Eye Flu Nashik : नाशिक शहरात ‘आय ड्रॉप’ची ब्लॅकने विक्री | पुढारी

Eye Flu Nashik : नाशिक शहरात 'आय ड्रॉप'ची ब्लॅकने विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

सध्या सर्वत्रच डोळ्यांची साथ जोरात असून, ही साथ इतक्या वेगाने पसरत आहे की घरोघरी रुग्ण आढळून येत आहेत. रुग्ण वाढत असल्याने, औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. विशेषत: ‘आय ड्रॉप’ मिळणे अवघड होत असल्याने, त्याची काही मंडळींकडून ब्लॅकने विक्री होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. Eye Flu Nashik

‘आय फ्लू’ (Eye Flu) हा संसर्गजन्य आजार असल्याने तो इतक्या झपाट्याने वाढत आहे की, घरोघरी रुग्ण बघावयास मिळत आहेत. विशेषत: शाळकरी मुलांमध्ये ही साथ अधिक वेगाने पसरत आहेत. आय फ्लूचा संसर्ग झाल्यानंतर तो बरा होण्याचा कालावधी वेगवेगळा असल्याने रुग्णांनी क्वॉरंटाइन होणे आवश्यक आहे. तसेच एखाद्या रुग्णास आय फ्लू झाल्यास त्याने इतरांच्या संपर्कात जाणे टाळायला हवे. मात्र, अनेकजण निष्काळजीपणा दाखवत असल्याने आय फ्लूचे रुग्ण सातत्याने समोर येत आहे. दरम्यान, आय फ्लू झाल्यानंतर ड्रॉप्स आणि ॲप्लिकॅबद्वारे उपचार केले जातात. मात्र, आवश्यक ड्रॉप्स आणि ॲप्लिकॅबचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने, आय ड्रॉप्ससाठी रुग्ण वणवण फिरताना दिसून येत आहेत. औषधेही आवश्यकतेनुसार उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये हे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, ही संधी साधत काही मंडळींकडून आय ड्रॉप्ससह औषधांची ब्लॅकने विक्री केली जात आहे. अवाच्या सव्वा पैसे आकारून रुग्णांना आय ड्रॉप उपलब्ध करून दिले जात आहेत. Eye Flu Nashik

ड्रॉप्ससोबत औषधांचा सल्ला 

आय फ्लू झालेल्या रुग्णास डोळे सुजणे, डोळ्यात आग होणे, डोळ्यात टोचल्यासारखे वाटणे, डोळे ठणकणे आदी लक्षणे जाणवत असल्याने, डॉक्टरांकडून आय ड्रॉप्ससह काही औषधी गोळ्या दिल्या जातात. मात्र, या गोळ्यांचा सध्या तुटवडा असल्याने रुग्णांचे मोठे हाल होताना दिसत आहे. अशात रुग्ण अधिकचे पैसे मोजण्यास तयार असल्याने गोळ्यांचीही ब्लॅकने विक्री केली जात आहे. 

विना प्रिस्किप्शन विक्री

डोळ्याची साथ झपाट्याने पसरत असल्याने, बरेचसे रुग्ण मेडिकलमध्ये ड्रॉप्स किंवा अन्य औषधांची मागणी करीत आहेत. तसेच मेडिकल चालकांकडून देखील विना प्रिस्किप्शन त्यांना औषधे दिली जात आहेत. वास्तविक, एखाद्या रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करणे अपेक्षित आहे. मात्र, अशात सर्रासपणे विना प्रिस्किप्शन औषधे दिली जात आहेत. 

अचानक रुग्णसंख्या वाढल्याने आय ड्राॅप्ससह औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. पुढच्या काळात ही साथ अधिक वेगाने वाढण्याची शक्यता असल्याने औषधांचा तुटवडा आणखी वेगाने जाणवू शकतो. शहरातील आय ड्रॉप्स आणि औषधांची स्थिती लक्षात घेता ठाण्याहून औषधे मागविण्यात आली आहेत.

– डॉ. नितीन रावते, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, मनपा

अचानक मागणी वाढल्याने काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, कंपन्यांकडे सध्यातरी औषधांचा मुबलक साठा आहे. त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. त्याचबरोबर रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच औषधे घ्यावीत. अन्य लोकांकडून औषधे घेतल्यास फसवणूक होण्याची शक्यता आहे.

– योगेश बागरेचा, अध्यक्ष, नासिक जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट

हेही वाचा :

Back to top button