Share Market : वेध शेअर बाजाराचा; बाजाराला अर्थसंकल्पाची प्रतीक्षा | पुढारी

Share Market : वेध शेअर बाजाराचा; बाजाराला अर्थसंकल्पाची प्रतीक्षा

भरत साळोखे (संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.)

गुरुवार, दि. 25 जानेवारी रोजी नवीन कॅलेंडर वर्षाची पहिली monthly expiry पडली. निफ्टीचा स्मॉल कॅप इंडेक्स वगळता बाकी सर्व इंडायसेंस या महिन्यात रेड झोनमध्ये बंद झाले. केवळ स्मॉल कॅप इंडेक्स अर्धा टक्का वधारला. बँक निफ्टी अर्धा टक्का घसरून पंचेचाळीस हजारांच्या खाली गेला. (44866.15) ( Share Market )

संबंधित बातम्या 

जानेवारी महिन्यातील बँकिंग सेक्टरच्या वाटचालीचे वैशिष्ट्य म्हणजे सरकारी बँकांचा निर्देशांक 6.33 टक्क्यांनी वाढला, तर खासगी बँकांचा निर्देशांक 7.13 टक्क्यांनी घसरला. सरकारी बँकांमध्ये बँक ऑफ इंडियाचा शेअर सुपरस्टार ठरला. 20 टक्के वाढ नोंदवून तो 131.50 रुपयांवर बंद झाला. त्याला युनियन बँक (19.80 %), महाराष्ट्र बँक (18.01 %), सेंट्रल बँक (11.49 %) यांनी चांगली साथ दिली. परंतु, सरकारी बँकांची ही कामगिरी खासगी बँकांनी झाकोळून टाकली. त्यामध्ये एचडीएफसी बँकेचा वाटा सगळ्यात मोठा होता. (उणे साडेपंधरा टक्के), कोटक बँक, इंडसइंड बँक, अ‍ॅक्सिस बँक यांनीही पाच टक्क्यांपेक्षा अधिक घसरण नोंदवली.

सरकारी कंपन्या (झडए) आणि रिअ‍ॅल्टी कंपन्या गेले कित्येक आठवडे बाजाराला वाढवण्यास किंवा अलीकडे रोखून धरण्यास हातभार लावत आहेत. गतसप्ताहातही रिअ‍ॅल्टी इंडेक्स 7.67 %, तर पीएसई इंडेक्स 7.39 % वाढला. बाजाराला खाली खेचण्यात निफ्टी मीडिया इंडेक्सचा वाटा सर्वाधिक होता. सव्वा अकरा टक्के हा इंडेक्स खाली घसरला. झी लिमिटेड आणि सोनी एंटरटेनमेटंचे विलीनीकरण सोनीने एकतर्फी रद्द झाल्याची घोषणा केली. झीलचा शेअर सव्वा चौतीस टक्के कोसळला (रु. 163.20) आता हा शेअर 100 रुपयांपर्यंत खाली गेला, तर आश्चर्य वाटायला नको. सरकारी कंपन्यांमध्ये REC ने 10 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदवली.

शुक्रवारी 26 जानेवारीनिमित्त भारतातील शेअर बाजार बंद राहिले. त्या दिवशी मनी कंट्रोलने आपल्या पोर्टलवर 25 जानेवारी 2022 ते 25 जानेवारी 2023 या एक वर्षातील भारतीय शेअर बाजाराचा छोटासा आढावा प्रसिद्ध केला. त्यामध्ये एका वर्षातील 68 मल्टिबॅगर शेअर्सची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या शेअर्सनी गेल्या एक वर्षात 100 टक्के ते साडेचारशे टक्के रिटर्नस दिले आहेत.

रिझर्व्ह बँकेकडून व्याज दर कमी होण्याची आशा, GDP Growth समाधानकारक राहण्याची शक्यता. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल, देशी गुंतवणूक संस्थांचा भक्कम आधार, क्रूड ऑईलचे स्थिर दर ही काही कारणे मागील वर्षाच्या तेजीमागे होती. आता चालू वर्षातील भारतीय शेअर
बाजाराच्या वाटचालीमध्ये भारतातील लोकसभा निवडणुका, अमेरिकेतील निवडणुका, फेडरल रिझर्व्हचे व्याज दर धोरण या मुद्द्यांचा प्रभाव असेल.

1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अंदाजपत्रक सादर होईल. कोणत्याही देशाचा शेअर बाजार हा त्या देशाच्या सरकारची वित्तीय धोरणे आणि कायदे आणि कंपन्यांची आर्थिक कामगिरी या दोन बाबींवर मुख्यत्वे उभा राहतो आणि वाटचाल करतो. त्याद़ृष्टीने येणार्‍या अर्थसंकल्पात बाजाराला अनुकूल, प्रतिकूल कोणकोणत्या तरतुदी असतील याची प्रचंड उत्सुकता सर्वांना असणार. बजेटच्या तोंडावर बाजार आता करेक्शन अनुभवतो आहे. निवडणुका लगेचच होणार असल्याने सामान्य करदात्याला आयकरात अधिक सवलत मिळण्याची शक्यता आहे.

रिअर इस्टेट आणि बँकिंग अँड फाइनान्शियल सर्व्हिसेस शेअर्स बहरास येतील. रेल्वे, संरक्षण, इन्फ्रास्ट्रक्चर, ऊर्जा ही क्षेत्रे तर दरवर्षीच्या अर्थसंकल्पीय सवलतींचे हक्कदार असल्यासारखी परिस्थिती असते. खते, कागद या कंपन्यांचे शेअर्सही वाढतील. ( Share Market )

मल्टिबॅगर शेअर्स यादीतील प्रमुख पाच शेअर्स

1) IRFC -444%, Returns cmp Rs. 173.80
2) Suzlon -347. 89 %, Returns cmp Rs. 42.45
3) BSE -300.25%, Returns cmp Rs.2142
4) RVNL -299%, Returns cmp Rs. 301.75
5) RECL -290.17%, Returns cmp Rs. 470

Back to top button