Eye Flu: डोळे येणे म्हणजे काय?, ‘अशी’ घ्या काळजी | पुढारी

Eye Flu: डोळे येणे म्हणजे काय?, 'अशी' घ्या काळजी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्‍ये डोळे येण्याची साथ जोरात पसरत आहे. हा आजार संसर्गजन्य असून तो पसरण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतआहे. डोळे येण्याचा आजार सौम्य प्रकारचा संसर्ग असला तरी, वेळेत योग्य काळजी (Eye Flu) घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. पावसाळ्यात संसर्गजन्य आजार फोफावतातच पण सध्या डोळे येणे हा संसर्गजन्य आजार देखील मोठ्या प्रमाणात पसरतो. हा आजार खूप गंभीर नाही; परंतु डोळ्यासारख्या नाजूक अवयवावर परिणाम करत असल्याने, होणार त्रास हा अधिक असतो. हा डोळ्यांचा आजार बरा व्हायला देखील काहीसा कालावधी लागतो, त्यामुळे डोळे (Eye Flu) आल्यानंतर योग्य काळजी घेणे हेच अधिक फायदेशीर ठरते. चला जाणून घेवूया याविषयी.

Eye Flu: ‘अ‍ॅडिनो’ या विषाणूमुळे येतात डोळे

डोळ्यांची साथ याबाबत माहिती घेताना गडहिंग्लज (कोल्हापूर) येथील डॉ. सिद्धार्थ विवेक पाटणे यांनी पुढारी ऑनलाईनशी बोलताना सांगितले की, डोळे येणे हा आजार मुख्यत: ‘अ‍ॅडिनो’ या विषाणूमुळे (adenoviruses) होतो. हा विषाणू (व्हायरस) हाताच्या स्पर्शापासून सर्वाधिक पसरतो. या विषाणूपासून काही रूग्णांना ताप आणि सर्दी होऊन गेल्यानंतर, पुन्हा ७ दिवसांनी डोळे येऊ शकतात. यावर कोणतीही ठोस उपचार पद्धती नाही. त्यामुळे डोळे येऊ नयेत यासाठीच प्रतिबंधात्मक उपचार केले पाहिजेत. तरीही डोळे आलेच तर त्यानंतर देखील काळजी घेणे हा एकमेव उपचार (Eye Flu) आहे, असेही ते म्हणाले.

Eye Flu: डोळे येणे म्हणजे काय?

डोळे येणे हा आजार एक प्रकारचा संसर्ग किंवा ॲलर्जी आहे. ज्या विषाणूमुळे (व्हायरस) सर्दी होते, त्याच विषाणूमुळे डोळे देखील येतात. सर्व लोकांमध्ये आढळून येणारा हा संसर्ग आहे. हा आजार डोळे आलेल्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो. त्यामुळे योग्य काळजी घेणे गरजेचे असते.

डोळे का येतात?

पावसाळ्यात हवामानातील आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे विषाणू निर्मिती आणि ते पसरण्याचे प्रमाणही अधिक असते. विषाणू हवेच्या माध्यमातून व्यक्तिच्या अवयवावार परिणाम करतात. याचा डोळ्यांवर परिणाम झाल्यास डोळे येण्याचा आजार होऊ शकतो. यालाच आपण डोळे येणे असे म्हणतो. हा संसर्गजन्य आजार झालेली व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तिच्या संपर्कात आली की हा आजार सर्वत्र पसरतो, असे तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

काय आहेत लक्षणे?

  • डोळे लाल होणे
  • डोळ्यात वारंवार टोचणे
  • डोळ्यातून पाणी आणि चिकट द्रव येणे
  • डोळे एकमेकांना चिकटणे
  • डोळ्यांना काही प्रमाणात खाज देखील येते

 ‘अशी’ घ्या काळजी

  • हाताच्या स्वच्छतेकडेही कटाक्षाने लक्ष द्या.
  • डोळे नियमित थंड पाण्याने धुवा.
  • हा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे टॉवेल, रुमाल, उशी आदी गोष्टीं एकमेकांपासून वेगळ्या ठेवाव्यात.
  • घरातील व्यक्तींनी एकमेकांच्या वस्तू, कपडे वापरू नयेत.
  • डोळ्याला सारखा हात लावू नये, डोळे वारंवार चोळू नयेत.
  • तीन चार दिवसांत डोळ्याची समस्या कमी होते. परंतु त्रास वाढला तर नेत्ररोग तज्ञांचा सल्ला घेऊन औषधोपचार करा.

सतत हात स्वच्छ करणे अधिक गरजेचे

डोळे येणे हा आजार हाताच्या माध्यमातून अधिक पसरतो. त्यामुळे सतत हात स्वच्छ करणे अधिक गरजेचे आहे. मुलामुलींच्या होस्टेलमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याने, हा आजार याठिकाणी अधिक वेगाने पसरत आहे. डोळे येणे हा आजार झाल्यास यावर कोणताही ठोस उपचार नाही. पण या आजारात  डोळ्यांना झालेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी सपोर्टिव्ह ट्रिटमेंट दिली जाते. हा आजार झाल्यास तो किमान ७ ते १० दिवस किंवा त्याहून अधिक दिवस देखील राहू शकतो.

डॉ. सिद्धार्थ पाटणे

हेही वाचा:

 

Back to top button