छत्रपती शिवरायांचे अस्सल चित्र! | पुढारी

छत्रपती शिवरायांचे अस्सल चित्र!

मालोजी जगदाळे

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपल्या सर्वांना परिचित असणारेे शासनमान्य चित्र हे इतिहासाचार्य वा. सी. बेंद्रे यांनी उपलब्ध करून दिले होते. बेंद्रे यांनी हे चित्र कॉलीन मकेंझी या ब्रिटिश इतिहासकाराच्या ‘मकेंझी कलेक्शन’ या ग्रंथातून 1920 साली कॉपी करून भारतात आणले. ‘मकेंझी कलेक्शन’मध्ये शिवरायांचे चित्र 1826 साली प्रकाशित झाले होते. ‘मकेंझी कलेक्शन’मधील शिवरायांचे चित्र हे फान्स्वा वालेन्तैन या डच अधिकार्‍याच्या 1726 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथातील शिवाजी महाराजांच्या चित्रावर बेतलेले होते.

फान्स्वा वालेन्तैनच्या ग्रंथाचे 5 खंड आणि 8 भाग आहेत. या ग्रंथाच्या चौथ्या खंडातील दुसर्‍या भागात पान 248 वर मूळ चित्र आहे.हे कॉपर इंग्रेव्हिंग पद्धतीने बनविलेले चित्र असल्याने फक्त काळ्या रंगात आहे. वा. सी. बेंद्रे यांना हे मूळ चित्र पाहायला मिळाले नव्हते याची खंत होती. त्या उत्सुकतेमुळे शोध घेत मी या चित्रापर्यंत पोहोचलो. अत्यंत दुर्मीळ असणार्‍या या ग्रंथाच्या फक्त 2-3 प्रती संपूर्ण जगात उपलब्ध असल्याची माहिती मिळते. सुमारे 1000 नकाशे आणि चित्रे असणार्‍या या ग्रंथाची एक प्रत काही वर्षांपूर्वी 4 लाख 75 हजार डॉलर्सला (3 कोटी रुपये) विकली गेली होती.

छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना हर्बर्ट डी जॅगर या डच चित्रकार आणि अधिकार्‍याच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ शिवरायांना भेटायला 1677 साली थेवेनापट्टनम येथे आले होते. त्याच भेटीदरम्यान त्याने शिवरायांचे हे चित्र काढले. गोवळकोंडा येथील डच कंपनीच्या कार्यालयात हे चित्र होते. 1682 ते 1685 च्या दरम्यान हे चित्र आणि मोगल घराण्यातील अनेक चित्रे अ‍ॅमस्टरडॅम येथील संग्राहक आणि डेप्युटी शेरीफ सिमोन स्चीनवोएत याने विकत घेतली आणि ती चित्रे फान्स्वा वालेन्तैन याला त्याच्या ग्रंथात वापरण्यास दिली. शिवरायांच्या चित्राचे वैशिष्ट्य म्हणजे अंगरख्यावर शिवरायांनी उपरणे टाकले आहे. अंगावरील दागिने अस्सल मराठी पद्धतीचे आहेत.

चित्राचा प्रकार : छत्रपती शिवाजी महाराजांचे नेदरलँड येथील हे कृष्णधवल चित्र कॉपर इंग्रेव्हिंग प्रकारातील आहे. 17 व्या शतकात चित्र छपाईचे तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने कॉपर इंग्रेव्हिंगचे तंत्र वापरून चित्रे तयार केली जात. यामध्ये तांब्याच्या प्लेटवर अतिशय बारीक कलाकुसर करून आणि सावकाशपणे चित्र कोरले जात. यात एक जरी चूक झाली तरी प्लेट मोडून टाकावी लागे व पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागे. प्लेटवर चित्र कोरल्यावर त्यामध्ये शाई भरत, त्यांनतर ओलसर कागदावर त्या प्लेटचा मोठ्या वजनाचा दाब देऊन चित्र कागदावर घेतले जाई.

