९ ऑगस्ट क्रांती दिन विशेष : ब्रिटिशांविरुद्ध शाहूनगरीचा एल्गार | पुढारी

९ ऑगस्ट क्रांती दिन विशेष : ब्रिटिशांविरुद्ध शाहूनगरीचा एल्गार

ब्रिटिशांविरुद्ध पुकारण्यात आलेल्या 1857 च्या बंडात उठाव करणार्‍या 17 जणांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. पाच क्रांतिकारकांना फाशी, सहाजणांना तोफेच्या तोंडी, तर सहाजणांवर अमानुषपणे गोळ्या झाडण्यात आल्या. 165 वर्षांपूर्वी 8 सप्टेंबर रोजी सातार्‍यातील शाहूपुरी परिसरातील गेंडामाळावर घडलेली ही क्रांतिकारी घटना आजही स्वातंत्र्याच्या ज्वाज्वल्य इतिहासाची साक्ष देऊन जाते. मात्र, या गेंडामाळावरील हुतात्मा स्तंभ दुर्लक्षितच आहे. तिन्ही क्रांतिकारी घटनांची शिल्पे मात्र सुस्थितीत असून, त्यावेळच्या घटनांना उजाळा देत आहेत.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्यवादी धोरणामुळे देशातील अनेक संस्थाने त्याकाळी खालसा करण्यात आली होती. त्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, 1838 मध्ये क्रांतिकारक रंगो बापूजी गुप्ते यांनी अन्यायाविरुद्ध दाद मागितली. मात्र, निराश होऊन ते परत आले. तात्या टोपे व नानासाहेब पेशवे यांच्या मदतीने ते 1857 च्या उठावासाठी माणसे, पैसे व साहित्य मिळवण्यासाठी फिरत होते. त्यांनी पोलिसांत व इंग्रजी सैन्यात फितुरी माजवणे, शस्त्रे गोळा करणे, दारूगोळा तयार करणे, असे नियोजन केले.

मात्र, फितुरीमुळे हा उठाव अयशस्वी झाला होता. 1858 च्या ऑगस्टमध्ये तीनजणांचे एक लष्करी न्यायाधीश मंडळ नेमून चौकशी सुरू झाली. रंगो बापूजी सापडले नाहीतच; पण त्यांचा मुलगा सीताराम गुप्तेला बोरगाव येथे पकडण्यात आले. ‘मी बंडात भाग घेतला होता,’ असे त्यांनी उघडपणे सांगितले. याचा खटला 15 मार्च ते 24 मार्च 1858 पर्यंत चालला. 7 ऑगस्ट 1858 रोजी पकडलेल्या क्रांतिकारकांची मालमत्ता जप्त करून सर्वांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

8 सप्टेंबर 1858 रोजी शिक्षेची अंमलबजावणी झाली. यामध्ये पाच क्रांतिकारकांंना फाशी, सहाजणांना गोळ्या घातल्या व इतर सहाजणांना तोफेच्या तोंडी दिले. इंग्रजांच्या निर्दयी कृत्यामुळे जेथे 17 क्रांतिवीरांना प्राणास मुकावे लागले तीच शाहूपुरी गेंडामाळ ही हौतात्म्यभूमी आहे. त्या ठिकाणी आज तो ऐतिहासिक फाशीचा वड नाही; पण येणार्‍या पिढ्यान्पिढ्यांना प्रेरणा देईल, असा हुतात्मा स्तंभ आहे. पालिकेने या शहिदांचे शाहूपुरी येथे ‘फाशीचा वड’ येथे 2001 साली हुतात्मा स्मारक उभारले.

सातार्‍यातील बंडानंतरच देशात क्रांतीची मशाल

ब्रिटिशांनी दिलेल्या शिक्षेची 8 सप्टेंबर 1858 रोजी अंमलबजावणी झाली. इंग्रजांच्या निर्दयी कृत्यामुळे जेथे 17 क्रांतिवीरांना प्राणास मुकावे लागले तीच ही हौतात्म्यभूमी फाशीचा वड म्हणून ओळखली जात आहे. 1857 चे हे बंड म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचे पर्व आहे. या बंडानंतरच देशात क्रांतीची मशाल पेटली होती.

हे क्रांतिकारक तोफेच्या तोंडी

मुनजी भांदिगे, सखाराम शेट्ये, बाब्या गायकवाड, येशा गायकवाड, गणेश कारखानीस, नाना रामोशी या क्रांतिकारकांना तोफेच्या तोंडी देण्यात आले.

या क्रांतिकारकांवर झाडल्या गोळ्या

रामजी चव्हाण, बाब्या कानगी रामोशी, नाम्या रामोशी, शिवाजी पोटाले (पाटोळे), पर्वती पोटाले (पाटोळे), पतालू येशू या क्रांतिकारकांना गोळ्या घालण्यात आल्या. या क्रांतिकारकांचा नामोल्लेख छत्रपती शिवाजी संग्रहालयातील नोंदीमध्ये आहे.

– विशाल गुजर

Back to top button