छोट्या गुंतवणूकदारांना खात्रीशीर मोबदल्याचे आमिष दाखवले जाते आणि यातून त्यांची फसवणूक होते. असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अनेक जणांनी गुंतवणुकीचे शिक्षण देण्याच्या नावाखाली शेअर बाजारातील व्यवहारांबाबत टिप्स देणारी खाती व समूह (ग्रुप्स) सोशल मीडियावर सुरू केली आहेत. तसेच काही मोबाइल अॅप्लिकेशन्स आहेत आणि त्यांचे लाखो सबस्क्रायबर्सही आहेत. हे लोक वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरतात. यातील काही फॉलोअर्स वाईट अनुभवातून शिकले आहेत, तर काहींचे डोळे अद्याप उघडलेले नाहीत. अनियंत्रित सेवाधारित 'हॉट टिप्स' आणि समभागांतून खात्रीशीर मोबदला मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या अनधिकृत घटकांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे शेअर बाजाराने, विशेषतः एनएसईने (National Stock Exchange) यात लक्ष घातले आहे आणि गुंतवणूकदारांना संभाव्य फसवणुकीबाबत सावध करण्यासाठी नियमित सल्ले जारी केले जात आहेत.
गुंतवणूकविषयक सल्ला देण्याचा आणि त्यासाठी शुल्क आकारण्याचा अधिकार केवळ नोंदणीकृत गुंतवणूकदार सल्लागारांना व अधिकृत संशोधन विश्लेषकांनाच आहे हे बाजार नियंत्रक यंत्रणा सेबीने स्पष्ट केले आहे. चढउतार हे शेअर बाजाराचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे शेअर्स किंवा गुंतवणूक उत्पादनांवर 'खात्रीशीर मोबदला' मिळवून देण्याचा दावा करणेही चुकीचे आहे. मात्र, सातत्याने वाढत असलेल्या ऑनलाइन सोशल प्लॅटफॉर्म्ससोबत फसवणुकीची प्रकरणेही दिवसागणिक वाढत आहेत आणि नवीन गुंतवणुकादारांना अनधिकृत घटकांद्वारे 'दमदार मोबदल्याच्या' जाळ्यात अडकवले जात आहे. हे संकट दूर करण्यासाठी, एनएसई गुंतवणूकदारांना मदत करण्याचा प्रयत्न एनएसई करत आहे. गुंतवणूकदारांना फसवणुकीच्या प्रकारांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एनएसईतर्फे सल्ले जारी केले जातात. कधीकधी दिवसातून तीन वेळाही सल्ले जारी केले जातात.
रिटेल गुंतवणूकदारांना फसवण्याची मोडस ऑपरेंडी (गुन्ह्याची पद्धत) काय आहे? पद्धती अनेक आहेत. लोकांना खात्रीशीर मोबदल्याची' हमी देऊन त्यांच्याकडून पैसा गोळा करणे ही पद्धत सर्वाधिक प्रमाणात आढळते. काही जण तज्ज्ञ ट्रेडर्स किंवा गुंतवणूकदार असल्याचा दावा करून गुंतवणूकदाराचे ट्रेडिंग खाते हाताळण्याचा प्रस्ताव देतात. ते गुंतवणूकदारांना यूजर आयडी व पासवर्ड विचारतात, जेणेकरून, गुंतवणूकदारांच्या वतीने ते ट्रेड करू शकतील. विविध गुंतवणूक योजनांवर मोबदला मिळवून देण्याची हमी ते देतात आणि अनधिकृतपणे पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवाही पुरवतात. आपण तज्ज्ञ आहोत हे गुंतवणूकदारांना पटवून देण्यासाठी ते स्वतःच्या खात्यांचे स्क्रीनशॉट्स पाठवतात, त्यांनी किती पैसे कमावले आहेत हे दाखवतात. महागड्या गाड्या, रेस्टोरंट्समधील जेवण किंवा नेत्रसुखद ठिकाणी घालवलेल्या सुट्या ह्यांचे फोटो वारंवार पोस्ट करून ते त्यांच्या भपकेबाज जीवनशैलीची जाहिरात सोशल मीडियावर करतात. या दिखाऊपणामुळे किंवा श्रीमंतीच्या प्रदर्शनामुळे अशा आयुष्याची इच्छा बाळगणारी सामान्य माणसे त्यांच्याकडे आकर्षित होतात.
