नवरात्रौत्सव २०२३ : काली | पुढारी

नवरात्रौत्सव २०२३ : काली

- डॉ. सुरूचि पांडे

नवरात्रीचा उत्सव नऊ दिवस असतो, त्याचं कारण दुर्गेचा महिषासुरावरचा विजय, तिचं अदम्य शौर्य आणि तिच्या नऊ अवतारांचं स्मरण. तसंच नऊ या क्रमांकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यास ‘ब्रह्म संख्या’ असं म्हणतात.

काली हे देवीचे उग्र रूप आहे. पश्चिम बंगाल तसेच शाक्त संप्रदायाचा प्रभाव असलेल्या ठिकाणी कालीची उपासना आढळते. ‘श्यामा रहस्य’ नावाच्या ग्रंथात कालीचे म्हणजेच श्यामाचे वर्णन करताना म्हटले आहे, ‘तिचं शरीर काजळाच्या पर्वताप्रमाणे आहे; मुख कराल आहे; ओठावर मंद स्मित आहे; एका हाती रक्ताचे थेंब ठिपकत असलेले नरमुंड आहे; दुसऱ्या हातात तलवार आहे; अन्य दोन हात अभय आणि वरद मुद्रांमध्ये आहेत. तिचा एक पाय शिवांच्या छातीवर आहे. हे सारे शब्द कालीचे संहार आणि सर्जनाचे पैलू दाखवतात. मृत्यू हे प्रत्येकाचे अंतिम वास्तव आहे; पण त्यामुळे नव्या, कोवळ्या अंकुरांना स्थान निर्माण होते. ध्यानस्थ शिवांच शक्ती आहे. तिची जीभ मुखातून बाहेर आलेली असते. त्याचेही स्पष्टीकरण काही बंगाली संदर्भामध्ये फार मनोरमपणे मांडले आहेत. रणमत्त, उग्र कालीचा पाय चुकून शिवांना लागला, त्यामुळे तिनं स्त्रीसुलभ संकोच वाटल्यामुळे जीभ बाहेर काढली. कालीच्या रुद्र रूपातील हेच तर सौंदर्य आहे.

Back to top button