आतड्याचा कर्करोग :  दुर्लक्ष नको | पुढारी

आतड्याचा कर्करोग :  दुर्लक्ष नको

ऑस्ट्रेलियात पुरुष आणि महिलांत आतड्याचा कर्करोग होत असल्याचे निष्पन्न झाले असून या ठिकाणी हा तिसरा क्रमाकांचा कर्करोग मानला जातो. विशेष म्हणजे वयाची 50 ओलांडलेल्या लोकांत दिसतो. भारतात आतड्याच्या कर्करोगाचे देखील अनेक रुग्ण असून ते दिवसरात्र आयुष्याची लढाई करत आहेत.

आतड्याचा कर्करोग म्हणजे काय?

यास कोलन किंवा कोलेरेक्टरल कॅन्सर असेही म्हटले जाते. कारण हा विकार कोलन आणि मलाशयावर परिणाम करतात. त्यास पॉलिप्स असेही म्हटले जाते. आतड्याचा कर्करोग हा सर्वात धोकादायक विकार म्हणून उल्लेख केला जातो. अर्थात, हा कर्करोग बरा होऊ शकतो. परंतु, त्याचे निदान लवकर होणे गरजेचे आहे. यासाठी लक्षणाकडे बारकाईने पाहिले पाहिजे. काही वेळा कर्करोग हा लहान आतड्यापासूनच सुरू होतो, परंतु तो दुर्मीळ आहे.

लक्षणे कोणती?

आतड्याचा कर्करोग झाल्यास व्यक्तीला सुरुवातीच्या काळात स्वत:मध्येच बदल जाणवू लागतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे अंगलट येऊ शकते. शौचातून रक्त पडणे, सर्वसाधारण शौचाच्या वेळापत्रकात बदल होणे म्हणजेच गरजेपेक्षा अधिक शौचाला जाणे, पोटदुखी, सूज किंवा पोट आखडणे, शौच करताना दुखणे, अधिक थकवा जाणवणे, वजन कमी होणे, अ‍ॅनिमिया (पिवळा रंग पडणे, अशक्तपणा किंवा दम लागणे) आदी लक्षणे आहेत.

कारणे काय?

आतड्याच्या कर्करोगाची अनेक कारणे असून ते जोखीम वाढवतात. जेनेटिक रिस्क आणि फॅमिली हिस्ट्री, आतड्यासंबंधी आजार, गरजेपेक्षा अधिक मांसाहार, विशेषत: प्रोसेस्ड मीट, पॉलिप्स, अधिक वजन किंवा लठ्ठपणा, मद्याचे अधिक सेवन, धूम्रपान आणि तंबाखू.

असे निदान करा

आतड्याच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी अनेक चाचण्या केल्या जातात. सुरुवातीला डॉक्टर फिजिकल तपासणी करतात आणि त्यानंतर काही चाचण्या केल्या जातात.

स्क्रिनिंग : स्क्रिनिंग हे शौचातील रक्तासाठी केली जाणारी चाचणी आहे. ती घरात देखील करता येते. यास एफओबीटी देखील म्हटले जाते आणि ही चाचणी केवळ कमी जोखमीच्या लोकांसाठी असते. यात आतड्याच्या कर्करोगाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

रक्ताची चाचणी : आतड्याच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी रक्ताची चाचणी महत्त्वाची आहे. या माध्यमातून शौचातून रक्त तर जात नाही ना, याचा शोध घेता येतो. याशिवाय रक्ताच्या चाचणीत लाल पेशी काऊंट केल्या जातात. कारण आतड्याचा कर्करोग असलेल्या लोकांत लालपेशींवर परिणाम होतो.

कोलोनस्कोपी: आतड्याच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठी कोलोनस्कोपी ही एक चांगली चाचणी आहे. यात आतड्याच्या लांबीची तपासणी केली जाते. शौचाच्या वाटेतून लवचिक ट्यूब टाकण्यात येते आणि कोलनमध्ये हवा पंप केली जाते. ट्यूबमधील कॅमेराच्या माध्यमातून अ‍ॅबनॉर्मल टिश्यू दिसू लागतात.

फ्लेक्सिबल

सिग्मायोडोस्कोपी : फ्लेक्सिबल सिग्मा- योडोस्कोपीचा वापर लोअर कोलनच्या उजवीकडे असलेल्या रेक्टमची तपासणी करण्यासाठी केली जाते. पुढील तपासणीसाठी कोणत्याही असामान्य ऊतीला (टिश्यू) काढून टाकले जाते.

एमआरआय : एमआरआय स्कॅन शरीराची संपूर्ण माहिती गोळा करते आणि क्रॉस सेक्शनल पिक्चर तयार करते. यात ट्यूमर किंवा कर्करोगाचा शोध लावणे सोयीचे जाते.

सीटी स्कॅन : सीटी स्कॅन हे एकाचवेळी शरीरातील अनेक भागातील थ्री डायमेंशन्ल चित्र घेते आणि त्याचा आतड्याच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठी उपयोग केला जातो.

पेटस्कॅन : पॉजिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) स्कॅनमध्ये रेडिओधर्मी ग्लुकोजला लहान प्रमाणात शरीरात इंजेक्ट केले जाते. याप्रमाणे कर्करोगाच्या पेशी स्कॅनिंगमध्ये अधिक ठळकपणे दिसतात.

कर्करोग हा जीवघेणा आजार आहे. अनेक प्रकारचे कर्करोग आपल्याला ठाऊक आहेत. परंतु, आतड्याच्या कर्करोगाबाबत फार कमी माहिती लोकांना आहे. ब्रिटनमध्ये आतड्याचा कर्करोग हा चौथ्या
क्रमाकांचा आजार असून त्याअगोदर ब्रेस्ट, प्रोस्टेट आणि
फुप्फुसाच्या कर्करोगाचा नंबर लागतो.

डॉ. महेश बरामदे

Back to top button