

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजाराला शनिवारी सुट्टी असते. पण स्टॉक एक्स्चेंज बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) ने या शनिवारची शेअर बाजारासाठी असलेली सुट्टी रद्द केली आहे. अनपेक्षित डिझास्टर हाताळण्याच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी उद्या विशेष थेट ट्रेडिंग सत्र आयोजित केले आहे. शनिवारचे विशेष सत्र दोन सत्रांमध्ये विभागले जाईल जेथे इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये ट्रेडिंग, सेटलमेंट आणि बिलिंग सामान्य पण कमी कालावधीसाठी होईल. (Share Market)
संबंधित बातम्या
जाणून घ्या लाइव्ह ट्रेडिंगची वेळ
NSE आणि BSE वर प्री-ओपन सत्र सकाळी ९ वाजता सुरू होईल आणि सकाळी ९:१५ ते १० वाजेदरम्यान सामान्य ट्रेडिंग होईल. डिझास्टर रिकव्हरी साइटचे प्री-ओपनिंग सत्र सकाळी ११:१५ वाजता सुरू होईल, त्यानंतर सकाळी ११:३० वाजता सामान्य ट्रेडिंग होईल आणि दुपारी १२:३० वाजता बंद होईल.
या विशेष लाइव्ह ट्रेडिंग सत्रादरम्यान सर्व फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स ५ टक्क्यांच्या ऑपरेटिंग रेंजच्या अधीन असतील. सिक्युरिटीज, ज्यामध्ये F&O सेगमेंटमध्ये व्यवहार केला जातो, त्यांची अप्पर आणि लोअर सर्किट मर्यादा ५ टक्के असेल. २ टक्के अप्पर आणि लोअर सर्किट मर्यादा असलेल्या सिक्युरिटीजची २ टक्के मर्यादा कायम राहणार आहे.
शेअर बाजारात आठवड्यातील केवळ पाच दिवस ट्रेडिंग सुरु असते. सोमवार ते शुक्रवार दरम्यानच्या दिवसात शेअर बाजारात व्यवहार चालतात. पण, २० जानेवारी सुट्टीच्या दिवशीही शेअर बाजार खुला होणार आहे. या दिवशी एक विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे.
आठवड्याच्या शेवटी शेअर बाजार सुरु राहण्याची ही पहिलीच वेळ नाही. कारण यापूर्वी २०२० च्या अर्थसंकल्पावेळी बीएसई आणि एनएसई शनिवारी सुट्टीच्या दिवशी ट्रेडिंगसाठी उघडला होता.
२० जानेवारी हा सेटलमेंट हॉलिडे आहे, याचा अर्थ F&O सेगमेंटमधील कोणतेही क्रेडिट आणि १९ जानेवारीपासून इंट्राडे नफा या सत्रादरम्यान ट्रेडिंगसाठी उपलब्ध होणार नाहीत. शनिवारी केलेल्या फंड काढण्याच्या विनंतीवरही प्रक्रिया केली जाणार नाही, असे सांगण्यात आले आहे.
"ट्रेडिंग सदस्यांना विनंती करण्यात आली आहे की एक्सचेंज शनिवारी, २० जानेवारी २०२४ रोजी इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये प्राइमरी साइट (PR) ते डिझास्टर रिकव्हरी साइट (DR) पर्यंत इंट्राडे स्विच ओव्हरसह विशेष लाइव्ह ट्रेडिंग सत्र असेल," असे BSE आणि NSE ने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.