शेअर बाजारातील कोणत्याही योजनेद्वारे खात्रीशीर किंवा निश्चित मोबदल्याची ग्वाही देण्यास कायद्याने मनाई आहे, त्यामुळे असे कोणतेही योजना किंवा उत्पादनाला सबस्क्राइब करू नका असा सल्ला एनएसई सातत्याने देत असते. शिवाय, यूजर आयडी किंवा पासवर्ड यांसारखी ट्रेडिंग क्रिडेन्शिअल्स कोणालाही सांगू नका, हा सल्लाही गुंतवणूकदारांना सातत्याने दिला जातो. ह्या लोकांनी कोठेही सदस्य म्हणून नोंदणी केलेली नसते किंवा ते कोणत्याही एक्स्चेंजचे अधिकृत प्रतिनिधी नसतात, असे अनेक प्रकरणांमध्ये लक्षात आले आहे. एनएसईने त्यांच्या सल्ल्यांमध्ये अशा लोकांना संबोधण्यासाठी विशिष्ट नावांचा उल्लेख केला आहे. आता अशा कृतींमध्ये गुंतलेल्या प्रत्येक संस्था किंवा व्यक्तीचे नाव घेणे नियामक यंत्रणेला किंवा एक्स्चेंजला शक्य नाही हे लक्षात घ्या. आपल्याला त्यातील ध्वनित अर्थ समजून घेता आला पाहिजे, आपल्या समोर चुकीच्या पद्धतीने विक्री करण्याची किंवा फसवणुकीची प्रकरणे आली तर या प्रकरणातील नमुन्यांचे निरीक्षण करता आले पाहिजेत व ते ओळखता आले पाहिजे.
अशा प्रतिबंधित योजनांमध्ये सहभाग घेण्याची जोखीम, खर्च व परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत हे गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावे, कारण, ह्या योजनांना एक्स्चेंजची मंजुरी नसते आणि त्यांचे समर्थनही एक्स्चेंज करत नाही. एनएसईने हे वेगवेगळ्या सल्ल्यांमधून वारंवार अधोरेखित केले आहे.
अशा प्रतिबंधित योजनांबाबत काही वाद निर्माण झाल्यास कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही याचीही गुंतवणूकदारांनी नोंद घ्यावी. गुंतवणूकदारांनी अशा योजनांमध्ये पैसा गुंतवला तर त्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण मिळत नाही. उदाहरणार्थ, एक्स्चेंजच्या कार्यक्षेत्रातील गुंतवणूक संरक्षण मिळू शकत नाही, एक्स्चेंजच्या वाद निवारण यंत्रणेचा लाभ मिळू शकत नाही किंवा एक्स्चेंजद्वारे राबवल्या जाणाऱ्या तक्रार निवारण यंत्रणेचा लाभ मिळू शकत नाही.
केवळ एवढेच नाही, तर एनएसई नियमितपणे गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम राबवत असते आणि आपल्या वेब पोर्टलवर ऑनलाइन शैक्षणिक साहित्य प्रसिद्ध करत असते. भांडवल बाजारातील गुंतवणूक, मार्जिनविषयक दंड, कॉर्पोरेट कृती, गुंतवणूकदार तक्रार निवारण यंत्रणा आदींची माहिती ह्याद्वारे गुंतवणूकदारांना दिली जाते.
दरम्यान, काही अनियंत्रित इंटरनेवरस्थित ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स काही अनियंत्रित उत्पादने देऊ करत आहेत, यामध्ये काँट्रॅक्ट्स फॉर डिफरन्स (सीएफडी), चलनांवरील दुहेरी पर्याय, आंतरराष्ट्रीय शेअर निर्देशांक, कमोडिटीज आणि अगदी क्रिप्टोकरन्सींचाही समावेश होतो. हे प्लॅटफॉर्म्स खात्रीशीर तसेच चढ्या मोबदल्याचे आमीष दाखवून गुंतवणूकदारांना मोहात पाडत आहेत, असे सेबीनेही आपल्या एका गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रमात नमूद केले होते. अशा नफ्याची हमी देणाऱ्या योजनांना बळी पडू नये म्हणून गुंतवणूकादारांना सावध करण्यात आले होते.
केवळ नोंदणीकृत मध्यस्थांसोबत व्यवहार करण्यास आणि अनियंत्रित उत्पादनांमधील व्यवहारांपासून दूर राहण्यास, एनएसई गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देत आहे. एका शैक्षणिक स्वरूपाच्या गुंतवणूकदार अहवालात एनएसईने गुंतवणूकदारांना केलेल्या सूचनांमध्ये स्टॉकब्रोकरकडे पैसा निष्क्रिय स्वरूपात ठेवणे टाळण्याचीही सूचना होती. ३० ते ९० दिवसांतून एकदा खाती सेट्ल करण्याचा सल्लाही एनएसई गुंतवणूकदारांना देते.
९० दिवसांहून अधिक काळ उलटून गेलेले किंवा एक्स्चेंजवर न झालेल्या व्यवहारांचे दावे एक्स्चेंजच्या डिफॉल्टर समितीद्वारे स्वीकारले जात नाहीत, हेही एनएसईने स्पष्ट केले आहे. ब्रोकर्सनी क्लाएंट्सकडून तारण सिक्युरिटीजच्या स्वरूपात आणि केवळ मार्जिन तारणाच्या मार्गानच स्वीकारावे असा सल्ला ब्रोकरांनाही दिला जातो.