त्यानंतर संपूर्ण चित्रांचे फिनिशिंग काळजीपूर्वक हाताने केले जाई. एखादे चित्र काढण्यासाठी जितका वेळ जातो, त्यापेक्षा पाचपट वेळ कॉपर इंग्रेव्हिंग तंत्राने चित्र काढण्यात जात असे. परंतु, चित्रामध्ये अतिशय बारीकसारीक तपशील दाखविणे यामुळे शक्य झाले. मला मिळालेल्या चित्रात शिवरायांच्या डोळ्याजवळील सुरकुत्या, कपडे, डोक्यावरील मंदिल, गळ्यातील दागिना अशा सर्व बाबी बारीकसारीक तपशीलवारपणे दाखविण्यात आल्या आहेत.

रिक्सम्युझियम येथून 1996 सालचे बुलेटिन मिळाले, ज्यात स्पष्ट उल्लेख मिळाला की, शिवाजी महाराज आणि मुरादबक्षचे चित्र 1685 साली गोवळकोंडा येथून अ‍ॅमस्टरडॅम येथील Simon Schijnvoet या संग्राहकाने विकत घेतले. यावरून हे सिद्ध झाले की, हे चित्र 1685 पूर्वीचे आहे. दुसरा पुरावा डेन्मार्क येथून प्राप्त झाला, ज्यात डच शिष्टमंडळ शिवरायांना ऑगस्ट 1677 साली भेटायला आल्याचे उल्लेख मिळाले. हे शिष्टमंडळ सुमारे महिनाभर मराठा तळावर राहायला होते. तसेच त्या शिष्टमंडळात काही चित्रकारदेखील असल्याचे उल्लेख आहेत.

चित्राचा चित्रकार : 6 ऑगस्ट 1677 साली शिवरायांना जे डचांचे शिष्टमंडळ भेटायला आले होते, त्यात हर्बर्ट डी यागर हा अधिकारी होता. हा डच व्यक्ती ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी असण्याबरोबरच उत्तम चित्रकारसुद्धा होता, तो निकोलस वीटसेन या संग्राहकासाठी पगारी चित्रकार म्हणून काम करत असे. David collection आणि Engelbert Kaempfer’s Encounter या संदर्भग्रंथातील माहितीनुसार गोवळकोंडा येथून उपलब्ध झालेल्या चित्रांचे कलेक्शन 1677 च्या शेवटातले म्हणजे हर्बर्ट डी यागरने मराठा तळ सोडतानाचे आहे. त्यावरून सांगता येते की, हे चित्र हर्बर्टने काढले. या चित्राच्या प्रती डच रेकॉर्डसाठी आणि फान्स्वा वालेन्तैनसाठी मॅथीस बॅलेन याने तयार करून घेतल्या.

शिवरायांचे अश्वारूढ रंगीत चित्र !

छत्रपती शिवाजी महाराजांचे घोड्यावर विराजमान असलेले हे रंगीत चित्र यापूर्वी कुणालाही पाहायला मिळाले नव्हते. झाग्रेब, क्रोएशिया येथील खासगी संग्राहकाकडे हे चित्र होते. दुसर्‍या महायुद्धावेळी अनेक चित्रे, मौल्यवान दुर्मीळ वस्तू फ्रान्समधून नाझी सैनिकांनी पळवल्या आणि युरोपातील अनेक संग्राहकांना विकल्या. घोड्यावर बसलेल्या शिवाजी महाराजांचे चित्र जरी नवीनच असले तरी नीट पाहिले असता निकोलाय मनुची या इटालियन प्रवाशाच्या चित्राशी मेळ खाणारे आहे. मनुची कलेक्शनमधील चित्र मीर महम्मद या मोगल चित्रकाराने काढले होते. मला मिळालेले चित्र हे Copperplate Engravig तंत्र वापरून नंतर हाताने रंगवले आहे. ही युरोपियन शैली आहे, शिवाय चित्राखाली शिवरायांचे नावही लिहिले आहे.

 

निकोलाय मनुची याच्या संग्रहासाठी एन्तोन मारिया झेनेती या प्रसिद्ध कलाकाराने हे चित्र काढले असे म्हणता येते. कारण, त्याने मनुची संग्रहातील अनेक चित्रे Copperplate Engravig करून पुन्हा काढल्याची नोंद आहे आणि त्यातील काही चित्रे गहाळ झाली तर काही व्हेनिस, इटली येथील मार्सियाना संग्रहालयात अजूनही आहेत. 1741 साली तिथे काही चित्रे कॅटलॉग केल्याची नोंद आहे. त्यामुळे हे चित्र 1710 ते 1741 दरम्यान पॅरिस येथे झेनेतीने बनवले असावे.

Back to top button