाडीतील जागावाटपात ही जागा मांझी यांच्या पक्षाला सुटली आहे. मात्र, लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलात (राजद) तीव्र नाराजी उफाळून आल्यामुळे गुलाब यादव बसपच्या तिकिटावर आखाड्यात उतरले आहेत. त्याचा फटका महासेठ यांना बसू शकतो. मंडल यांनी पुन्हा एकदा विजयाचा निर्धार व्यक्त केला असला, तरी महासेठ हेही मातब्बर उमेदवार मानले जातात.

लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय जनता दलाने यावेळी नवे चेहरे मैदानात उतरविले आहेत. माजी उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांना या नव्या चेहर्‍यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यादव आणि मुस्लिम हे राजदचे पारंपरिक मतदान मानले जातात. तथापि, भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला शह देण्यासाठी तेजस्वी यांनी दलित आणि ओबीसी मते मिळविण्यासाठी निकराचे प्रयत्न चालविले आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मधेपुरा, सुपौल आणि झंझरपूर या जागा विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील जदयूने जिंकल्या होत्या. अरारियातून भाजप, तर खगारियातून लोजपने बाजी मारली होती.

जदयूने पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना मैदानात उतरविले आहे. भाजपनेही अरारियातून तसेच पाऊल उचलले आहे. तेथे प्रदीप कुमार सिंह यांच्यावर भाजपने तिसर्‍यांदा विश्वास टाकला आहे. त्यांच्या विरोधात राजदने शाहनबाज आलम यांना मैदानात उतरविले आहे. आलम यांचे वडील तस्लिमुद्दीन हेही लोकसभेवर निवडून गेले होते. याच्या उलट, मधेपुरातून तेजस्वी यांनी कुमार चंद्रदीप यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांचा मुकाबला जदयूचे विद्यमान खासदार दिनेश चंद्र यादव यांच्याशी आहे. सुपौलमधून राजदने आमदार चंद्र हास यांना संधी दिली असून, त्यांना जयदूच्या दिलेश्वर कुमेत यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत.

खगारियात लक्षवेधी लढत

खगारिया मतदार संघ इंडिया आघाडीतील भाकपला सुटला असून, तेथे या पक्षाने संजय कुमार यांना मैदानात उतरवले आहे. त्यांचा मुकाबला लोकजनशक्ती पक्षाचे राजेश कुमार या युवा नेत्याशी होणार आहे. या लक्षवेधी लढतीकडे सार्‍या बिहारचे लक्ष लागले आहे. येथे भाकपला मानणारा परंपरागत मतदार असल्यामुळे विजय कोणाला मिळणार, हे सांगणे कठीण बनले आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचारात कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही.

Back to top button