नवरात्रौत्सव २०२३ : चामुंडा | पुढारी

नवरात्रौत्सव २०२३ : चामुंडा

- डॉ. सुरुचि पांडे

चामुंड दैत्याचा वध जिने केला ती म्हणजे अष्टभुजा चामुंडादेवी होय. हे देवीचे उग्र रूप आहे. चामुंडादेवीचे शिल्प पाहिले असता दिसून येते की, तिच्या हातात खट्वांग आहे; तिचा देह शुष्क आहे; डोळे खोल आहेत; गळ्यात मुंडमाला आहे. तिचे वाहन आहे घुबड हा पक्षी. त्यामागे अर्थातच तत्त्वचिंतन आहे. घुबड हा पक्षी निशाचर आहे. उडताना त्याच्या पंखांचा आवाज होत नाही. शेतीसाठ उपद्रव करणारे जीव हे त्याचे भक्ष्य आहे; मग तो चामुंडेबरोबर कसा? कारण असे आहे की, तो माणसाला नीतीच्या मार्गाने जायचे आवाहन करतो.

अन्यायाने संपत्ती कमवू नये, असे सांगतो. भक्ष्यावर झेप घेताना त्याच्या पंखांचा अजिबात आवाज होत नाही. तसेच यमाचे दूतही तुमच्या मागे चाहूल न देता येऊन उभे राहू शकतात, याची तो आठवण करून देतो. भोगांमध्ये रमलेली माणसे म्हणजे वैचारिक अंधारात जगणारी माणसे; पण घुबड मात्र अशा रात्री जागे असते; निरासक्त असते. भारतीय चिंतन पद्धतीत देवता कल्पना आणि जीवसृष्टी यांना किती विचारपूर्ण पद्धतीने गुंफून टाकलेले आहे, त्याचे हे एक उदाहरण आहे.

 

Back to top button