केवळ क्लाएंटद्वारे सिक्युरिटींची विक्री करून केल्या जाणाऱ्या सेट्लमेंटसाठी सिक्युरिटींच्या हस्तांतराला परवानगी आहे, असे एनएसईने म्हटले आहे.
गुंतवणूकदारांनी मोबाइल क्रमांक किंवा ईमेल आयडी यांसारखे संपर्काचे तपशील स्टॉकब्रोकरकडे अद्ययावत राखावे, जेणेकरून, स्टॉक ब्रोकर व एक्स्चेंजद्वारे पाठवली जाणारी माहिती मिळत राहू शकेल, असा सल्लाही गुंतवणूकदारांना देण्यात आला आहे.
शिवाय, ट्रेडिंग सदस्यांद्वारे कळवण्यात आलेल्या फंड्स व सिक्युरिटी बॅलन्सबाबत एक्स्चेंजेसकडून पाठवले जाणारे संदेश तपासत राहण्याची तसेच त्यात काही तफावत आढळल्यास एक्स्चेंजकडे तक्रार करण्याची सूचनाही एनएसईने गुंतवणूकदारांना केली आहे. सेबीकडे नोंदणी असलेल्या शेअर ब्रोकरशिवाय अन्य कोणाकडेही, मग त्यात एपी किंवा ब्रोकरच्या सहयोगींचाही समावेश होतो, ट्रेडिंगसाठी निधीचे हस्तांतर करू नये, असेही एनएसईने गुंतवणूकदारांना सांगितले आहे.
शेअर बाजार दीर्घकालीन संपदा संचयाचे साधन आहे. अनेक लोक त्याकडे झटपट पैसा कमावून देणारा प्लॅटफॉर्म म्हणून बघतात. शेअर बाजारात गुंतवणूकदारांहून अधिक ट्रेडर्स असतात. अनेक लोक फ्युचर्स व ऑप्शन्समध्ये नशीब आजमावून गुंतवणुकीचा प्रवास सुरू करतात असेही निदर्शनास आले आहे. ट्रेडर असण्यात चुकीचे असे काहीच नाही पण बहुतेक जण उसन्या ज्ञानाच्या आधारावर ट्रेडिंग करतात. तसे न करता विश्वासार्ह स्रोतांकडून योग्य मार्ग शिकून घेतले पाहिजेत. एनएसईच्या वेबसाइटवरही प्रथमच ट्रेडिंग करणाऱ्यांना ट्रेडिंगसाठी तयार करण्यात मदत करणारा बराच मजकूर आहे. वित्तीय बाजारांची पायाभूत तत्त्वे किंवा वित्तीय बाजारांच्या संकल्पना यांसारखे गुंतवणूक सल्ले किंवा ज्ञानाधारित मजकूर उपलब्ध आहे. एनएसई अकॅडमीमध्ये अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील गुंतवणुकांविषयीचे ज्ञान तर देतातच, शिवाय, या क्षेत्रातील नोकऱ्यांसाठीही सज्ज करतात.
एक्स्चेंजेस व नियामक यंत्रणा दक्ष असतात. आजूबाजूला घडणाऱ्या फसवणुकांबाबत त्या गुंतवणूकदारांना वारंवार माहिती देत असतात. आपली हाव किंवा भोळसटपणा यांमुळे सोशल मीडियाद्वारे टाकल्या जाणाऱ्या जाळ्यात अडकण्यात अर्थ नाही हे आता गुंतवणूकदाराला कळून चुकले पाहिजे. यात कटू अनुभव आलेले लोक पुन्हा शेअर बाजारात प्रवेश करण्यास धजावत नाहीत. अचूक साधनांच्या माध्यमातून अध्ययन आणि पुरेशा ज्ञानासह केलेली गुंतवणूक ह्यांमुळे तुम्ही चतूर गुंतवणूकदार व ट्रेडर होऊ शकता. तुमच्या स्वतःच्या कौशल्यांवर विश्वास ठेवा. शेअर बाजाराच्या दीर्घकालीन प्रवासाचा भाग व्हा. दीर्घकाळ खेळणारा खेळाडू व्हा. भारताच्या वाढीच्या गाथेत सहभाग घेण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. तुमच्या गुंतवणुकीमुळे उद्योगांना त्यांचा व्यवसाय विस्तारण्यात मदत होईल आणि भारत समृद्ध होईल. संपत्तीही कमावा आणि शहाणपणाही कमावा. गुंतवणूक करत राहा.
हे ही वाचा :