महती नवदुर्गांची : श्री मुक्तांबिका (श्री मुकांबादेवी) | पुढारी

महती नवदुर्गांची : श्री मुक्तांबिका (श्री मुकांबादेवी)

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाई होय. करवीर निवासिनीच्या सभोवताली असणाऱ्या विविध देव- देवतांमुळे या नगरीला एक वेगळी आध्यात्मिक बैठक प्राप्त झाली आहे. एकवीरा, मुक्तांबिका, पद्मावती, प्रियंगाई, कमलजा, महाकाली, अनुगामिनी, गजेंद्रलक्ष्मी, श्री लक्ष्मी आदी नवदुर्गांबरोबर त्र्यंबोली, उज्ज्वलांबा, कात्यायनी या तीन वरप्राप्त देवताही तितक्याच महत्त्वपूर्ण मानल्या जातात. देवांच्या रक्षणासाठी व दुष्ट राक्षसांचा संहार करण्यासाठी वेळोवेळी स्त्रीशक्तीने अवतार घेतले. या अवतारांमध्ये नवदुर्गांना विशेष महत्त्व आहे. विविध धार्मिक ग्रंथांत या नवदुर्गांचे उल्लेख आहेत. नवरात्रौत्सवानिमित्त या नवदुर्गांची माहिती जाणून घेऊया.

छत्रपती शाहू स्टेडियमच्या दक्षिणेला असणाऱ्या ‘रावणेश्वर’ साठमारीमागे नवदुर्गांतील द्वितीय दुर्गा म्हणजेच श्री मुक्तांबिका देवीचे मंदिर आहे.

मुकांबा देवीचे मूळ स्थान कर्नाटकामध्ये कोल्लूर नावाने प्रसिद्ध आहे. कोलरमध्ये भगवान परशुरामांच्या पूजेतील शिवलिंग होते. येथील स्थान माहात्म्य जाणून तेथे कोलमहर्षी तपश्चर्या करत होते. या परिसरात मुकासुर नावाचा एक राक्षस राहत होता. त्याने कोलमहर्षीच्या तपकार्यात विघ्न आणण्यास सुरुवात केली. त्याच्यापासून बचावासाठी त्यांनी शक्ती मातेची आराधना केली. त्या ठिकाणी गौरीमाता प्रकट झाली आणि तिने मुकासुर राक्षसाचा वध केला. यामुळे देवीला मुकांबा किंवा मुकांबिका हे नाव प्राप्त झाले. या परिसराला ‘कोलूर मुकांबा’ असे म्हटले जाऊ लागले. पुढे या ठिकाणी शंकराचार्य स्वामी आले होते. तेव्हा त्यांना मुकांबिकेचे जसे अधिष्ठान जाणवले, त्याप्रमाणे त्यांनी तेथेच मुकांबा भगवतीच्या मूर्तीची स्थापना करून तिला जागृत केले. भगवान परशुरामांनी स्थापन केलेल्या सात मुक्ती स्थानातील ही देवता आपल्या नवदुर्गाची मोक्षप्रदान करते.

कोल्हापुरातील मुक्तांबिका मंदिरातील देवीची मूर्ती दीड फूट उंचीची काळ्या पाषाणाची चतुर्भुज बैठकी आहे. बाजूच्या दोन हत्तींनी देवीच्या मस्तकावर चवऱ्या धरल्या आहेत. मुक्तांबिका देवीच्या परिवार देवता मुक्तेश्वर महादेव, वराह- नृसिंह-वामन, मत्स्यावतार व कूर्मावतार, भैरवनाथ, काळभैरव आहेत. देवीच्या दर्शनानंतर परिवारदेवतांचे आणि त्यानंतर भैरवनाथ व काळभैरवाचे दर्शन घेण्याचे यात्रेचे स्वरूप आहे.

 

Back to top button